computer

भारत आणि त्याच्या ८ आंतरराष्ट्रीय सीमा  : अभिमान तर वाटणारच...

सद्या भारत आणि चीनदरम्यान सीमावाद चिघळत चाललाय मंडळी. दुसरीकडे भारत आणि पाकीस्तान सीमेवरही नेहमीच तणावाचं वातावरण असतं. २९ गणराज्यं आणि ७ केंद्रशासित प्रदेशांनी युक्त अशा आपल्या विशाल राष्ट्राला ८ शेजारी देशांनी वेढलेलं आहे. आज आपण भारताच्या या ८ आंतरराष्ट्रीय सीमांबद्दल जाणून घेणार आहोत. 

भारत - पाकिस्तान सीमा

जगातल्या सर्वात जास्त तणावग्रस्त आंतरराष्ट्रीय सीमांच्या यादीत या बॉर्डरला वरचं स्थान मिळतं. या सीमेची एकूण लांबी ३३२३ किलोमीटर्स आहे आणि या सीमेवर भारतातली गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू - काश्मीर ही ४ राज्ये वसलेली आहेत.३३२३ किलोमीटर्सपैकी १२२५ किलोमीटर्स सीमा ही एकट्या जम्मू काश्मीर राज्याने व्यापलेली आहे. या सीमेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगळी नावे दिलेली आहेत. लाईन अॉफ कंट्रोल हा सीमेचा भाग काश्मिर आणि पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मिरला वेगळं करतो, वाघा बॉर्डर ही भारतातील पंजाब आणि पाकव्याप्त पंजाबला विभागते, तर झिरो पॉईन्ट नावाची सीमा राजस्थान आणि गुजरातला पाकिस्तानी सिंध प्रांतापासून वेगळं करते. याच सीमेवरून अवैध तस्करी, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचा धोका भारताला सर्वाधिक त्रासदायक ठरतो. म्हणूनच या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे दिली गेलीय. या बॉर्डरवर BSF च्या ६०९ चौक्या आहेत.

लाईन अॉफ कंट्रोल : काश्मिर (स्त्रोत)

वाघा बॉर्डर (स्त्रोत)

राजस्थान बॉर्डर (स्त्रोत)

गुजरात बॉर्डर (स्त्रोत)

 

भारत - अफगाणिस्तान सीमा

ही सीमा अत्यंत लहान आहे. ही नेमकी जम्मू काश्मीरच्या त्या भागात येते जिथं सद्या पाकीस्तानने कब्जा केलाय. काश्मिरच्या या भागाला PoK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखलं जातं. या भागावर भारतही आपला हक्क सांगतो. पण सद्यातरी हा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताचा की पाकिस्तानचा हे ठरत नाही, तोपर्यंत भारताला अफगाणी सीमा आहे की नाही हे सांगणंही कठीण आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असणार्‍या या सीमेलाच डुरण्ड रेखा म्हणून ओळखलं जातं.

नकाशातील हिरवा भाग हा पाकव्याप्त काश्मीरचा आहे (स्त्रोत)

भारत - चीन सीमा

भारत आणि चीन या दोन देशांमधली ही सीमा ३३८० कीलोमीटर्स लांबीची आहे आणि  ती जम्मू - काश्मीर, अरूणाचल प्रदेश, आणि हिमाचल प्रदेश या तीन भारतीय राज्यांलगत आहे. अरूणाचल प्रदेश व चीन यादरम्यान असणार्‍या सीमारेषेलाच मॅकमोहन रेषा म्हटलं जातं. ही मॅकमोहन रेषा हेन्री मॅकमोहन या ब्रिटिश अधिकार्‍याच्या पुढाकारातुन १९१४ मध्ये आखण्यात आली. यासाठी ब्रिटिश भारतीय सरकार आणि तिबेट सरकारमध्ये सभा झाली होती. पण या सभेला चीन गैरहजर असल्याने आजही चीनकडून या सीमारेषेबद्दल विवाद निर्माण केला जातो.

हिमाचल प्रदेश - चिन बॉर्डर (स्त्रोत)

नाथुला (सिक्कीम) - चिन सीमा (स्त्रोत)

लडाख बॉर्डर (स्त्रोत)

भारत - बांग्लादेश सीमा

भारत आणि बांग्लादेशदरम्यान सुमारे ४०९६ कीलोमीटर्स लांबीची भुसीमा आहे. पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम या भारतीय राज्यांमध्ये ही सीमारेखा येते. यापैकी सर्वाधिक २२१६ किलोमीटर्स लांबीचीसीमा ही पश्चिम बंगाल राज्यात आहे. भारतातून गंगा, ब्रम्हपुत्रासोबतच जवळपास ५४ नद्या बांग्लादेशमध्ये जातात, आणि बहुतांश नद्यांनाही सीमेचाच दर्जा दिला गेलाय. या सीमेवरही घुसखोरी, अवैध तस्करी आणि दहशतवादी कारवाया होत असल्याने इथेही BSF तैनात करण्यात आली आहे. नुकताच भारत आणि बांग्लादेशमध्ये जमिनींच्या अदलाबदलीचा करार झालाय आणि त्यामुळं दोन्ही देशांतील सीमेसंबंधीत समस्या निकालात निघाल्या आहेत.

