फक्त सस्तन प्राणीच नाही, तर हे ३ पक्षीसुद्धा पिल्लांना आपलं दूध पाजतात!!
आपण शाळेत शिकलो आहोत की सस्तन प्राणी आपल्या पिल्लांना दूध पाजतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही पक्षीसुद्धा पिल्लांना दूध पाजतात? हे पक्षी कोणी दुर्मिळ पक्षी नाहीत. हे आपल्या आसपास असलेले आणि तुम्हाआम्हांला माहित असलेलेच पक्षी आहेत. उदाहरणार्थ, कबूतर. पण गंमत अशी आहे की जगात असे केवळ तीन ते चारच पक्षी आहेत जे दूध तयार करू शकतात. चला तर आज या पक्ष्यांविषयी जाणून घेऊया.
कबूतर
कबूतर आपल्या पिल्लांना दुधासारखा जो द्रव पदार्थ खाऊ घालतं, त्याला शास्त्रीय भाषेत क्रॉप मिल्क म्हणतात. एका अर्थी मादी कबूतरने खाल्लेल्या अन्नाचाच हा अर्क म्हणता येईल. कबुतराच्या अन्ननलिकेखाली दूध किंवा द्रवपदार्थ साठवण्यासाठी पिशवीसारखा कोश असतो. या दुधाचा रंग पिवळा, राखाडी किंवा फिकट तपकिरी असू शकतो.
अशा प्रकारचं दूध हे सर्वात आधी कबुतरांमध्ये आढळल्याने त्याला पिजन मिल्क असंही म्हटलं जातं. या दुधात मोठ्याप्रमाणात प्रथिने असतात. याखेरीज प्रतिजैविके आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे घटकही असतात.
नव्या संशोधनानुसार पारवाही पक्ष्यातही याच प्रकारे दूध तयार होते .
फ्लेमिंगो
काही दिवसांपूर्वी फ्लेमिंगो आपल्या मुलांना रक्त पाजत आहे असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात दिसणारं रक्त खरंतर क्रॉप मिल्क होतं. फ्लेमिंगोमध्येसुद्धा कबुतराप्रमाणेच दूध तयार होते. पण फ्लेमिंगोच्या शरीरातील क्रॉप मिल्क तयार करण्याची यंत्रणा फक्त अन्ननलिकेपुरती मर्यादित नसते, तर ती पचनसंस्थेशी जोडलेली असते.
पेंग्विन
पेंग्विन्समध्ये चक्क नर पक्ष्याला पान्हा फुटतो. नराच्या पोटात अन्ननलिकेशी जोडलेल्या कोशातून क्रॉप मिल्क बाहेर येतं. आपण आधी पाहिलेले दोन्ही पक्षी आपल्या पिल्लांना एका वयोमर्यादेपर्यंत दुध पाजतात, पण पेंग्विन्समध्ये तसं काही नसतं. नराकडे अंडी उबवण्याची जबाबदारी असते आणि मादी अन्न गोळा करायला जाते. जर काही कारणांनी मादी वेळेवर आली नाही, तर पेंग्विन स्वतःच पिल्लांचा सांभाळ करतो आणि वेळ आल्यास त्यांना दुधही पाजतो. पिल्लांची आई परत आल्यानंतर ती त्यांना मासे किंवा इतर अन्न खाऊ घालते. पेंग्विन्स आपल्या मुलांच्या बाबतीत फक्त क्रॉप मिल्कवर अवलंबून राहत नाहीत.
तर, मंडळी कशी वाटली ही माहिती? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.