कॅनडाचे हे राज्य १०० टक्के उंदीर-मुक्त कसे झाले? त्यांनी उंदरांना मारण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला?
उपद्रवी उंदरांना तर प्रत्येकजण वैतागलेला आहे. उंदरांना हुसकावून लावण्यासाठी कोणकोणते प्रयोग केले जात नाहीत सांगा. अगदी सापळे लावण्यापासून ते त्यांना औषध घालण्यापर्यंत कित्येक पर्याय अवलंबले जातात तरीही, उंदीर काही हटता हटत नाहीत. अगदी वाघाच्या मावशीलाही हे उंदीर घाबरत नाहीत. बिनधास्त घरातून दारातून फिरत असतात. शेतातील पिकाची साठवलेल्या धान्याची नासाडी करत राहतात. कॅनडातील आल्बेर्टा राज्याने तर या उंदराला इतकं गांभीर्याने घेतलंय की इथे उंदीर दिसला रे दिसला की त्याला मारण्याची जोरदार तयारी सुरु होते. कॅनडातील हे राज्य उंदीर मुक्त राज्य असल्याचे जाहीर करून आता जवळपास सत्तर वर्षे पूर्ण होतील. उंदीर मुक्त असलेल्या या राज्याने उंदरावर असा कोणता रामबाण उपाय शोधला असेल बरे? चला जाणून घेऊया या लेखातून!
ध्रुवीय प्रदेश सोडल्यास उंदीर आणि तत्सम प्राण्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. याला अपवाद आहे ते फक्त अल्बेर्टा राज्य. पृथ्वीवरील हा एकमेव मोठा प्रदेश असेल जिथे उंदीर नाही. उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अल्बेर्टा राज्याने खूप कडक यंत्रणा राबवली आहे. आता हा प्रदेश उंदीर मुक्त आहे म्हणजे, इथे एकही उंदीर किंवा त्याचे कुटुंब राहत नाही. मात्र, बाहेरच्या प्रदेशातून आलेला एखादा घुसखोर उंदीर इथे सापडू शकतो. इथल्या कायद्यानुसार इथे उंदरांना प्रवेश बंदी आहे. घुसखोर उंदीर जरी आला तरी त्याला शोधून शोधून मारले जाते.
उंदराविषयी १९४२ पासूनच या राज्याने कडक धोरण राबवले आहे. पिकांना आणि शेतीला धोकादायक ठरणारा प्राणी नष्ट करण्याचा कायदाच इथल्या सरकारने आणला. फक्त उंदीरच नाही तर असे जे काही कीटक असतील ते सगळे या कायद्याअंतर्गत नष्ट करण्याची परवानगी देण्यात आली. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि सामान्य नागरिकालाही अशा उपद्रवी कीटक मारण्याचे अधिकार देण्यात आले. फक्त अधिकारच नाही तर, एखाद्या शेतमालकाच्या शेतात जर उंदीर सापडला तर त्याला दंडही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे स्वतःच्याच काय पण शेजारच्याच्या शेतात जरी उंदीर दिसला तरी लोक थेट पेस्ट कंट्रोल अथोरीटीला कळवू लागले.
१९५० पासून प्रत्येक महानगर पालिकेत एक कटक नियंत्रक अधिकारीच तैनात करण्यात आला. उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी कोणकोणते उपाय राबवता येतील यासंबधी चर्चा घडवून आणण्यासाठी या राज्याने १९५१ मध्ये “अल्बेर्टा राज्यातील उंदीर नियंत्रण प्रकल्प” नावाची एक परिषदच आयोजित केली. अर्थात, नेहमीप्रमाणे त्यांनी या परिषदेत झालेली चर्चा कागदापुरती मर्यादित न ठेवता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही केली. या परिषदेत कोणकोणते ठराव पास करण्यात आले त्याची यादी करून ते रेल्वे स्टेशन, शाळा, पोस्ट ऑफिस, इतकेच काय अगदी घरोघरी वाटण्यात आले. उंदीर नियंत्रण हा या राज्यातील कळीचा मुद्दा बनला होता.
यासाठी तब्बल २७०० शेतांना या कटक नियंत्रक अधिकाऱ्यांनी स्वतःहून भेट दिली आणि या शेतावरील मालकाच्या ८००० इमारतींचे पेस्ट कंट्रोल करण्यात आले. यासाठी आर्सेनिक ट्रायऑक्साईड सारखे घातक रसायन वापरण्यात आले. हे रसायन फक्त उंदीर किंवा किटकांसाठीच घातक असते असे नाही तर मानवी जीवालाही यापासून धोका होऊ शकतो हे माहीत असूनही अल्बेर्टा राज्याने हे फाजील धाडस करून दाखवले. काही शेत मालकांना तर याची कल्पनाही देण्यात आली नाही की कीटकनाशकाच्या नावाखाली त्यांच्या इमारतीत आणि शेतातून कोणते रसायन फवारले जात आहे, काहींना फक्त एवढाच दिलासा देण्यात आला की, यामुळे तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या जीवाला काहीही धोका होणार नाही. अर्थातच ही एक शुद्ध थाप होती. याचे परिणाम व्हायचे तेच झाले काही ठिकाणी पोल्ट्री, जनावरे आणि पाळीव प्राण्यांवर याचा परिणाम झाला आणि मोठ्या संख्येने हे प्राणी मृत्युमुखी पडले.
शेवटी १९५३ साली फक्त उंदरांवर परिणामकारक ठरेल अशा वॉरफ्रेन या औषधाचा शोध लागला आणि तेव्हापासून उंदरांसाठी म्हणून हे खास कीटकनाशक वापरले जाऊ लागले. आर्सेनिक पेक्षा हे नक्कीच कमी धोकादायक होते. उंदीर नियंत्रण करणाऱ्या विभागाला दरवर्षी भरपूर निधी दिला जाऊ लागला. दरवर्षी संपूर्ण राज्यातून एकदा तरी उंदरांचे परीक्षण केले जाऊ लागले. जिथे उंदीर असण्याची शक्यता होती तिथे कधी स्फोट घडवून आणले जात, कधी कीटकनाशक फवारले जाई तर कधी, एकेक करून उंदरांना गोळ्या घातल्या जात. त्यांच्या बीळांचाच नायनाट करण्यासाठी म्हणून संपूर्ण जमीनच बुलडोझर लावून नांगरली जाई. एखाद्या इमारतीत उंदीर दिसला तर तो उंदीर मारण्यासाठी संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यासही हे कीटक नियंत्रक अधिकारी मागेपुढे पाहत नसत.
अगदी प्रयोगासाठी लागणारे पांढरे उंदीरही इथे निषिद्ध आहेत. फक्त विद्यापीठे, प्रयोगशाळा, कॉलेजेस, प्राणीसंग्रहालये, यांनाच असे पांढरे उंदीर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना मात्र ही मुभा अजिबात नाही. जर कुणाकडे असा उंदीर आढळलाच तर त्याला चक्क ५००० डॉलरचा दंड भरावा लागू शकतो.
जणू काही या राज्याने उंदराविरुद्ध एक महायुद्धच पुकारले होते. दरवर्षी उंदीर दिसण्याचा शंभर एक तक्रारी तरी या कीटक नियंत्रक अधिकाऱ्याकडे जमा होतात, पण प्रत्यक्षात ते जमिनीत बीळ करून राहणारे वेगळेच प्राणी निघत असत, आता शेतकरी तरी काय करणार बिचारे त्यांनाही दंड भरण्याची भीती होतीच ना, त्यामुळे उंदीरच काय पण त्या आकाराचा कोणताही प्राणी दिसला की, ते न चुकता कीटक नियंत्रण विभागालाच कळवतात.
आता उंदीर हा निश्चितच एक उपद्रवी प्राणी आहे. शेतातील पिकांचे, कोठारातील धान्याचे नुकसान करणारा हा उंदीर काहीप्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा करण्यासही कारणीभूत आहेच. तरीही उंदराविरुद्ध असे युद्ध पुकारणे किती सयुक्तिक वाटते?
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी