computer

२३०० वर्षे जुना, इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षा ४ पट मोठा पिरॅमिड अनेक दशके लोकांना दिसला कसा नाही ?

जगातील सर्वात मोठा पिरॅमिड कोणत्या देशात आहे? अर्धवट झोपेत जरी कोणी पिरॅमिडबद्दल प्रश्न विचारला तर आपल्या तोंडून 'इजिप्त' देशाचेच नाव येईल. पण आपल्या सर्वांचा हा गोड गैरसमज आहे. तर मग कुठे आहे हा जगातला सर्वात मोठा पिरॅमिड? तर याचं उत्तर आहे मेक्सिको.

मेक्सिकोमधील पुएब्ला या छोट्याश्या गावात हा पिरॅमिड आहे. तिथे एका टेकडीच्या खाली तो लपला आहे. लपला आहे म्हणजे? हेच तर सांगायला आम्ही आलोय. चला तर मग जाणून घेऊयात ह्या पिरॅमिडविषयी.

हा पिरॅमिड बऱ्याच नावांनी ओळखला जातो. म्हणजे पाहा चोलुलाचा ग्रेट पिरॅमिड, पिरॅमाइड तेपानपा किंवा स्थानिक नहुआत्ल भाषेत ‘Tlachihualtepetl’ किंवा 'कृत्रिम माउंटन' म्हणूनही ओळखला जातो. चोलुलाचा हा पिरॅमिड जवळपास २३०० वर्षांपूर्वी बांधलेला आहे.

किती मोठा आहे हा चोलुलाचा पिरॅमिड?

ह्या पिरॅमिडचा पाया ४५०X४५० मीटर (१४८०X१,४८० फूट) इतका आहे. म्हणजेच तो इजिप्तमधल्या गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या आकारापेक्षा चारपट जास्त आहे. ह्या पिरॅमिडची एकूण उंची साधारण २१६ फुट इतकी आहे, तर गिझाच्या पिरॅमिडची उंची जवळजवळ ४८० फूट एवढी आहे. ह्या उंचीनुसार चोलुलाच्या पिरॅमिडचे घनफळ सुमारे ४.४५ दशलक्ष घनमीटर (१५७ दशलक्ष घनफूट) इतके आहे, तर गीझाच्या ग्रेट पिरॅमिडचे घनफळ २.५ दशलक्ष घनमीटर (८८.२ दशलक्ष घनफूट) इतके आहे. जर तुम्हाला गिझाच्या पिरॅमिडबद्दल थोडीफार कल्पना असेल तर चोलुलाचा हा पिरॅमिड किती जास्त मोठा असेल ह्याचीही कल्पना तुम्ही करूच शकता.

कधी बांधला गेला हा पिरॅमिड?

चोलुलाचा हा पिरॅमिड इसविसनपूर्व २०० व्या वर्षात बांधला गेला होता. ह्याच्या बांधकामात अनेक शतकांपूर्वीच्या ओल्मेक्स आणि टॉल्टेकसह ह्या संस्कृतींच्या खुणा देखील आढळून येतात. चोलुलाचा हा पिरॅमिड विटांनी बांधला गेल्याची शक्यता आहे. 

ह्या पिरॅमिडच्या संपूर्ण बांधकामादरम्यान अनेकवेळा राज्यकर्ते बदलत गेले. त्यामुळे ह्या पिरॅमिडच्या बांधकामात एकूण सहा थर बांधले गेले आहेत. प्रत्येक वेळी एक स्तर पूर्ण झाल्यावर कामगारांच्या नवीन गटाने बांधकाम केलेले आहे. पुरातत्वीय खात्याच्या अहवालावरून असे कळून येते. आणि चोलूलाचा ग्रेट पिरॅमिड जगातील सर्वात मोठा पिरॅमिड असण्यामागे सुद्धा हेच कारण सांगितलं जातं.

इसवीसन १३०० ते १५२१ या काळात  मध्य मेक्सिकोमध्ये अझ्टेक संस्कृती होती. कोटेझलकोएटल (पंख असलेला सर्प) हा अझ्टेकच्या मुख्य देवतांपैकी एक देव होता. अझ्टेक लोक ह्या देवाला सृष्टीचा देव मानत. कोटेझलकोएटल प्रजनन आणि पुनरुत्थानाशी जोडलेला असून नैसर्गिक आपत्ती पासूनही आपले सरंक्षण करेल अशी तिथे राहणाऱ्या लोकांची धारणा होती. चोलुला पिरॅमिडवर त्यांचे मंदिरही होते.

पुढे ऑक्टोबर १५१९ मध्ये स्पॅनिश राज्यकर्त्यांनी चोलुलावर आक्रमण केले. हे आक्रमण हा पिरॅमिड बांधून झाल्यावर साधारण १८०० वर्षांनी झाले होते. हर्नन कोर्टीस आणि त्याच्या माणसांनी प्रत्येक तासाला ३००० इतक्या लोकांना मारून टाकले होते. आणि अश्या प्रकारे तेथील जवळपास १०% जनता ह्या आक्रमणाला बळी पडली होती. जवळच्या अझ्टेकची राजधानी टेनोचिटिटलानमधील रहिवाशांनी माघार घ्यावी म्हणून त्यांनी चोलुलमध्ये राहणाऱ्या लोकांची कत्तल केली होती. 

स्पॅनिश लोकांनी आपली सत्ता आणली खरी, पण त्यांना ह्या भव्य पिरॅमिडचा मात्र अजिबात पत्ता लागला नाही.  त्याच झालं असं की पिरॅमिडवर झाडाझुडुपांची इतकी गर्दी झाली होती की स्पॅनिश सैनिकांना तो दिसलाच नाही. एखादी टेकडी असेल म्हणून त्यांनी त्या भव्य पिरॅमिडकडे साफ दुर्लक्ष केले. पुढे जाऊन त्यांनी तिथेच एक चर्चही बांधले. La Iglesia de Nuestra Señora de Los Remedios (Our Lady of Remedies Church) असे ह्या चर्चचे नाव आहे. आजतागायत हा चर्च ह्या घटनेची साक्ष देत तिथेच उभा आहे.

चोलुलाचा हा पिरॅमिड टेकडीसारखाच दिसतो. कदाचित हेच कारण असावे की तो आजही सुस्थितीत आणि सुरक्षित आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार चोलुलाचा पिरॅमिड जगातील सर्वात मोठा पिरॅमिडच नाही, तर आजपर्यंतचा पृथ्वीवर बांधला गेलेलं सर्वात मोठं स्मारक देखील आहे. इतकी वर्षे ह्या पिरॅमिडविषयी कोणालाच कल्पना न्हवती.

अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञ अडॉल्फ बँडलियर यांनी सर्वात प्रथम ह्या पिरॅमिडच्या आसपासच्या परिसराचा अभ्यास केला. १८८१ मध्ये ते चोलुला येथे आले आणि त्यांनी १८८४ साली आपला अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्या जागेविषयीचे शोध प्रसिद्ध केले. बँडेलियर यांनी केलेल्या संशोधनात त्यांना पिरॅमिडच्या आसपासच्या भागात दफन केलेले मानवी सांगाडे सापडल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. १९ व्या दशकाच्या सुरूवातीस जेव्हा तेथील स्थानिकांनी जवळच रुग्णालय तयार करण्यास सुरवात केलं तेव्हा ह्या पिरॅमिडचा शोध लागला. 

पुढे १९३१ साली इग्नासिओ मार्क्विना ह्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने संशोधन सुरू झाले होते. त्यांनी तिथे ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला. आजही पर्यटकांना ८०० मीटरपर्यंत ह्या बोगद्यामध्ये जाण्याची मुभा आहे. दर वर्षी जवळपास २,२०,०००  पर्यटक चोलुलाला भेट देतात.

तर वाचकहो, जर कोविड नंतर तुम्ही कुठे ट्रिपसाठी जाण्याचे नियोजन करत असाल तर मेक्सिकोमधला हा चोलुलाचा पिरॅमिड पाहणं खूप रोमांचक असेल. मग जाणार का मेक्सिकोला?

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required