computer

कोरोनाव्हायरस, लॉकडाऊन आणि प्राणीसंग्रहालय....प्राण्यांसाठी हा लॉकडाऊन कठीण का ठरत आहे?

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोव्हीड-१९ महामारीने ग्रासले आहे. अनेक देशांनी या महामारीचा झपाट्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. लोकांच्या प्रवासावर तसेच सार्वजनिक ठिकाणच्या वावरावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक देशांतील प्रार्थनास्थळे, थिएटर्स, पर्यटनस्थळे, प्राणीसंग्रहालये बंद आहेत. या सगळ्याचा लोकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो आहे, पण हे झालं माणसांच्या बाबतीत. या लॉकडाऊनच्या बदलत्या भोवतालचा प्राण्यांवर विशेषत: प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवर काय परिणाम होत असतील याची कधी कल्पना केली आहे का? एका संशोधनानुसार या लॉकडाऊनमुळे प्राण्यांनाही मानसिक नैराश्य येत आहे. त्यांच्यातील उत्साह, भूक, कार्यक्षमता कमी झाली आहे. 

जर्मनीतही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तिथल्या सरकारने लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी केली आहे. सलग दिवसेंदिवस घरात बसल्याने लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. तसाच परिणाम प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवरही दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे ही प्राणीसंग्रहालये ओस पडली आहेत. सतत माणसांच्या वर्दळीची या प्राण्यांनाही सवय झाली होती. पर्यटक येत प्राण्यांसोबत काही गमतीजमती करत, पण अचानकच ही वर्दळ थांबल्याने हे प्राणी देखील भांबावले आहेत. जर्मनीतील क्लॉंग प्राणी संग्रहालयातील प्राणी तर नैराश्यात गेल्याने या प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांना या प्राण्यांची काळजी वाटू लागली आहे. पर्यटक नसल्याने या प्राणी संग्रहालयाचे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे इतर प्राणीसंग्रहालयांप्रमाणेच या प्राणीसंग्रहालयातही प्राण्यांच्या खाण्याचीही आबाळ होऊ लागली आहे. 

या प्राणीसंग्रहालयातील प्राण्याच्या करमणुकीसाठी थेलोनियस हर्मन याने पुढाकार घेतला. हर्मन एक पियानोवादक आहे. माणसांचे प्राण वाचवण्यासाठी बरेच जण धडपडत आहेत, पण हर्मनने या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसाठी पुढाकार घेतला. या प्राण्यांच्या मनोरंजनासाठी तो क्लॉंग प्राणी संग्रहालयात येऊन पियानो वाजवत आहे. 

त्याच्या पियानोवादनाला प्रत्येक प्राण्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्या ज्या पिंजऱ्यासमोर तो उभा राहिल त्या त्या प्राण्याने त्याला पाहून आनंद व्यक्त केला. कित्येक दिवसांत त्यांनी प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुण्या बाहेरच्या व्यक्तीला पाहिले होते. हत्ती, जिराफ, शेळ्या, माकडे, सील मासा सगळ्यांनाच या भेटीचा आनंद झाला होता. 

पियानोचा स्वर कानावर पडताच सील मासे पाण्यात नाचू लागले. सगळी कबुतरे शिस्तीने एका रांगेत बसली. हर्मनने युरोपमधील १८ देशात फिरून क्लॉंग प्राणीसंग्रहालयासाठी वर्गणी देखील गोळा केली आहे.  

जर्मनीच नाही तर जगभरातील प्राणी संग्राहालायातील प्राण्यांना एकटेपणा सतावत असल्याचे दिसून येत आहे. फिनिक्स झु मध्ये तर संग्रहालयाचे संचालकच या प्राण्यांसोबत वेळ घालवत आहेत. हत्ती, ओरांगउटांग आणि काही जे माणसाळलेले प्राणी आहेत त्यांना आता आपल्या पर्यटकांची आठवण येत आहे. 

डब्लीन झुचे संचालक लिओ ऑस्टरवेगेल सांगतात, “मी गेलो तर हे प्राणी माझ्याकडेही कुतूहलाने पाहतात. मला किंवा आणखी कुणालाही पाहिलं की त्यांना थोडं बरं वाटतं. इतक्या दिवसांत त्यांनाही माणसांची सवय झाली होती.”

न्युझीलंडच्या ओरना वाइल्डपार्क मध्येही गवारेडे आणि जिराफ त्यांच्या पर्यटकांची वाट पाहत आहेत. न्यूझीलंड मधील पोपट आणि गोरिलांना तर पर्यटकांच्या गर्दीची सवयच झाली होती. पुन्हा तशी गर्दी दिसत नाहीये. अचानक झालेल्या या बदलाने प्राण्यांच्या मानसिकतेवरही परिणाम झाला आहे. शिवाय सध्या त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च कसा उभा करायचा हाही एक या प्राणीसंग्रहालयासमोरील चिंतेचा विषय आहे. 

प्राणीसंग्रहालयातील पोपट आणि माकडे यासारख्या माणसाळलेल्या प्राण्यांना सतत कशात तरी व्यस्त ठेवावे लागत आहे. त्यासाठी या संग्रहालयाचे कर्मचारीच त्यांच्यासाठी पर्यटकांची भूमिका पार पडतात. प्राण्यांना व्यस्त नाही ठेवले तर ते निराश होतील अशी भीती या संचालकांना वाटत आहे. 

त्यांना खायला देणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे, सतत त्यांच्या भोवती घुटमळत राहणे अशा अनेक मार्गांनी त्यांना पर्यटक येत असल्याचा भास निर्माण करावा लागत आहे. असे केले नाही तर कदाचित त्यांना माणसांचा विसर पडेल की काय अशीही भीती काही प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांना वाटत आहे. 

सगळं काही सुरळीत होईल, पूर्वपदावर येईल तेव्हा माणसांची गर्दी बघून त्यांनी पुन्हा बिथरून जायला नको या उद्देशानेही त्यांना सतत माणसांच्या सहवासात ठेवले जात आहे. जेव्हा गर्दी वाढेल तेव्हा गोंधळ आणि गोंगाटही वाढेल. अचानक वाढलेल्या गोंगाटाशीही त्यांना तेव्हा जुळवून घ्यावे लागेल.

एकंदरीतच काय तर हा लॉकडाऊन माणसांसाठी तर त्रासदायक ठरत आहेच, पण प्राण्यांसाठीही त्रासदायक ठरत आहे. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required