जगभरातील १० विचित्र प्रथा आणि परंपरा....यातली कोणती प्रथा हटके आहे पाहा !!
देश तितक्या संस्कृती म्हटले जाते. निसर्गातील बदल, नववर्षाचे आगमन, विवाह सोहळा जन्मसोहळा असे कित्येक सोहळे माणूस साजरा करत असतो. अर्थात माणूस भारतातील असो की अमेरिकेतील, जपान मधील असो किंवा जर्मनीतील त्याला सोहळे, सण, उत्सव साजरे करण्याची आवड असतेच. विविध देशांत विविध सण विविध प्रकारे साजरे केले जातात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही देशातील वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती. ज्यांचा अवलंब या सणासुदीच्या निमित्ताने केला जातो. यातील काही चालीरीती खूप सुंदर आहेत तर अगदी फारच विचित्र आहेत. चला तर मग बघूया तरी कुठल्या देशात कुठला सण कशाप्रकारे साजरा केला जातो...
१) इस्टर बोनफायर, जर्मनी
इस्टरच्या आदल्या रात्री जर्मनीत विविध ठिकाणी लाकडांचे मोठमोठे ढीग रचून ते जाळले जातात. जर्मनीतील ही प्रथा खूपच जुनी असल्याचे मानले जाते. या परंपरेच्या निमित्ताने हिवाळ्यासोबत आलेल्या दुष्ट शक्तींचा नाश आणि पावसाळ्याचे स्वागत केले जाते. जर्मनीच्या वेस्टफालीयाच्या परिसरात एक मोठे लाकडी चाक तयार केले जाते. हे लाकडी चाक पेटवले जाते आणि डोंगर, टेकडी अशा उंच ठिकाणावरून ते खाली सोडले जाते. असे केल्याने शेतात भरपूर धनधान्य पिकते अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे.
२) सुर्रकन खाणे-पिणे, जपान
अनेक ठकाणी असे सुर्रकन आवाज करत खाणे-पिणे असंस्कृतपणाचे लक्षण समजले जाते. अर्थात इतत्र काहीही समजले जात असले तरी जपान मध्ये मात्र याला खूपच सन्माननीय लक्षण समजले जाते. विशेषत: नुडल्स खाताना तरी. म्हणजे जपान मध्ये जर तुम्ही नुडल्स खाताना अशा प्रकारे सुर्र-भुर्र आवाज केले नाही तर ते असंस्कृत आणि उद्धटपणाचे लक्षण समजले जाते. तुम्हाला जर अशा सुर्रकन आणि भुर्रकन खाण्यापिण्यामुळे घरी किंवा बाहेर टोमणे ऐकावे लागले असतील, तर तुम्ही जपानला जाऊ शकता. तिथे तुमचे निश्चितच स्वागत केले जाईल.
३) केकमध्ये नाणी टाकून शिजवणे, बोलिव्हिया
नववर्षाचे स्वागत करताना, येणारे वर्ष कसे असेल हे जाणून घेण्याची बऱ्यापैकी उत्सुकता असते. यासाठी काही लोक कुंडली घेऊन ज्योतिषांकडे जातात, पण बोलिव्हियात मात्र तुमचे नववर्ष कसे असणार हे तपासून पाहण्यासाठी एक भन्नाट आणि हटके आयडिया वापरली जाते. इथे नववर्षाच्या स्वागतासाठी केक बनवला जातो आणि हा केक बनवताना त्याच्या सामग्रीत काही नाणी मिसळली जातात. केक तयार झाल्यानंतर हा केक सर्वांना वाटला जातो. तो केक खाताना ज्याच्या वाट्याला त्यातील नाणी येतील, त्यांच्यासाठी येणारे नववर्ष आशादायी आणि भरभराटीचे असणार असे समजले जाते. किती छान आहे ना कल्पना?
४) दात छतावर फेकणे, ग्रीस
जगभरातील काही संस्कृती मध्ये असे समजले जाते की, लहान मुलांचे दुधाचे दात जेव्हा पडतात तेव्हा रात्री एक दाताची परी येऊन उशाला ठेवलेला तो पडलेला दात घेऊन जाते आणि त्याऐवजी आपल्याला कायमचा मजबूत दात देते. पण ग्रीस मध्ये मात्र लहान मुलांचे दुधाचे दात जेव्हा पडतात तेव्हा ते असे उशाखाली घेऊन झोपत नाहीत, तर तो दात ते घराच्या छतावर फेकून देतात आणि त्याऐवजी एक चांगला, मजबूत दात आपल्याला मिळू दे अशी प्रार्थना करतात.
५. टोमॅटो फेकणे, स्पेन
स्पेन मध्ये ला टोमॅटिना नावाचा एक सण आहे. हा सण ते कसा साजरा करतात माहितीये, एकमेकांवर टोमॅटो फेकून. तुम्ही जर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमा पाहिला असेल तर आम्ही कशाबद्दल बोलतोय हे तुम्हाला लगेच समजेल. हा सण काही फार जुना नाहीये. तर अगदी अलीकडे म्हणजे १९४५ पासून याची सुरुवात झाली. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या बुधवारी हा सण तिथे साजरा केला जातो. या सणाची सुरुवात काही झाली याचीही एक धम्माल गोष्ट आहे.