मेघालय - बांग्लादेश बॉर्डर (स्त्रोत

पश्चिम बंगाल - बांग्लादेश सीमा (स्त्रोत)

मिझोरम - बांग्लादेश बॉर्डर (स्त्रोत)

भारत - म्यानमार बॉर्डर

भारत आणि म्यानमार दरम्यान १६४३ कीलोमीटर्स लांबीची सीमारेखा आहे आणि ती अरूणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मणीपुर आणि मिझोरम या राज्यांलगत येते. यापैकी ५२० किलोमीटर्स लांबीची सीमा ही अरूणाचल प्रदेशात येते. या सीमेवर भारतीय सेनेच्या आसाम रायफल्सकडून नियंत्रण ठेवलं जातं.

मनीपुर - म्यानमार बॉर्डर (स्त्रोत)

नागालॅन्ड - म्यानमार सीमा (स्त्रोत)

भारत - श्रीलंका सीमा

भारत आणि श्रीलंकेदरम्यानची सीमा ही जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय सीमांपैकी एक आहे. भारताच्या दक्षिण-पुर्व समुद्र किनार्‍यावरील रामेश्वरम बेटाला आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडणारा हा ३० कीलोमीटर्स लांबीचा रामसेतू आहे. त्यालाच अॅडम्स ब्रिजही म्हटलं जातं. भौगोलिक रचनेनुसार चुनखडीने बांधलेला हा सेतु एकेकाळी भारत आणि श्रीलंकेला जोडणारा दुवा होता जो आज पाण्याखाली गेलाय.

(स्त्रोत)

पाण्याखाली गेलेला रामसेतु (स्त्रोत)

भारत - नेपाळ सीमा

भारत आणि नेपाळ दरम्यान असणारी सीमारेखा ही १२३६ किलोमीटर्स लांबीची आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि सिक्कीम या राज्यांना लागून ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि ती चक्क दोन्ही बाजूंनी ये-जा करण्यासाठी खुली आहे. दोन्ही देशांतले नागरीक विना पासपोर्ट आणि व्हिसा घेताही सीमा ओलांडून भारतात किंवा नेपाळमध्ये जाऊ शकतात, राहू शकतात आणि कामही करू शकतात. भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी सोनौली, बीरगंज आणि काकरभीटा हे तीन प्रमुख मार्ग आहेत.

काकरभीटा - दार्जिलिंग प्रवेशमार्ग (स्त्रोत)

बीरगंज - बिहार प्रवेशमार्ग (स्त्रोत)

सोनौली (उत्तर प्रदेश) - नेपाळ प्रवेशमार्ग (स्त्रोत)

भारत - भुतान सीमा

भारत आणि भुतानदरम्यानची सीमा ही ६९९ किलोमीटर्स लांबीची आहे, जी सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांलगत येते. यापैकी सर्वाधिक लांबीची २६७ किलोमीटर्सची सीमा ही आसामची आहे. भारत - भुतान सीमा हा एकमेव मार्ग आहे जिथून भूतानमध्ये प्रवेश करता येतो. कारण चिनची संपूर्ण सीमा ही बंद केलेली आहे. भारतातून जयगांव या एकमेव पॉईन्टवरून भुतानमध्ये प्रवेश करता येतो. या सीमेचं रक्षण भारताचे सशस्त्र सीमा दल करतं.

​​​

सिक्कीम - भुतान प्रवेशद्वार (स्त्रोत)

अरूणाचल प्रदेश - भुतान प्रवेशद्वार (स्त्रोत)

 

सर्वाधीक लांब आंतराष्ट्रीय सीमा लाभलेल्या देशांच्या यादीत रशिया आणि चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सद्या पाकिस्तान, चीन, म्यानमार, बांगलादेश अशा अनेक सीमांवर भारताला त्रासदायक ठरणाऱ्या हालचाली होत असतात. पण तरीही आपला देश शांततापूर्ण मार्गाने प्रत्येक शेजारी देशाशी सलोख्याचे संबंध जोडून समर्थपणे उभा आहे. वाटतोय ना अभिमान ? मग म्हणा... जय हिंद !!

सबस्क्राईब करा

* indicates required