computer

१८५७ साली ब्रिटिशांना घाबरवून सोडलेली चपाती चळवळ!! तिचा इतिहास आणि शेवट तर जाणून घ्या!!

१८५७ चा काळ होता. भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा उदय होत होता. भारतातली जुनी राजेशाही जात होती, नवीन गोरे साहेब येत होते, कुठे उठाव होण्याची चिन्हे होती तर कुठे युद्धाला तोंड फुटणार होते. इस्ट इंडिया कंपनीतील भारतीय शिपाई अस्वस्थ होते, ब्रिटिश आपला धर्म भारतीयांवर लादतील ही एक वेगळी भीतीही डोकं वर काढत होती. असा हा एक मोठ्या बदलाचा काळ होता. अशा या धामधुमीच्या काळात एका अगदी छोट्या घटनेने आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि अख्खा देश या घटनेत सामील झाला. ही घटना म्हणजे चपाती चळवळ.

चपाती चळवळ म्हणजे काय हे खरं तर कोणालाही ठाऊक नाही. अगदी इतिहासकार आजही या घटनेचा अर्थ लावू शकलेले नाही. पण ती सुरु झाली होती खरी.

जास्त वेळ न घेता चपाती चळवळ काय होती हे आधी समजून घेऊया.

१८५७ च्या सुरुवातीला उत्तर भारतात हळूहळू हजारो चपात्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवल्या जाण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. या घटनेत नेमकं काय घडत होतं? तर, एक अज्ञात व्यक्ती येत असे आणि ती गावातल्या रखवालदाराला चार किंवा त्यापेक्षा जास्त चपात्या देत असे आणि अशा आणखी चपात्या तयार करून दुसऱ्या गावातील रखवालदाराला देण्याची सूचना करत असे. ही अज्ञात व्यक्ती स्वतःही रखवालदारच असायची. अशा प्रकारे एका रखवालदाराकडून दुसऱ्या रखवालदाराला या चपात्या पोचू लागल्या आणि या घटनेने चळवळीचे रूप घेतले. चपात्यांची ही देवाणघेवाण का केली जात आहे, त्यामार्फत काय संदेश दिला जातोय, त्या मागचा अर्थ काय, याबद्दल कोणालाही माहिती नव्हती.

ही घटना सर्वात आधी नजरेत आली ती फेब्रुवारी १८५७ साली. मार्क थॉर्नहिल हा त्याकाळी मथुरेचा दंडाधिकारी होता. एके दिवशी त्याच्या ऑफिसात एका भारतीय पोलीस अधिकाऱ्याने चपात्या आणून दिल्या. या पोलीस अधिकाऱ्याला एका गावातल्या रखवालदाराने चपात्या आणून दिल्या होत्या. या रखवालदाराला कोणत्या तरी तिसऱ्याच रखवालदाराने चपात्या दिल्या होत्या. मार्क थॉर्नहिलला ही घटना विचित्र वाटली. त्याने चपात्यांच मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. या सगळ्यात फक्त रखवालदार आणि पोलीस भेटत गेले ज्यांना या घटनेबद्दल काहीच पत्ता नव्हता.

ईस्ट इंडिया कंपनीत काम करणाऱ्या डॉ. गिल्बर्ट हॅडॉ यांनी आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात काय म्हटले होते पाहा. ते लिहितात, “सध्या पूर्ण भारतभर एक रहस्यमय प्रकरण आकार घेत आहे. कोणालाच या मागचा अर्थ माहित असल्याचं दिसत नाही. याची सुरुवात कुठून झाली, याचा उद्देश काय, हे कोण्या धार्मिक गटाशी किंवा गुप्त संघटनेशी संबंधित आहे का याबद्दलही कोणाला माहिती नाही. भारतीय वर्तमानपत्रे या घटनेचा अर्थ लावण्यात व्यस्त आहेत. या घटनेला चपाती चळवळ नाव देण्यात आले आहे.”
या घटनेचा काय परिणाम झाला?

ब्रिटिश आणि भारतीयांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं असताना चपात्यांच्या चळवळीने दोन्ही बाजूच्या लोकांना गोंधळात पाडलं. ब्रिटिशांना वाटले की या चपात्या म्हणजे गुप्त संदेश आहेत, त्यांच्या मार्फत गुप्त सूचना दिल्या जात आहे. या चपात्यांच्या आत गुप्त संदेश आहे का याचा शोध घेण्यात आला, पण उपयोग झाला नाही. ब्रिटिशांना या घटनेला थोपवता पण येईना, कारण चपाती सारख्या रोजच्या अन्नाची अदलाबदली करण्यापासून कोणाला कसं थांबवणार.

बंगालमधून प्रसिद्ध होणाऱ्या The Friend of India या वृत्तपत्राने ५ मार्च १८५७ साली छापलेल्या बातमीत म्हटले होते की, प्रत्येक पोलीस ठाण्यात चापात्यांचे गठ्ठे यायला लागल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्येही घाबराट पसरली आहे.

दुसऱ्या बाजूला भारतीयांना ब्रिटिशांवरच संशय होता. त्यांच्या मते ब्रिटिश लोक चपात्यांमधून गाय किंवा डुकराच्या हाडांचे मिश्रण करून भारतीयांचं मोठ्याप्रमाणात धर्मपरिवर्तन करण्याचा कट करत आहेत. एकदा का धर्म बाटला की लोकांना ख्रिस्ती धर्मात ओढून घेता येईल.

खरं तर या दोन्ही बाजूच्या लोकांचे तर्क केवळ तर्कच राहिले. या चपात्यांच्या चळवळीमागचा उद्देश काही समोर आला नाही. आजही इतिहासकार या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या संशोधनात एक नवीनच बाजू समोर आली. ती अशी की, त्या काळात कॉलराची साथ आल्यामुळे कॉलराग्रस्त लोकांना अन्न पुरवण्यासाठी चपाती चळवळीची सुरुवात झाली, पण काळाच्या ओघात चपाती पोचवण्याचा मुख्य उद्देश हरवला आणि चपात्यांची घेवाणदेवाण सुरूच राहिली.

तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या धार्मिक कारणाने भारतीयांमध्ये घबराट पसरली होती ती पुढे जाऊन १८५७ चं युद्ध सुरु करणाऱ्या महत्त्वाच्या घटनांमधली एक घटना ठरली. त्याच काळात ब्रिटिशांनी गाय आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसे आणली होती. ही काडतुसे वापरण्याची भारतीय शिपायांना सक्ती करण्यात आली. परिणामी मंगल पांडे यांच्या पलटणीपासून सुरु झालेले स्वातंत्र्य आंदोलन ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून हाकलून देण्यापर्यंत गेले. ही घटना भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारतीयांनी पहिल्यांदाच स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि इथून पुढे भारत हा थेट ब्रिटिश राणीच्या अंमलाखाली आला.

चपाती चळवळीची माहिती आवडली का? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required