बोभाटाची बाग - भाग १७ : “देशी वृक्ष जागृती अभियान”....वाचा 'झाड लावताना' या पुस्तिकेचे पहिले प्रकरण
“देशी वृक्ष जागृती अभियान”च्या अंतर्गत डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर (निवृत्त प्राचार्य श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठवडगाव, कोल्हापूर) आणि डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे (सहाय्यक प्राध्यापक, शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद, सातारा) या लेखकांनी 'झाड लावताना' ही वृक्षारोपणासाठी मार्गदर्शक नि:शुल्क पुस्तिका प्रकाशित केली आहे. 'बोभाटाची बाग' या सदरात या पुस्तिकेतली प्रकरणे क्रमशः प्रसिध्द करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली आहे. 'बोभाटा'तर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार!
या पुस्तिकेमध्ये सर्वसामान्य देशी वृक्षांची यादी दिली आहे. आकार व उंचीनुसार वृक्षांची यादी, आकर्षक फुले आणि मनमोहक पर्णसंभार असणार्या वृक्षांची यादी, औषधी गुणधर्म असणार्या वृक्षांची यादी तसेच पक्ष्यांना आकर्षित करणार्या वृक्षांची यादी या पुस्तकात उपलब्ध करुन दिलेली आहे. जागेच्या प्रकाराप्रमाणे वृक्षांची यादी, कोणते वृक्ष कोणत्या ठिकाणी लावावेत, वृक्षारोपण करण्यापूर्वी तसेच वृक्षांची निवड करताना आवश्यक व उपयुक्त असणारी सर्व माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये पारंपारिक पध्दतीने नक्षत्र वन, नवग्रह वन, राशी वन, सप्तर्षी वन आणि पंचवन ही निर्माण केली जातात. याबबतची थोडक्यात माहितीही या पुस्तकात देण्यात आली. आहे.
आज आपण वाचू या 'झाड लावताना' या पुस्तिकेचे पहिले प्रकरण -
वृक्ष लागवड करण्यापूर्वी / करताना खालील बाबींचा / पर्यायांचा विचार जरूर करा.
१) वृक्षाची ज्या ठिकाणी लागवड करणार आहात त्या जागेबाबत:
* जागा वीजबाहिन्यांच्या / टेलिफोन वाहिन्यांच्या खाली आहे का?
- असल्यास कमी उंचीचे वृक्ष लावावेत.
* जागा पाण्याच्या / ड्रेनेजच्या पाईपलाईनजवळ आहे का? गटारीजवळ आहे का?
- असल्यास लहान आकाराचे वृक्ष लावावेत.
* जागा कंपाउंड भिंतीला लागून आहे का? जागा पाणी जास्त साठविणारी, दलदलीत आहे का? जागा खारवट आहे का?
- असल्यास जागेच्या वरील प्रकाराप्रमाणे त्यास योग्य असणार्या वृक्षांचीच लागवड करा.
* जागा कोरड्या, उष्ण हवामान असणार्या तसेच अगदी कमी पाणी उपलब्ध असणाऱ्या प्रदेशातील आहे का?
- असल्यास उष्ण हवामानात व कमी पाण्यावर वाढणार्या वृक्षांचीच लागवड करा.
* निवड केलेल्या जागेत किती झाडे लावायची आहेत? एकापेक्षा जास्त झाडे लावायची असल्यास दोन झाडांतील अंतराचा विचार करावा.
> मोठे वृक्ष: १५ ते २० फूट अंतर
> मध्यम वृक्ष: १० ते १५ फूट अंतर
> लहान वृक्ष: ०७ ते १० फूट अंतर
२) वृक्षाची निवड करताना:
* शक्यतो स्थानिक देशी वृक्ष निवडावेत.
* रोपाची उंची किमान ५ फूट व खोडाची जाडी किमान २-३ से.मी. असावी.
* रोपांचे वय किमान ३ वर्ष असावे.
* रोपाची निवड करताना खालील बाबींचा विचार करावा.
* सदाहरित की पानगळी वृक्ष.
* फांद्यांची रचना व वृक्षाचा आकार.
* फुलांचा बहार येण्याचा कालावधी.
* वृक्ष लागवड आकर्षक फुलांसाठी की पानांसाठी?
* उत्पन्न देणारी की न देणारी?
* फळांपासून उपद्रव होणारी की न होणारी?
* पक्षांना आकर्षित करणारी की न करणारी?
३) वृक्षाची लागवड करताना याबाबत विचार करावा:
* स्थानिक हवामानास अनुकूल असणार्या देशी वृक्षांची निवड करावी.
* दाट वस्तीत मोठ्या आकाराची झाडे लावू नयेत.
* पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे वृक्षांची निवड करावी.
* नियमित पाणी देणे शक्य असेल तरच वृक्ष लागवड करावी.
* सुपीक (गाळाची) माती, शेणखत / कंपोस्टखत / गांडुळखत / सेंद्रीयखत, वनस्पतीजन्य किटकनाशके यांची उपलब्धता असावी.
* वृक्षांच्या रोपांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी ट्री गार्ड, काटेरी कुंपण इ. सुविधा असाव्यात.
* पाण्याची व देखरेखीची व्यवस्था असावी.
* वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्य व मनुष्यबळ असावे.
* पाण्याअभावी / आग, वणव्याने / शेळ्या-मेंढ्या, जनावरांमुळे रोपे खराब होणार नाहीत, याबाबत योग्य काळजी घ्या.
* अरूंद रस्त्यावर मोठी होणारी झाडे लावू नका.
* रस्त्याच्या दुतर्फा एकाच जातीची झाडे न लावता विविध जाती निवडा. फुलांचा हंगाम तसेच रंग, वृक्षाची उंची, आकार यांचा विचार करा.
* आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त रोपे लावू नका. रोपे बाया जाणार नाहीत याचा विचार करा व काळजी घ्या.
* औषधी, दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ, संकटग्रस्त झाडे योग्य ठिकाणी आवर्जून लावा.
* वळणाच्या रस्त्यावर वृक्ष लागवड करू नका. यामुळे अपघात टाळता येतील.
* सणांमध्ये वापर होणारी झाडे मोठ्या प्रमाणात अवश्य लावा.
* वारसास्थळे, जुन्या ऐतिहासिक इमारती अशा परिसरात जागा अपुरी असल्यास लहान झाडांची लागवड मोठ्या कुंड्यातून करावी.
* वृक्ष लागवड करताना रस्त्यांचा व त्या परिसरातील सुशोभिकरणाचा विचार करावा.
* प्रत्येक वृक्ष हा आपला हरित वारसा म्हणून जपा. वेळोवेळी त्याची योग्य काळजी घ्या.
* एखाद्या परिसराची विशिष्ट ओळख म्हणून ठराविक वृक्षांचा सलग पट्टा विकसित करा.
या नंतरच्या भागात अनेक देशी वृक्षांची माहिती लेखकांनी दिली आहे. 'बोभाटाची बाग' या सदरात येत्या शुक्रवारी वाचू या अशा अनेक देशी वृक्षांची सविस्तर माहिती.