स्पेनमध्ये काही लोकांची भांडणे सुरु होती आणि त्यांनी आपल्या भांडणात असे एकमेकांवर टोमॅटो फेकायला सुरुवात केली. अशा भांडखोर लोकांना एक चांगला धडा मिळावा म्हणून तिथल्या छोट्या मुलांनी हा सण सुरु केला, पण हा सण साजरा करण्याचे काही नियम आहेत. टोमॅटो फेकण्यापूर्वी फेकणाऱ्याने त्याचा रस सगळा पिळून घ्यायचा आणि एकमेकांप्रती आदर व्यक्त करायचा. कारण खेळणाऱ्या सर्वांनाच या खेळातील मजा लुटता आली पाहिजे. मस्त आहे ना ही सुद्धा आयडिया!
६) हिवाळ्यातील आईसक्रिम, मंगोलिया
संपूर्ण जगात आईसक्रिम कधी खाल्ले जाते? अर्थातच हा काय प्रश्न झाला. उन्हाळ्यातच आईसक्रिम खाणार ना लोकं! पण मंगोलियात मात्र हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीच्या दिवशी आईसक्रिम खाल्ले जाते. या दिवशी आईसक्रिम विक्रेते आपले गाडे घेऊन रस्त्यावर उभे राहतात. अशा दिवशी त्यांना आईसक्रिम साठवण्यासाठी फ्रीज किंवा बर्फाची गरजच पडत नाही. कारण वातावरणातील तापमानच एकदम कमी म्हणजे उणे बावीस अंश असते. इतक्या तापमानात ते आईसक्रिम वितळणारच नाही ना, मग बर्फ किंवा फ्रीजची काय गरज. पण अशा कडाक्याच्या थंडीत हे लोक आईसक्रिम एन्जॉय करतात. किती आश्चर्याची गोष्ट ना!
७) आपले नशीब निवडण्याची संधी, दक्षिण कोरिया
तुम्हाला तुमचा पहिला वाढदिवस कसा साजरा झाला हे आता आठवत नसेल, पण कोणत्याही मुलाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला जातो हे तर तुम्ही आजूबाजूला कुठेतरी नक्कीच पहिले असेल. अर्थातच केक कापला जातो, मेणबत्ती फुकली जाते, फुगे फोडले जातात, खाऊ वाटला जातो, हो ना? पण दक्षिण कोरियात मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची एक अनोखी प्रथा आहे. इथे पहिला वाढदिवस साजरा करताना त्या मुलाला पारंपारिक पोशाख घालून नटवले जाते आणि त्याच्यासमोर काही वस्तू ठेवल्या जातात. जसे की, ब्रश, कलर, पाटी, वही, पेन्सिल, पैसे, पुस्तके अशा नानाविध गोष्टी ठेवल्या जातात. त्या विविध वस्तू पैकी ते मुल ज्या वस्तू उचलेल ते त्याचे नशीब असेल असे मानले जाते. या प्रथेला तिथे ‘दोलजाबी’ म्हटले जाते. मुलाने जर पैसे उचलले तर तो श्रीमंत होणार, जर पुस्तक उचलले तर बुद्धिमान होणार असे अर्थ लावले जातात.
८) खुर्चीतून उडी मारणे, डेन्मार्क
नववर्षाचे स्वागत कसे करावे याच्या प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. डेन्मार्कचीही अशीच एक खास पद्धत आहे. नववर्षाच्या दिवशी जेव्हा घड्याळात बाराचे ठोके पडतात तेव्हा तिथे घरातील खुर्चीवर उभे राहून उडी मारली जाते. काहीशी हास्यास्पद वाटेल पण हे खरे आहे. एखाद्या व्यक्तीला जर नववर्षाच्या मध्यरात्री अशी उडी मारायचे लक्षात राहिले नाही तर त्याचे वर्ष खराब जाणार असे मानले जाते.
९) एकदाच केस कापणे, चीन
चीनमधील ह्युंगलो रेड याओ हे गाव खास लांबसडक केस असणाऱ्या स्त्रियांसाठी ओळखले जाते. या गावातील स्त्रियांचे केस तब्बल ३.३ फुट इतके लांब वाढलेले दिसतात. त्या नेहमीच आपले केस गुंडाळून डोक्यावर ठेवतात. या गावातील महिलांचा असा समज आहे की यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते. या गावातील मुलींचे केस फक्त एकदाच तेही अठराव्या वर्षी कापले जातात. या वयात केस कापून मुलगी लग्नासाठी योग्य झाल्याचे संकेत दिले जातात आणि तिच्यासाठी वरचा शोध सुरु केला जातो.
बघा आहे की नाही कमाल. देश तितक्या संस्कृती असे उगीच म्हटले जात नाही. यातील कुठली प्रथा तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि का आवडली ते कमेंट करून नक्की सांगा.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी