महाराष्ट्रात 'अम्माचं कँटीन' कधी येणार?
आता हे आणि नविन खूळ काय? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तुम्हांला माहित आहे, हाच प्रश्न जयललितांनी तामिळनाडूत जेव्हा पहिलं 'अम्मा उनावगम' (आईचे कँटीन) सुरु केलं, तेव्हाही विचारला गेला होता. आता जयललिता नाहीत पण त्यांनी सुरु केलेलं आईचं कँटीन आजही जोरात चालू आहे. इतकंच नाही तर इतर अनेक राज्यातही वेगवेगळ्या सोयीस्कर नावानं ही संकल्पना राबवण्यात येतेय. पण आपण जरा आधी ’अम्मा उनावगम’चा मेन्यू तर बघू या!
न्याहारीसाठी इडली आणि पोंगल(पातळ भाजी) फक्त एक रुपयात! दुपारच्या जेवणात तीन वेगवेगळ्या प्रकारचे कालवलेले भात , दहीभात, सांबार भात आणि लेमन भात फक्त तीन रुपयात, चपात्या खाणार्यांसाठी तीन रुपयांत दोन चपात्या आणि डाळ फुकट !!! इतका स्वस्त आणि पौष्टीक मेन्यू आजपर्यंत कुठे बघितला आहे का ?
सुरुवातीला या संकल्पनेकडं 'एक निवडणूकीचा राजकारणी तमाशा' या नजरेनं बघितलं गेलं पण आजही ही सारी कँटीन्स जोरात चालू आहेत. ही कँटीन्स चालवली जातात ती महिलांच्या बचत गटांकडून. या कँटीन्सच्या एकट्या चैन्नईमध्ये १०० शंभराहून अधिक शाखा आहेत.
या संकल्पनेचं यश नजरेत आल्यावर राजस्थानमध्ये 'अन्नपूर्णा ' सुरु झालं, कर्नाटकात ’नम्मा कँटीन’ आलं, मध्यप्रदेशात दिनदयाल योजना सुरु झाली तर आता हिमाचल प्रदेशात २५ रुपयात 'राजीव थाळी' आली.
अशाच प्रकारचा सरकारी प्रयोग महाराष्ट्रात ' झुणका भाकर केंद्र ' म्हणून सुरु झाला होता. पण सरकार बदलल्यावर ही केंद्रं बंद पडली. कदाचित महाराष्ट्रात झुणका-भाकरपेक्षा ' वडापाव ' ला लोकाश्रय मिळाला असावा.
सध्या तरी महाराष्ट्रात असं अम्मा कँटीन किंवा त्यासारखं दुसरं काही आमच्या तरी नजरेत नाही . तुम्हाला काही माहिती आहे का ?