computer

चेटकीण म्हणून गावाने मलमूत्राने विटंबना केलेल्या स्त्रीने घेतली पद्मश्री पुरस्कारापर्यंत झेप!!

आजच्या आधुनिक काळात अजूनही अशी काही खेडी आहेत जिथे काही स्त्रियांना चेटकीण, डाकीण समजलं जातं. या स्त्रिया जादूटोणा करून कोणाचाही जीव घेतात अशी अंधश्रद्धा या खेड्यांमध्ये आजही आहे. त्याची शिक्षा म्हणून त्या स्त्रीला बहिष्कृत केलं जातं. घरातले सगळे तिच्याशी संबंध तोडतात, तिला वाळीत टाकतात. असाच अतिशय वाईट प्रसंग आला होता झारखंडच्या छुटनी महतो यांच्यावर. पण त्यांनी अतिशय कणखरपणे या डायन प्रथेविरोधात लढा दिला आजही त्यांचे हे कार्य चालू आहे. आज वाचूयात छुटनी महतो यांची धाडसी कहाणी.

झारखंडच्या सरायकेलामधील बिरबस गावात छुटनी महतो राहातात. त्यांचं वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झालं. धनंजय महतो असे त्यांच्या नवऱ्याचे नाव. ३ मुलं झाली. त्यांचे शिक्षण, संसार सगळं सुरळीतपणे सुरू होतं. पण १९९५ मध्ये अघटित घडलं. त्यांच्या शेजारीच राहणारी एक मुलगी आजारी पडली. ती बरी होत नव्हती. मग शेजारी म्हणू लागले की छुटनीने तिच्यावर काही करणी केली आहे. नंतर ती मुलगी मेली. मग अख्ख्या गावाने छुटनी यांना डाकीण ठरवलं. गावात पंचायत बोलावली गेली त्यात छुटनी यांना बहिष्कृत केलं गेलं. त्यांनी विरोध केला तेव्हा त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. त्यातून त्या कशाबशा वाचल्या. परत पंचायत बोलावली गेली. त्यांना ५०० रुपये दंड झाला.

रोज काही न काही घडत होतं. पंचायतीचा आदेश मानत नाही म्हणून त्यांची भर गावात अर्धनग्न धिंड काढली गेली, गावकऱ्यांसमोर त्यांच्या तोंडात मूत्र, विष्ठा भरली. ती घाण पूर्ण त्यांच्या अंगावर टाकण्यात आली. त्यावेळी त्या जिवाच्या आकांताने ओरडत होत्या पण कोणीही मदतीला आले नाही. घरचेही बघे झाले. पूर्ण गावात ‘ही बाई चेटूक, जादू-करणी करते,’ ही खबर वाऱ्यासारखी पसरली. ही एकटी आणि तिच्या विरोधात संपूर्ण गाव असं चित्र उभं राहिलं. त्यांना घरातही परत जाता आले नाही. गाववाले,पंचायत कोणीही मदतीला आले नाही. पोलिसांनी काही लोकांना अटक करून लगेच जामिनावर सोडून दिलं.

शेवटी हताश होऊन त्या माहेरी गेल्या. तिथे झालेल्या सर्व अपमानाबद्दल सांगितले. त्या गावातही काही लोकं त्यांच्या येण्याने नाराज झाले पण छुटनी यांच्या भावांनी त्यांना साथ दिली, आधार दिला. माहेरी तिला जमीन दिली, पैसे दिले. काही दिवसांनी पतिही आले. त्यांनीही पैसे दिले व साथ दिली. त्यांना या वाईट परिस्थितीतून सावरायला ५ वर्ष लागली. नंतर त्या ‘आशा’ या स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आल्या. त्यांनी डायन या प्रथेविरोधात उभे राहायचे आणि लढायचे ठरवले. त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.

गावोगावी सभा घेऊन ही प्रथा किती चुकीची आहे हे त्या मांडू लागल्या. त्यातूनच त्या हळूहळू पुढे येऊ लागल्या. स्वतःवर आलेली परिस्थिती इतर स्त्रियांच्या नशिबी येऊ नयेत यासाठी त्या खूप  काम करायच्या. न घाबरता त्या अश्या स्त्रियांना साथ देत होत्या. अनेकदा अशा स्त्रियांना घरचे परत घेत नाहीत. मग छुटनी त्यांना आश्रय देतात, जेवू-खाऊ घालतात.  त्यांना  आर्थिक स्वावलंबी करतात.

झारखंड मध्ये गेल्या वीस वर्षांत १६०० स्त्रियांना चेटकीण, डाकीण ठरवून मारले गेले आहे. २०१२ से २०१४ मध्ये १२७ महिलांची हत्या झाली. पण आज छुटनी यांच्यासोबत ६२ स्त्रिया आहेत. या सगळ्याजणी चेटकीण, डाकीण म्हणून बहिष्कृत झालेल्या, अपमानित जीवन जगणाऱ्या. आपल्या कामात छुटनी यांनी त्यांना सहभागी करून घेतलं आहे.

छुटनी या आजही लढा देत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. अनेकजण त्यांच्या कार्यात आज मदत करत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोच्च मानाचा पदमश्री पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे.

खरंच एखादी स्त्री उभी राहिली तर व्यवस्था बदलवायचे धाडस करू शकते. अन्यायाविरुद्ध तिने आवाज उठवला तर ती प्रसंगी देवीचं रूप घेते. छुटनी महतो यांच्या धाडसाला बोभाटाचा सलाम.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required