स्वतःचा उद्योग सुरु करताना या १७ यशस्वी उद्योगपतींच वय किती होतं?
कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला मुहूर्त लागत नाही. अगदी तसेच तुम्ही कुठल्या वयात तुमच्या उद्योगाची पायाभरणी करता त्यावर तुमचे यश-अपयश उभे राहत नाही. जगभरात नाव कमावलेल्या आणि आपल्या उद्योगाचा विस्तार केलेल्या आजच्या काळातील काही उद्योजकांचा इतिहास जर तुम्ही वाचलात तर तुम्हालाही हे नक्कीच पटेल. या उद्योजकांनी कुठल्या वयात व्यवसाय सुरु केला आणि आज तो कसा यशस्वी झाला आहे, हे पाहिल्यावर तुम्हालाही कळेल की एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमचे वय कधीच आडवे येत नाही.
१) जेफ बेझोस –
हे नाव तर तुम्ही ऐकले असेलच. जेफ बेझोस हे अमेझॉनसारख्या लोकप्रिय इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. आज अमेझॉन कुठे नाहीये आणि अमेझॉनवर काय मिळत नाही ते सांगा. अगदी ऑफिस फर्निचर पासून पिठापर्यंत सगळ्या गरजेच्या वस्तू या साईटवर मिळतात. जेफ बोझेस यांनी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते फक्त ३० वर्षांचे होते.
अमेझॉन हे पूर्वी Cadabra नावाने ओळखले जायचे. या साईटवर केवळ पुस्तके विकत मिळायची. ऑनलाईन बुक स्टोअरचे सुरुवातीचे ऑफिस एका गॅरेजमध्ये होते. येणाऱ्या काळात इंटरनेट आणि ऑनलाइन व्यापाराची गरज विस्तारत जाणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी अमेझॉनची स्थापना केली. आणि आज ही कंपनी कुठल्या कुठे पोहोचली आहे हे तुम्ही बघू शकता. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझेस हे नाव सर्वात वरचे आहे. आणि येत्या काळातही हा व्यवसायात आणखी वाढणार यात कसलीच शंका नाही.
२) स्टीव्ह जॉब्ज –
स्टीव्ह जॉब्जबद्दल तर तुम्ही कितीतरी वेळा ऐकले असेल. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. स्टीव्ह जॉब्ज यांनी अॅपलची स्थापना केली तेव्हा त्यांचे वय फक्त २१ वर्षे होते. त्याची सुरुवात तर खूप मोठ्या अडथळ्यातून झाली. १९७६ साली त्यांच्या वाट्याचे शेअर्स विकून त्यांना अॅपलमधून राजीनामा द्यावा लागला होता. १९९७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा याच कंपनीच्या संचालकपदापासून सुरुवात केली. नंतर त्यांना पुन्हा एकदा कंपनीतून बाहेर पडावं लागलं, पण यावेळी त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता.
स्टीव्ह जॉब्ज यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज जगातली एक अग्रगण्य कंपनी बनली आहे. आज अॅपलची ओळख जगभरातील एक सर्वोत्तम ब्रँडेड टेक्नोलॉजी कंपनी असा आहे.
३) रितेश अगरवाल –
ओयो बद्दलही तुम्हाला माहिती असेलच. ओयो रूम्सचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी २२व्या वर्षी या कंपनीची सुरुवात केली. आज जगभरात ओयोच्या ४०,००० हॉटेल्सची चेन आहे. ओयो हॉटेल्सच्या ख्यातीबद्दल तर आता वेगळे काही सांगायलाच नको.
