वारंवार पित्ताचा त्रास होतो? हे करा, फायदा होईल...
बदललेल्या हवामानाचा आणि आहार-विहारांचा परिणाम म्हणून आजकाल लोकांना वारंवार पिताचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येतात.
सध्या या बाबतीत पित्ताचा त्रास म्हणजे नेमकी कोणती लक्षणं ते पहाणं गरजेचं आहे. पित्ताची सामान्य लक्षणं पुढील प्रमाणे दिसतात –
-पोटात आग आग किंवा जळजळ होते
-पोटात मळमळतं
-करपट ढेकर येतात
-घशाशी आंबट येतं
-उलटी होते
-तोंडाची चव कडू किंवा आंबट होते
-भूक लागत नाही, खावसं वाटत नाही
-डोकं दुखतं
-उन्हात जावंवत नाही
-डोळ्यांची जळजळ
-चक्कर येणं
-लघवीची आग होते, तडका मारतो
-जुलाब होतात
यामधील काही लक्षणं सोबत अपचन झाल्याचं दर्शवत असली तरी त्या अपचनामागेही पित्तच असल्याचं मानलं जातं. आपल्यासाठी आधी समजावून घेणं गरजेचं आहे की नेमक्या कोणत्या पित्ताने कशा प्रकारचा त्रास होत आहे. यासाठी आधी पित्ताचा प्रकार समजून घ्यावा लागतो.
जेव्हा आग, जळजळ, तोंडाची कडू चव अशी लक्षणं असतात तेव्हा पित्तामधले तेजस गुण वाढीला लागलेले असतात. पित्तामधलं पाणी कमी झालेलं असतं. म्हणून अशा वेळी -
१. ऊसाचा रस, कोकम सरबत, लिंबू सरबत प्यावं
२. कोमट दूध साखर घालून प्यावं
३. तूप साखर किंवा लोणी साखर खावे
४. काळ्या मनुका खाव्यात किंवा काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून दुस-या दिवशी त्याच पाण्यात कुसकरून खाव्यात
५. दुपारी उन्हात फिरू नये. फिरणं आवश्यक असल्यास डोक्यावर छत्री किंवा टोपी घालावी.
जेव्हा घशाशी आंबट येणं, तोंड आंबणं अशी लक्षण असतात तेव्हा पित्तामधले जलीय गुण वाढलेले असतात. पित्तामधलं पाणी वाढलेलं असतं. ते कमी करावं लागतं म्हणून अशा वेळी -
१. साळीच्या, ज्वारीच्या लाह्या खाव्यात
२. काळ्या मनुका किंवा कोरडा मोरावळा खावा
३. आल्याचा रस घातलेलं पाणी प्यावं
४. सुंठवडा चघळावा
५. कांदा, मूळा किसून त्यांची ताकामध्ये कोशिंबीर करून खावी
६. सुण्ठ-मिरी घातलेला मठ्ठा प्यावा
७. मिरपूड लिंबाच्या रसाबरोबर खावी
या उपायांनी पित्ताचा त्रास व्यवस्थित आटोक्यात ठेवता येईल याची खात्री आहे.