computer

कार्टेल म्हणजे काय? बियर कार्टेलने ग्राहक आणि सरकार या दोघांना कसं लुबाडलं?

सर्वसाधारण बाजारपेठेत व्यापार चालत असतो तेव्हा एकाच प्रकारचे उत्पादन चार वेगवेगळ्या कंपन्या विकत असतात.  त्यामुळे बाजारात वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण होते. वेगवेगळ्या स्कीम ग्राहकांना दिल्या जातात. लक्ष वेधून घेणार्‍या जाहिराती तयार केल्या जातात. त्या  वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. एक ना दोन, अनेक क्लुप्त्या वापरून ग्राहक आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केले जातात. आपल्या रोजच्या ओळखीचे उत्पादनापैकी एक म्हणजे कपडे धुण्याची पावडर-युनीलिव्हर, प्रॉक्टर अँड गँबल, निरमा आणि असंख्य इतर छोट्या कंपन्या बनवत असतात. या सगळ्याच कंपन्या बाजारातील विक्रीचा जास्तीतजास्त हिस्सा मिळवण्यासाठी धडपडत असतात. थोडक्यात सगळ्या कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपल्या परिचयाचे चित्र आहे.

आता बाजारपेठेतल्या  एक वेगळ्याच प्रकारची 'मैत्री 'बघू या ! या 'मैत्री'च्या अलिखित करारात एकाच प्रकारचे उत्पादन बनवणार्‍या अनेक कंपन्या सहभागी होतात. सगळ्यांची उत्पादने एकसारखी असली तरी 'दुश्मनी' बाजूला ठेवून ग्राहक आणि सरकार या दोन्ही पक्षांना कसे लुबाडता येईल याच्या योजना बनवतात. बाजाराच्या भाषेत अशा  'मैत्री 'ला कार्टेल म्हणतात.

वरवर बघता कार्टेल या शब्दाचा अर्थ शब्दकोशात व्यापारी किंवा उद्योजकांचा संघ असा वाचायला मिळेल. दिसायला हा अर्थ फारच निरुपद्रवी दिसतो  पण प्रत्यक्षात 'कार्टेल' म्हणजे अनेक उत्पादकांची 'गँग' ! अर्थात 'गँग' किंवा टोळी म्हटलं की लूट करणे हा अर्थ आपोआपच त्यात आलाच ! एरवी एकमेकांचे कट्टर स्पर्धक 'कार्टेल'बनवून करतात तरी काय?  आणि कार्टेल बनवण्याची गरज काय असते ते आज आपण समजून घेऊ या !

आता अशा एखाद्या उत्पादनाचा विचार करा ज्याची मागणी रोज काही लाखांनी वाढते आहे. ज्या वेगाने मागणी वाढते आहे त्या वेगाला लगाम घालावा अशी परिस्थिती नाही.सर्व उत्पादकांचा माल ज्या वेगाने बनतो आहे त्या वेगाने संपतो आहे. थोडक्यात आपसात स्पर्धा निर्माण होईल अशी शक्यता धूसर आहे. अशा वेळी नफेखोरीसाठी सर्व उत्पादक एकत्र येऊन त्या उत्पादनाची किंमत आपसात चक्क कट करून वाढवत नेतात किंवा ताब्यात ठेवतात. अशा पध्दतीने अनधिकृतरित्या एकत्र येऊन ग्राहकांना लुबाडणार्‍या उत्पादकांच्या टोळीला 'कार्टेल' असे म्हणतात.

असे कार्टेलींग बाजारात होत असते याची कल्पना ग्राहकाला कधीच येत नाही, कारण त्याची उत्पादनाची गरज त्याला तो विचार करण्यापासून रोखते. आपल्या परिचयाचे उदाहरण आता वाचू या. १९८० च्या नंतर देशात बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले. गावागावात इमारती उभ्या राहिल्या. शहरात मोठमोठ्या सोसायट्या उभ्या राहू लागल्या. सिमेंटची छप्परफाड मागणी बाजारात निर्माण झाली, पण सिमेंट बनवणार्‍या कंपन्या अगदी मोजक्याच होत्या. या संधीचा फायदा घेऊन सिमेंट उत्पादक कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी सिमेंटचे भाव कृत्रिमरित्या वाढवत नेले.

दुसरे उदाहरण शेअरबाजाराचे घ्या. मंदीची चाहूल लागली की मंदी करणारे ब्रोकर एकत्र येऊन बाजारात विक्रीची सुरुवात करतात. बाजार दाणकन आपटतो. त्यांना 'बेअर कार्टेल' म्हटलं जातं.

थोडक्यात 'कार्टेलींग' सगळ्याच प्रकारच्या बाजारात चाललेलं असतं. 

आज आम्ही तुम्हाला बरीच वर्षं चालत असलेल्या ज्या 'कार्टेल' ची कथा सांगणार आहोत ती वाचल्यावर तुम्ही 'घेतली' असली तरी खाडकन उतरेल. हे कार्टेल आहे 'बीअर कार्टेल' !! हो, जर तुम्ही बीअर घेणारे असाल तर गेली अनेक वर्षे हे कार्टेल तुमच्या नकळत तुम्हाला चक्क वापरत आहे.

कार्टेल साठी बीअर हे अत्यंत योग्य उत्पादन आहे. कसे ते आता बघा !

१. या उत्पादनाची म्हणजे बीअरची मागणी कधीच कमी होत नसते.

२. दर वर्षी २० लाख मुलं बीअर पिण्याच्या वयाची होत असतात. दरवर्षी मागणी फुगतच जाते.

३. अमुक एका ब्रँडची मागणी बीअरच्या स्वादावर अवलंबून असते त्यामुळे अमुक एक बीअर पिणारा रसिक शक्यतो ब्रँड बदलत नाही.

४. मौजमजेचे पेय असल्याने किमतीकडे ग्राहक फारसे लक्ष देत नाही.

५. मर्यादीत उत्पादक असल्याने प्रत्येकाला इतका मोठा धंदा मिळतो की स्पर्धेची गरजच भासत नाही.

तर सांगायचे असे की, गेली अनेक वर्षं या बीअर कंपन्या एकत्र येऊन बीअरचा भाव ताब्यात ठेवत आहेत-वाढवत आहेत. ग्राहकांच्या नकळत आपापले एरिया वाटून घेत आहेत, पुरवठा कमी जास्त करून तेजी मंदी करत आहेत.

२०१६ साली AB InBev  या बेल्जीयमच्या कंपनीने SABMiller नावाची कंपनी १०० बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतली. साहजिकच भारतात असलेली SABMillerही उप-कंपनी देखील त्यांच्या  ताब्यात आली. त्यावेळी SABMiller चे हेवर्डस आणि फॉस्टर हे दोन ब्रँड भरतात जोरात चालत होते. भारतातला कारभार हातात आल्यावर AB InBev  ने कागदपत्रं तपासायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की SABMillerचे अनेक अधिकारी इतर बीअर कंपन्यांच्या अधिकार्‍यांसोबत हातमिळवणी करून 'कार्टेलींग' करत होते. त्या इतर कंपन्या म्हणजे युनायटेड ब्रुअरीज आणि कार्ल्सबर्ग !!

या सगळ्या कंपन्यांचं साटलोटं सिध्द करणारे अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस AB InBev  च्या हाती आले. त्यानंतर सरकारी यंत्रणांनी या कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी घातल्या. कार्टेलींगचा पत्रव्यवहार असलेल्या हजारो फायली त्यांच्या हाताशी लागल्या. अनेक लॅपटॉप आणि फोनवर जवळ जवळ २ टेरा बाइट्स इतका पत्रव्यवहार मिळाला. त्यातून अनेक वेळा बीअरच्या किंमती वाढवण्याचे कारस्थान कसे रचले गेले ते उघडकीस आले. वेगवेगळ्या कंपन्यांचे १९ अत्युच्च पदावरचे अधिकारी त्यात गुंतल्याचे पुरावे पण हाताशी आले. 'कार्टेलींग' हा कायद्याने गुन्हा असल्याने AB InBev ने थेट सरकारकडे धाव घेऊन 'क्षमायाचनेचा' अर्ज भरला. त्यांनी क्षमायाचना केल्यावर इतर दोन्ही कंपन्यांनी पण २०१८ साली त्यांचे क्षमायाचनेचे अर्ज सरकारकडे दिले.

आता साहजिकच इतकी वर्षं गुन्हा केल्यावर 'क्षमायाचने'च्या अर्जाची काही किंमत आहे का ? तर याचे आश्चर्यजनक उत्तर असे आहे की हो, अशा 'सॉरी' म्हणण्याचा अर्ज कायदेशीररित्या कंपन्यांना करता येतो. इतकेच नाही तर त्यांना क्षमा पण केली जाते. हे कसे घडत असते ते ही आता समजून घ्या.

कार्टेलींग' हा गुन्हा आहे आणि त्यावर कडक नजर ठेवण्याचे काम Competition Commission of India (CCI) या सरकारी संस्थेकडे आहे. या संस्थेकडे leniency application म्हणजेच क्षमायाचना करता येते. स्वतः समोर येऊन गुन्हा कबूल केल्यास शिक्षा कमी करण्याचे अधिकार Competition Commission of India (CCI) यांच्याकडे आहेत. त्यानुसार नंतर कारवाई करण्यात आली. म्हणजेच गुन्हा करूनही माफी मिळवण्यात बीअर कंपन्या यशस्वी झाल्या.

आता या प्रकरणाची दुसरी बाजू पण बघू या ! बीअर किंवा तत्सम पेयांची किंमत वाढवताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. अशावेळी हे कार्टेल बीअरचे उत्पादन कमी करते. उत्पादन कमी झाले की सरकारी तिजोरीत येणारा पैसा कमी होतो. बीअरसारख्या पेयांच्या उत्पादनात मिळणारा अबकारी कर 'इन्स्टंट' प्रकारचा असतो. फॅक्टरीतून माल बाहेर जाण्याच्या आधीच अबकारी कर जमा झालेला असतो. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैसा वाहत राहतो. बीअर कंपन्यांनी उत्पादन कमी केले की पैशाची चणचण होते आणि मग सरकार भाव वाढवण्याची परवानगी देते. ग्राहकाला बीअरची तहान लागलेली असल्याने या कार्टेलींगकडे ग्राहकही लक्ष देत नाही. तर असे चालते कार्टेल !!

SABMiller या कंपनीच्या टेक-ओव्हरमुळे हे कार्टेल उघडकीस आले. तोपर्यंत म्हणजे २००८ पासून २०१८ पर्यंत हे कार्टेल सरकार आणि ग्राहक या दोन्हींची गेम वाजवत होते.

हे कार्टेलींगचे प्रकार बीअर पर्यंत मर्यादित आहेत तोपर्यंत त्याची झळ सामान्यांना पोहचणार नाही, पण येत्या काळात असेच कार्टेलींग व्हॅक्सिन बनवणार्‍या कंपन्यांनी केले तर ???

सबस्क्राईब करा

* indicates required