४) ओप्रा विन्फ्रे
ओप्रा विन्फ्रेचा द ओप्रा विन्फ्रे शो हा एक प्रचंड लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोच्या माध्यमातून ओप्रा विन्फ्रेची प्रसिद्धी वाढत गेली. वयाच्या १९व्या वर्षी एका रेडीओ स्टेशनसाठी वार्ताहर म्हणून काम करणारी ओप्रा आज स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसची मालकीण आहे. २२ व्या वर्षी तिने एका टीव्ही शो साठी होस्ट म्हणून काम केले आणि १९८६ मध्ये तिचा हा लोकप्रिय द ओप्रा विन्फ्रे शो सुरु झाला.. आज तिचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस तर आहेच शिवाय, द ओप्रा विन्फ्रे नेटवर्क नावाचे टीव्ही चॅनेल आहे. तिचे स्वतःचे एक मासिकदेखील प्रकाशित होते. या सगळ्या गोष्टीनी तिला सर्वात श्रीमंत आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती बनवले. जगभरात प्रभाव असलेली एक शक्तिशाली महिला असाही तिचा गौरव करण्यात आला.
५) नितीन कामत आणि निखील कामत –
निखील आणि नितीन कामत या दोघा भावाभावांनी झिरोदा या सर्वात मोठ्या रिटेल ब्रोकर कंपनीची स्थापना केली. तेव्हा नितीन ३१ वर्षांचा तर निखील २३ वर्षांचा होता. आज या कंपनीचे लक्षावधी ग्राहक आहेत. दोघांच्याही संपत्तीची एकत्रित बेरीज केल्यास ती १.५ अब्ज डॉलर्स इतकी भरते. फोर्ब्सच्या २०२०च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे ९०वे स्थान आहे.
६) सचिन बन्सल –
सचिन बन्सल पूर्वी अमेझॉनचे एक कर्मचारी होते. त्यांनी आपले मित्र बिन्नी बन्सल याच्या मदतीने अमेझॉन सारखीच एक ऑनलाईन बाजारपेठ सुरु केली, फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टची सुरुवात २००७ मध्ये झाली. आज देशातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी म्हणून फ्लिपकार्टचे नाव घेतले जाते. या कंपनीची सुरुवात केली तेव्हा सचिन बन्सल फक्त २६ वर्षांचे होते.
७) लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन
या दोघामुळेच आज आपण आपल्याला हवी ती माहिती गुगल करू शकतो. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी वयाच्या २५व्या वर्षी गुगल या लोकप्रिय सर्च इंजिनची सुरुवात केली. यासाठी त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीवरही पाणी सोडले. गुगलचे पहिले ऑफिस सुरु करण्यासाठी यांनी एक गॅरेज भाड्याने घेतले होते. गुगलचे आजचे यश पाहून आपले डोळे विस्फारतात, पण कंपनीला या टप्प्यावर पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. कंपनीसाठी त्यांनी आपले कुटुंबीय, मित्र, गुंतवणूकदार यांच्याकडून लक्षावधी डॉलर्सचा निधी गोळा केला आणि १९९८ साली कंपनी उभी केली.
८) जॅक मा
अलिबाबा या बड्या इ-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी वयाच्या २९व्या वर्षी या कंपनीची सुरुवात केली. जॅक मा आज आशियातील आणि जगातील सुद्धा अतिश्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सुरूवातीला जॅक मा यांनी नोकरीसाठी खूप वणवण केली, पण त्यांना कुठेच नोकरी मिळाली नाही. मिळाली तरी टिकली नाही. शेवटी त्यांनी स्वतःचीच कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. आज जॅक मा यांची एकूण संपत्ती ३८ अब्ज डॉलर इतकी आहे. अलिबाबा ही चीन मधील एक मोठी डिजिटल व्यापार पेठ आहे. त्यांनी अलीपे मोबाईल सर्विसचाही पाया घातला. आज ही सर्विस संपूर्ण आशियाई देशांत वापरली जाते.
९) जॅक डोर्सी
ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी याने वयाच्या २३ व्या वर्षी ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. आपल्या कामासंदर्भात केलेल्या अनेक विधानांमुळे जॅक डोर्सी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. २००० मध्ये त्यांनी ट्विटरसारखाच एक नमुना बनवून पहिला होता, पण या नव्या प्रकल्पाला पुढे काय दिशा द्यावी हे न समजल्याने त्यांनी तो प्रकल्प तिथेच थांबवला.
पुढे ओडीओ या पॉडकास्ट कंपनीमध्ये काम करत असताना त्याची भेट बीझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांच्याशी झाली. २००६ साली डोर्सीने ट्विटर वरून पहिले ट्विट केले. २००८ साली तो या कंपनीचा चेअरमन झाला.
१०) बिल गेट्स –
बिल गेट्सने १९७६ मध्ये मायक्रोसॉफ्टची सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १६ वर्षे. स्टीव्ह बाल्मेर सोबत भागीदारी करून त्याने पहिल्यांदा सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. आयबीएमने त्यांच्याकडे १९८० साली त्यांच्या कम्प्युटरसाठी काही बेसिक सॉफ्टवेअर बनवण्याची विनंती केली. यातून पुढे एमएस डॉस निर्माण झाले. मायक्रोसॉफ्ट आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक बडी कंपनी आहे.
११) पिअर ओमिड्यार
पिअर हे इबे या मोठ्या इ-कॉमर्स कंपनीचे चेअरमन आणि संस्थापक आहेत. ही कंपनी सुरु करण्यापूर्वी ते अॅपलमध्ये एक प्रोग्रॅमर म्हणून काम करत होते. एनीथिंग यु कॅन गेट ऑन इबे अशा स्लोगनसह त्यांनी या इकॉमर्स प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. या प्लॅटफॉर्मवर आज जगभरातील अनेक उत्पादक आपले उत्पादन विकू शकतात आणि जगभरातील ग्राहक आपल्याला हवे ते उत्पादन विकत घेऊ शकतात. पिअर यांनी या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा ते २८ वर्षांचे होते.
१२) मार्क झकरबर्ग
मार्क झकरबर्ग हा जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी. कॅम्पसमधील लोकांसाठी त्याने सुरुवातीला फेसमॅश हे सोशिअल नेटवर्क सुरु केले. पण विद्यापीठाने या सोशल नेटवर्किंग साईटवर बंदी घातली. हार्वर्डमध्ये शिकत असतानाच त्याने फेसबुक हे नवे सोशल नेटवर्क सुरु केले. त्याच्या या साईटला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २००४ मध्ये त्याने ही साईट सर्वांसाठी खुली केली. आज फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅपही विकत घेतले आहे. फेसबुकची सुरुवात केली तेव्हा मार्क झकरबर्गचे वय होते फक्त १९वर्षे. आज त्याची एकूण संपत्ती ५३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आज तो सातव्या क्रमांकावर आहे.
१३) मायकल डेल –
डेल टेक्नोलॉजीचे सीईओ मायकल डेल याचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. पण एवढ्यापुरतीच त्याची ओळख मर्यादित नाही. तो एक उद्योजक तर आहेच, शिवाय गुंतवणूकदार आणि लेखकही आहे. डेल ही जगातील एक नामांकित टेक्नो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डेल आधी एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करत होता. भांडी घासून कमावलेला पैसा त्याने स्टॉकमध्ये आणि काही किमती धातूंमध्ये गुंतवले.
त्याला वयाच्या १५व्या वर्षी एक कम्प्युटर भेट म्हणून मिळाला होता. कम्प्युटर कसा काम करतो हे बघण्याच्या उत्स्तुकतेने त्याने तो कम्प्युटर खोलून पहिला. जुने कम्प्युटर कसे अॅडव्हान्स करता येतील यावर त्याने १९८० पासून काम सुरु केले. आपले ध्येय गाठण्यासाठी त्याने अनेक संकटांवर मात केली. वयाच्या २१व्या वर्षी त्याने आपल्या आडनावाने ओळखणारी ही कंपनी सुरु केली.
