computer

या गावात २ महिने सूर्योदय होणार नाही...काय आहे कारण आणि कुठे आहे हे गाव ?

बघता बघता नोव्हेंबर संपलाच ! म्हणजे सर्वात मोठी २१ डिसेंबरची रात्र आता जवळ आलीच. थंडीचे दिवस आहेत. रात्र मोठी असते, दिवस लहान असतो म्हणजे जागे रहाण्याचे तास कमी आणि  झोपेचे तास जास्त असं समीकरण मांडणार्‍या झोपाळू लोकांना चक्क सलग दोन महिने झोपायची संधी अलास्कातल्या एका शहरात मिळते आहे. चला तर मग जायचं का तिकडे ?
थट्टा नाही हो, अलास्कात एक शहर आहे जिथे पुढचे दोन महिने सूर्योदय होणारच नाही. 

दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला हे वाचून नक्कीच विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अलास्कातील Utqiagvik नावाच्या शहरात तब्बल ६६ दिवसांनी सूर्योदय होणार आहे. हे छोटे शहर पूर्वी बॅरो म्हणून ओळखले जात होते. या शहरातील या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त १८ नोव्हेंबर रोजी झालाय. अनेक लोकांनी या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिथली लोकं अक्षरशः हळवी झालीत.

अर्थात हे काही यावर्षीच घडतंय असं नाही बरं का? दरवर्षी होणाऱ्या या बदलाला ‘पोलर नाईट’ किंवा ध्रुवीय रात्र असं म्हणतात. या भागात २३ जानेवारी २०२१ पर्यंत सूर्योदय होणार नाही. म्हणजे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सूर्यदेव दर्शन देतच नाहीत.  मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की त्या काळात फक्त अंधारी रात्रच असते. या ठिकाणी दिवसातून काही तास प्रकाश असतोच, फक्त आकाशात सूर्य तळपताना दिसणार नाही. सूर्योदय होण्याआधी किंवा सूर्यास्ताच्या अगदी आधी आकाश जसे दिसते साधारणपणे तसे वातावरण असते. 

इथले तापमान ही प्रचंड थंड असते. पोलरनाइटच्या काळात म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत Utqiagvik मध्ये कडाक्याची थंडी पडते. या काळात येथील तापमान (-२१) डिग्रीपर्यंत खाली जाते. म्हणजे सारे शहर बर्फाची दुलई आपल्याभोवती पांघरून घेते. या काळात तिथले लोक अन्नपदार्थ आणि औषधं यांचा साठा करून ठेवतात.

इंस्टाग्रामवर @kirsten_alburg यांनी सूर्यास्ताचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी म्हटलं आहे की हा Utqiagvik मधील वर्ष २०२०चा शेवटचा सूर्यास्त आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हा क्षण पाहताना डोळे ओले झाल्याचंही म्हटलं.

पण इथे असे का होत असावे? 

शाळेच्या दिवसांमध्ये अनेकांनी वाचलं असेल की पृथ्वी आपल्या अक्षावर तिरकी उभी आहे. त्यामुळे पृथ्वीची दोन्ही ध्रुव (पोल्स) म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश एकाचवेळी पडत नाही. यामुळेच उत्तर ध्रुवातील या भागात सहा महिने दिवस असेल, तर दक्षिण ध्रुवावर त्या काळात रात्र असते.

उत्तर ध्रुवाला आर्क्टिक सर्कल म्हणतात. दुसरीकडे दक्षिण ध्रुवाला अंटार्क्टिक सर्कल म्हणतात. अलास्काचं Utqiagvik शहर आर्क्टिक सर्कलमध्ये येतं. त्यामुळे इकडे वातवरण बदलतं. त्यात हे छोटंसं शहर इतर शहरांच्या तुलनेत जास्त उंचावर आहे. 

तिथल्या स्थानिकांना जेव्हा विचारले गेले की तुमच्यासाठी हा काळ अवघड जात नाही का? तेव्हा त्यांचे म्हणणे होते "अशा वातावरणात आम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. झोपायचा त्रास होत नाही, पण सकाळी उबदार पांघरुण अंगावरून काढून उठायला अवघड जाते. घरातील दिवे आम्ही या काळात बदलतो जेणेकरून आत अंधार न राहता दिवसाप्रमाणे लख्ख प्रकाश पडेल. मित्र मंडळींना घरी बोलावून आम्ही त्यांच्यासोबत आनंदात वेळ घालवतो. मुख्य सुट्ट्या या दिवसांसाठी राखून ठेवलेल्या असतात" 

Utqiagvik मध्ये खास पोलर नाइटसाठी पर्यटक जगभरातून येतात. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवतात. हॉटेल व्यवसायही तेजीत असतो. तिथले राहिवासीही सुट्टीचा काळ फक्त घरात बसून अनुभवतात असं अजिबातच नाही. बर्फाळ वातावरण असल्याने फक्त बर्फात खेळले जाणारे खेळ जसे की स्नोमोबिलिंग, अरोराचा, क्रॉस-कंट्री स्कीइंग, स्नोबोर्डिंग, आईस-फिशिंग, हायकिंग, बोनफायर असे कितीतरी प्रकार खेळले जातात.

आहे की नाही एका अद्भुत दुनियेची सफर? लहान असताना सकाळी सकाळी शाळेत जायचे नसेल तेव्हा वाटायचे की सकाळ होऊच नये आणि ही रात्र ही संपू नये. तेव्हा खरच वाटायचं देवाने असा एक दिवस तरी चमत्कार करावा आणि शाळेला बुट्टी मिळावी. ते निरागस दिवस गेले आणि आपण मोठे झालो. पण हा लेख वाचल्यावर तेव्हा जो आपण फक्त विचार करायचो तसं प्रत्यक्षात घडतं, रात्र संपत नाही आणि दिवसच उगवत नाही. खरंच नैसर्गिक चमत्कार किंवा जादू म्हणावी अशीच आहे.. तुम्हाला काय वाटतं?

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

 

आणखी वाचा :

लेन्सकथा : जगातलं शेवटचं आणि सलग ४० दिवस अंधारात राहणारं शहर जगतं कसं, पाहा एका फोटोग्राफरच्या नजरेतून...

सबस्क्राईब करा

* indicates required