भाषा, वन्यजीव, कला, अॅडव्हेन्चर, संगीतापासून धार्मिक असे ८ वेगवेगळे उत्सव पाहा नागालँडपासून तमिळनाडूपर्यंत !!
नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात भारताभर महोत्सव भरवले जातात. खाद्यपदार्थ, कला, संगीत, नृत्य, गायन, कविता, जंगलसफारी अशा विविध गोष्टी या महोत्सवात असतात. ज्या भागात महोत्सव होत आहे तिथली परंपरा जपणे आणि जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करणे अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी यानिमित्ताने साधल्या जातात. आज बोभाटा तुमच्यासाठी पुढच्या काही दिवसात सुरु होणाऱ्या किंवा सध्या सुरु असलेल्या महोत्सवाची यादी आणली आहे. तुम्हाला कोणत्या महोत्सवात जायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!
१. रण उत्सव
कच्छच्या रणात म्हणजे भारतातल्या सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटात दरवर्षी ‘रण उत्सव’ भरवला जातो. या महोत्सवात पारंपारिक नृत्यू, कला आणि संगीताची रेलचेल असते. जवळजवळ ५ महिन्यांच्या काळात हा महोत्सव भरवला जातो. यावर्षी २८ ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरुवात झाली आहे. २३ फेब्रुवारी २०२० रोजी महोत्सवाची सांगता होईल.
२. हॉर्नबिल महोत्सव
कोहिमा या नागालँडच्या राजधानीमध्ये दरवर्षी १ ते १० डिसेंबरपर्यंत हॉर्नबिल महोत्सव भरवला जातो. स्थानिक लोकजीवन, खाद्य, कला तसेच नागालँडचं प्रसिद्ध युद्ध नृत्य या महोत्सवाचं आकर्षण असतं.
३. हॉट एअर बलून फेस्टिव्हल
तुम्हाला जर थरार आवडत असेल तर हॉट एअर बलून फेस्टिव्हल तुम्हाला नक्कीच आवडेल. हम्पी, बिदर आणि मैसूरच्या भागात हा महोत्सव भरवला जातो. या महोत्सवात प्रचंड मोठ्या आकाराच्या हॉट एअर बलूनमधून कर्नाटकची सफर करता येते. तुम्हाला जर उंचावर जाण्याची भीती वाटत असेल तर आकाशात फिरणारे हॉट एअर बलून पाहण्याचा आनंदही काही कमी नसतो. यंदा १ ते ३१ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव असणार आहे.
४. पेरुमथिट्टा थरवाड
पेरुमथिट्टा थरवाड महोत्सव नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. महोत्सवात पुराणातील कथांवर नृत्य सादर केली जातात. नर्तक पूर्ण शरीर रंगवून नृत्य सादर करतात. या महोत्सवाचं आणखी एक आकर्षण म्हणजे रंग. नर्तकांची वेशभूषा असो वा सजावट, रंगांचा भरपूर वापर केलेला असतो.
केरळच्या कोट्टामकुझी येथे ७ ते १६ डिसेंबर पर्यंत पेरुमथिट्टा थरवाड महोत्सव भरवला जाणार आहे.
५. कार्तिगल दिपम
मुरुगन देवाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी १० डिसेंबर रोजी कार्थिगल दिपम महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे. असं म्हणतात की इसविसनपूर्व २०० वर्षांपासून हा सण साजरा केला जातो. तमिळनाडूतील सर्व मुरुगन मंदिरांमध्ये दिव्यांची आरास केली जाते. पारंपारिक नृत्याच्या साथीने महोत्सव साजरा होतो. दुसरी दिवाळीच म्हणा ना.
६. मॅग्नेटिक फील्ड्स फेस्टिव्हल
मॅग्नेटिक फील्ड्स फेस्टिव्हलला टॅलेंट फेस्टिव्हल म्हणतात. जगभरातील कलाकार मंडळी ३ दिवस आपली कला सादर करतात. गाणी, वर्कशॉप आणि खवय्येगिरी या महोत्सवाची ओळख आहे.
पत्ता : अलसीसर महल, अलसीसर, जयपूर
७. जश्न-ए-रेखता
तुम्हाला जर उर्दू भाषा आणि गझल, शायरी आवडत असेल तर जश्न-ए-रेखता सारखा महोत्सव चुकवू नका. जश्न-ए-रेखता म्हणजे उर्दू भाषेचा महोत्सव असतो. नावाजलेल्या कलाकारांसोबत चर्चासत्र, गझल, कवितांचे कार्यक्रम इत्यादी तुम्हाला अनुभवायला मिळतात. याखेरीज खवय्यांसाठी अवधी, हैदराबादी, पुरानी दिल्ली, रामपुरी, काश्मिरी, पारशी आणि पंजाबी खाद्यपदार्थ सुद्धा असतात.
पत्ता : मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, इंडिया गेट, नवी दिल्ली. १३ ते १५ डिसेंबर २०१९
८. रणथंबोर संगीत व वन्यजीव महोत्सव
वन्यभागाच्या संरक्षणाबाबत जनजागृतीसाठी आणि स्थानिक परंपरेला जपण्यासाठी रणथंबोरचा महोत्सव भरवला जातो. राजस्थानी संगीत, खाद्यपदार्थ आणि जंगलसफारी या महोत्सवाचं आकर्षण असतात.
पत्ता : नाहरगड, रणथंबोर. 27 ते २९ डिसेंबर २०१९
तर मंडळी, पटापट कामाला लागा. डिसेंबरमध्ये कोणत्या महोत्सवात भाग घेणार हे ठरवून घ्या.