१४) एलॉन मस्क
वयाच्या विसाव्या वर्षीच अब्जाधीश झालेला तरुण. त्याने तयार केलेले 'झिप २' नावाचे 'अॅप कॉम्पॅकने १९९९ साली ३०.७ कोटी डॉलर्सला विकत घेतले. पेपाल ही त्याने बनवलेली डिजिटल पेमेंट साईटही आज इ-बे या इकॉमर्स प्लॅटफॉर्मने विकत घेतली आहे.
२००२ मध्ये त्याने स्पेसएक्स नावाची एक खाजगी रॉकेट कंपनी सुरु केली. २००३ मध्ये टेस्ला मोटर्स ही इलेक्ट्रिक कार कंपनी सुरु केली. २०१२ मध्ये त्याने पहिले व्यावसायिक स्पेसक्राफ्ट बनवले. या स्पेसक्राफ्टद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला भेट देऊ शकता. त्याने स्वतःची पहिली कंपनी उभारली तेव्हा त्याचे वय होते अवघे २४ वर्षे होते.
१५) कर्नल हर्लंड डेव्हिड सँडर्स –
कर्नल सँडर्स यांच्याकडे एक चिकन रेसिपी होती. ज्यावर त्यांचा अमाप विश्वास होता. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी एक छोटेसे रेस्टॉरंट सुरु केले. काही दिवसातच त्यांचे या व्यवसायामुळे दिवाळे निघाले. शेवटी पुन्हा एकदा ६५व्या वर्षी त्यांनी एक नवा व्यवसाय सुरु केला. आपल्या चिकन रेसिपीवर त्यांना अजूनही विश्वास होता. ती रेसिपी सगळीकडे पोहोचवण्यासाठी ते या देशातून त्या देशात स्वतःहून फिरले. वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपली चिकन रेसिपी पोहोचवली.
इथेही २००० रेस्टॉरंट्स कडून त्यांना नकार मिळाला. शेवटी त्यांनी केंटूकी फ्राईड चिकन म्हणजेच केएफसी नावाने स्वतःचाच उद्योग सुरु केला. आज जवळपास १०० देशात केएफसीला मोठी मागणी आहे.
१६) रिचर्ड ब्रॅनसन
रिचर्ड ब्रॅनसन यांनी १९७० मध्ये व्हर्जिन रेकॉर्ड स्टोअर चेन सुरु केली. १९८० पर्यंत या रेकॉर्ड्सना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याने व्हर्जिन रेकॉर्ड्सही कंपनी सुरू केली तेव्हा त्याचे वय होते २० वर्षे. त्यानंतर त्याने खास विद्यार्थ्यांसाठी असे एक मासिक काढले. या मासिकानेही त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मासिकामुळेच म्युझिक इंडस्ट्रीत त्याचे नाव झाले.
१७) जॅन कोम
तुम्ही व्हाट्सअॅप तर वापरतच असाल, पण व्हाट्सएपची सुरुवात कशी झाली आणि व्हाट्सएपची स्थापना कुणी केली हे तुम्हाला माहित आहे का? व्हाट्सएपच्या संस्थापकाचे नाव आहे जॅन कोम. आज व्हाट्सएप एक फास्ट मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाते. जगभरात व्हाट्सअॅपचे कोट्यावधी वापरकर्ते असतील. या आधी कोमने याहूमध्ये काम केले होते. त्यांनतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे होते. जॅन कोमची व्हाट्सअॅपची कल्पना लवकरच खूप प्रसिद्ध झाली. इतकी की २०१४ मध्ये फेसबुक सुरु करणाऱ्या मार्क झकरबर्गने २०१९ मध्ये ही कंपनी विकत घेतली.
जगभरात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावलेल्या या अब्जाधीश उद्योगपतींविषयी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेलच की कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कधीही खूप उशीर केव्हा खूप लवकर असे काही नसते. तुम्ही कोणत्याही वयात व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली तरी चालते. फक्त इच्छाशक्ती हवी.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी