लॅपटॉपच्या जडणघडणीचा ३४ वर्षांचा इतिहास...१९७३ ते आजतागायत लॅपटॉपचं बदललेलं रूप पाहून घ्या !!
लॅपटॉप म्हणजे मांडीवर बसणारा संगणक अशी सहज व्याख्या या शब्दाची केली गेली आहे. काही वर्षांपूर्वी फक्त ऑफिसमध्ये ठराविक हुद्द्यावर काम करणाऱ्याकडे असणारा हा लॅपटॉप गेल्या वर्षभरात सगळ्यांकडेच आला. अगदी सहज, सोपा, कुठेही घेऊन जाता येणार हा लॅपटॉप प्रामुख्याने आज सगळेजण वापरतात. ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होम मुळे तो घरोघर पोहोचला आहे. पण हा लॅपटॉप आला कुठून? याचा इतिहास काय आहे? याची माहिती करून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
लॅपटॉप हा तसा शब्दच त्याचा अर्थ स्पष्ट करायला पुरेसा आहे. पण या शब्दाचा एक फुलफॉर्मही आहे हे तुम्हांला माहित आहे का? तो आहे Lightweight Analytical Platform Total Optimized Power!! त्याच्या आकारामुळे काहीजण याला नोटबुकही म्हणतात. एखाद्या ब्रिफकेससारखं दिसणारं हे प्रकरण सॅक किंवा बॅगमध्ये टाकून कुठेही प्रवास करता येतो. १९४० दरम्यान बनलेला एखाद्या बेडरुमच्या आकाराच्या कॉम्प्युटरपुढे लॅपटॉप म्हणजे अगदी सुटसुटीत प्रकार आहे. पण पहिला लॅपटॉप आजच्यासारखा सहज आणि सुटसुटीत नक्कीच नव्हता. लॅपटॉप पहिल्यांदा लाँच झाला १९८१ मध्ये. अर्थात ४० वर्षांत यात नवे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक बदल घडले आहेत. पूर्वीच्या लॅपटॉपमध्ये स्क्रीनचा आकार अगदी लहान होता, आजच्या काही मोबाईलची स्क्रीनसुद्धा त्याहून मोठी असेल. त्याचे वजन ही खूप जास्त होते. पण १९९० च्या दशकापासून लॅपटॉपच्या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत गेली आणि परिणामी लॅपटॉप संगणकांची लोकप्रियता सतत वाढत गेली.
(१९४० सालचा कम्प्युटर)
तांत्रिक जंत्री द्यायची तर आपल्या लॅपटॉपमध्ये LED स्क्रीन, टचपॅड कीबोर्ड , प्रोसेसर , मेमरी , हार्डडिस्क , माऊस आणि इतर हार्डवेअर एकत्र जोडलेले असतात. सध्या लॅपटॉपध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत. यात मॉडेल्सनुसार आणि आकार, मेमरी क्षमता, रॅम, हार्डडिस्क आणि प्रोसेसर स्पीड या सर्वांनुसार लॅपटॉपची किंमत ठरवली जाते. लिनोवो, ऍपल, कॉम्पॅक, डेल, HP, Redmi अश्या अनेक नामांकित कंपन्या लॅपटॉप बनवतात. तुमच्या गरजेप्रमाणे ३० हजारांपासून लाखांपर्यंत लॅपटॉपची किंमत असू शकते.
पहिला लॅपटॉप आयबीएम (IBM) ने एप्रिल १९८१ मध्ये लाँच केला होता. नाव होतं ओसबोर्न I (Osborne I)! अॅडम ओसबोर्न नावाच्या ब्रिटिश-अमेरिकन लेखक आणि कॉम्प्युटर डिझायनरने तो विकसित केला होता. ओसबोर्न I चं वजन होतं सुमारे १२ किलो!! आपल्या आजकालच्या लॅपटॉपचं तीन-साडेतीन किलो वजन आपल्याला असह्य होतं. ५ इंचाची स्क्रीन आणि ६४ KB RAM, दोन ५/४″ फ्लॉपी ड्राइव्ह , CP/M 2.2 ऑपरेटिंग सिस्टम होती. याची किंमतही थोडीथोडकी नाही, तर १७९५ डॉलर्स इतकी होती. आजच्या तारखेला चांगल्या कॉन्फिगरेशच्या आणि महाग समजल्या जाणाऱ्या मॅकबुक एअरची किंमतही १३०० डॉलर्सच्या आसपास आहे. म्हणजे १९८१मध्ये हा पांढरा हत्तीच होता असं म्हणायला हरकत नाही.
हळूहळू तंत्रज्ञान विकसित होत गेले. लॅपटॉप हलका होत गेला आणि किंमत कमी होत गेली. एलसीडी स्क्रिनवरून एलईडी स्क्रीन झाली. स्क्रीनचा आकारही मोठा झाला, फ्लॉपी डिस्कच काय, सीडी आणि डीव्हीडीसुद्धा कालबाह्य झाल्या. लॅपटॉप कसे अपग्रेड होत गेले याची यादी पाहून घ्या..
१९८३: Delmount magnum kookaburra
१९८८: Compaq SLT / 286
१९९०: Arima Laptop
१९९२: IBM think pad 700
२००१: Apple iBook G3
२००४- Dell Inspiration 700 m
२००७- HP Pavilion DV6000
२००८- Apple Mac book Air
२०१३- Intel Touchscreen Ultrabook
२०१७ - HP Spectre x2
यातही अनेक वेगवेगळे सेरिज/ मॉडेल आहेत. तुम्हाला आठवतोय का तुम्ही वापरलेला पहिला लॅपटॉप?
लेखिका: शीतल दरंदळे