computer

भारतात मोमोज कसे आले, कसे लोकप्रिय झाले आणि ते बनवण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घ्या!!

मोमोज म्हणले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आपल्या मोदकासारखे दिसणारे हे मोमोज खूप लवकर लोकप्रिय झाले. आता तर गल्लोगल्ली मोमोज विकणारे दिसतात. शाकाहारी मांसाहारी हे दोन्ही प्रकार खाल्ले जातात. चायनीज फूडच्या शौकीनांना तर नक्कीच हे आवडत असतील. पण तुम्हाला हे मोमोज कुठून आले आणि कोणी बनवले हे माहीत आहे काय? प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने मोमोज मिळतात. आज आम्ही तुम्हाला त्याची रंजक माहिती सांगणार आहोत.

मोमोज एका चीनी समुदायाने शिलाँगमध्ये आणले होते. ते लोक चीनमधून आले आणि येथे स्थायिक झाले. त्यानंतर या समुदायाने चायनीज फूडचा ट्रेंड सुरू केला, यात मोमोजचा विशेष समावेश करण्यात आला. चीनमध्ये मोमोजला डिमसम किंवा डंपलिंग असे म्हणतात. तिथे ते गोमांस किंवा डुकराचे मांस भरून केले जाते. त्याचबरोबर काही भागात हिरव्या भाजीपाल्यांचाही वापर करतात.
 

मोमोज हे अरुणाचल प्रदेशातही मोनपा आणि शेरदुकपेन जमातींच्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मोमो तिबेट आणि नेपाळमधली एक अतिशय प्रसिद्ध पारंपारिक डिश आहे. डोंगराळ प्रदेशात मोमोज जास्त प्रमाणात वर आवडीने खाल्ले जातात. त्यात ते लोक मोहरीची पाने आणि इतर भाज्यांचे सारण वापरतात. आरोग्यासाठी मोमोजना इथे खूप महत्त्व दिले जाते. पर्यटक ही इथे या मोमोजचा आनंद घेतात.

सर्वात स्वादिष्ट मोमोज शिलाँगमध्ये मिळतात. इथे मोमोजच्या आत मांस भरलेले असते. ते तयार झाल्यावर गरमागरम मिरच्यांबरोबर सर्व्ह केले जातात. मोमोज बरोबर मसालेदार चटणीही बरेचदा दिली जाते. भुतिया, लेपचा आणि नेपाळी समुदायांमुळे सिक्कीममध्ये मोमोज आले. त्यांच्या आहारात मोमोजचा समावेश होता. सिक्कीममध्ये बनवलेले मोमोज तिबेटी मोमोसारखेच आहेत. १९६० मध्ये मोठ्या संख्येने तिबेटी लोक त्यांच्या देशातून स्थलांतरित झाले होते. त्यामुळे मोमोजची पाककृती भारतातील सिक्कीम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि कालिम्पॉंग या डोंगराळ शहरांमध्ये पोहोचली आणि तेथून नंतर ती दिल्लीला गेली. मोमोज वाफवून आणि तळून बनवले जातात.

आजच्या काळात मोमोजला अनेक नवीन फॉर्म देण्यात आले आहेत, जे खूप कमी काळात लोकप्रिय झाले आहेत. मोमोज तळून खाण्याबरोबरच आता तंदुरी मोमोजही बनवले जात आहेत. आजकाल चॉकलेट मोमोजही बाजारात मिळतात. अगदी छोट्या गाडीवर ते मोठमोठ्या रेस्टॉरंटसमध्येही मोमोज मिळतात.
 

मोमोचा नेमका अर्थ काय आहे ?
मोमो हा चिनी शब्द आहे. याचा अर्थ आहे वाफवलेला ब्रेड किंवा रोटी. ते वाफवलेले असल्याने आणि जास्त मसालेदार नसल्यामुळे आरोग्यदायी मानले जातात. काही ठिकाणी फक्त मांसाहारी मोमोज मिळतात, तर काही ठिकाणी शाकाहारीही मिळतात. असे म्हणतात पहिले मोमोज तिबेटमध्ये बनवले गेले आणि तिथे खूप प्रसिद्ध झाले.

वेगवेगळ्या ठिकाणांहून मोमोज आज सगळीकडे पोहोचला आहे. तो नक्की कुठून आला हे जरी खात्रीने सांगता येत नसले तरी ते अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून विकतात आणि खवय्ये ते आवडीने खातात.

तुम्हाला आवडतात का मोमोज? कमेंट करून जरूर सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required