तपासकथा : अतिहुषारीने १५० घरफोड्या करवणाऱ्या बाईची गोष्ट, पण शेवटी गुन्हेगार सापडतोच!!
क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडियामधून तुम्ही पोलीस तपासाच्या कथा पहिल्याच असतील. या कथा विशेषतः खून आणि बलात्कार या दोन प्रकारच्या गुन्ह्यांभोवती फिरताना दिसतात. खरं तर पोलिसांकडे येणारे गुन्हे हे अनेक प्रकारचे आणि हरतर्हेचे असतात. अशाच काही निवडक पोलीस तपास कथा आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. यापैकी एक कथा आज वाचूया.
२००४ची गोष्ट आहे. मुंबई घरफोड्या वाढल्या होती. दोन चार दिवस झाले की कुठे ना कुठे घरफोडी व्हायची. पोलीस काय करताहेत याचा नागरिक विचार करत होते. वर्तमानपत्रात रोज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोरडे ओढले जात होते. शेवटी पोलिसांनी कंबर कसली.
तपास सुरु केला. या घरफोड्या होतात कश्या? कुठे, किती पैसे ठेवले आहेत? घरातले लोक बाहेर आहेत ते यांना कसं समजतं? काहीच कळायला मार्ग नव्हता. पोलिसांनी वेगवेगळी पथकं नेमली, नाकाबंदी करायला सुरुवात केली. यापैकी एका नाकाबंदी पथकाचे प्रमुख होते दिनेश कदम.
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवून ते तपासणी करत होते. एका गाडीत काहीजण बसले होते. त्यांना बघून कदम यांन संशय आला. त्यांनी गाडी थांबवली. तपासाला सुरुवात केली. गाडीत चार माणसं बसली होती. त्यांच्याजवळ घरफोडीचं सामान मिळालं. त्यांना ताब्यात घेण्यात आलं. प्रश्न उत्तरं सुरु झाली.
‘काय रे?’ एकाला कदम यांनी विचारलं, ‘कुठे निघाला होतास घरफोडीला ?’
‘माहित नाही.’
'घरफोडी करायला निघालास आणि माहित नाही?’
‘खरचं माहित नाही साहेब. मॅडम घेऊन जातात तिथे आम्ही जातो आणि घरफोड्या करतो.’
‘कोण मॅडम?’
‘रजिया मॅडम.’
‘तुम्ही कुठून आलात?’
‘आम्ही नॉर्थमधून आलो साहेब.’
‘कितीजण आलात?’
‘पाचजण.’
‘किती दिवस झाले?’
‘दोन महिने झाले.’
‘या दोन महिन्यात कुठे घरफोड्या केल्यात?’
‘आम्हाला पत्ता खरंच माहिती नाही साहेब.’
‘कुठे घरफोड्या केल्या हे माहित नाही? हे कसं शक्य आहे?’
‘आम्ही चार घरफोड्या केल्या साहेब, पण कुठे केल्या त्या आम्हाला सांगता येणार नाही.’
‘का?’
‘मॅडम आम्हाला कार मधून घेऊन जायच्या. ज्या बिल्डींगमध्ये घरफोडी करायची असेल त्या बिल्डींजवळ घेऊन जायच्या, आम्हाला फ्लॅट नंबर सांगायच्या. आम्ही कटावणी वगैरे घेऊन जायचो. फ्लॅटमध्ये घुसून सेफ, कपाटं वगैरे फोडायचो. माल घेऊन यायचो.’
‘तो माल कुठे विकायचात?’
'माहिती नाही साहेब, मॅडम तो विकायच्या.’
‘कमाल आहे. चोरी कोणत्या विभागात केली ते माहित नाही. माल कुठे विकला ते माहित नाही? खोटं बोलता का?’
‘नाही साहेब, देवाशपथ साहेब. आम्ही खरंच सांगतो आहोत. मॅडम आम्हाला ज्या भागात चोरी करायची तो पत्ता सांगत नव्हत्या, कारण पोलिसांनी कधी पकडलं तर आम्हाला पत्ता सांगता येनार नाही म्हणून काळजी घ्यायच्या. आम्हाला एकसुद्धा दागिना देत नव्हत्या साहेब.’
‘म्हणजे?’
‘घरफोडी केली की आम्हाला घेऊन जायच्या. सर्वांना नागडं करून तपासणी करायच्या.’
‘कसली तपासणी?’
‘कोणी चड्डीत, अंडरपँटमध्ये सोनं लपवलं नाही याची.’
‘का?’
‘कारण आम्ही एखादा दागिना चोरला आणि सोनाराला विकला तर सोनार कधी तरी पकडला जाणार होता. मग पोलीस आमच्यापर्यंत पोहोचले असते.’
‘पण तुम्हाला इकडे तिकडे फिरताना कोणी पकडलं असतं तर?’
‘कसं पकडणार साहेब? त्या आम्हाला ब्लॉकमध्ये कोंडून ठेवायच्या. दारू, गांजा, अफू जे लागेल ते पुरवायच्या – आम्ही मुंबईत आल्यापासून बाहेर कधी गेलोच नाही. ज्या दिवशी घरफोडी करायची असेल त्या दिवशी फक्त त्या आम्हाला बाहेर घेऊन येतात.’
‘मग तुम्हाला पैसे किती मिळतात?’
‘आमचं काँट्रॅक्ट ठरलेलं आहे. जेवढ्या रक्कमेची घरफोडी होईल त्याच्या दहा टक्के रक्कम त्या आम्हाला देतात. दहा लाखाचा माल असेल तर एक लाख आमचे.’
अशी ही रजिया मॅडम. जे घरफोड्या करायचे त्यांना आपण घरफोडी कुठे करतो आहोत हे माहित नसायचं. माल कुठे विकला हे माहित नसायचं.
गाडीत एक सिगरेटचं पाकीट सापडलं. त्यावर एक मोबाईल नंबर लिहिला होता. त्याचा सीडीआर काढून कदम यांनी रजियाचा पत्ता शोधून काढला. तिला ताब्यात घेतलं. ती महाराणी सारखीच दिसायची, वागायची. बोलणं पण मोठं रुबाबात होतं. कदम यांनी गोड गोड बोलून तिच्याकडून सर्व माहिती काढून घेतली.
‘रजिया, तू आतापर्यंत किती घरफोड्या केल्यास?’
‘शंभरच्यावर साहेब, नक्की आकडा आठवत नाही.’
‘तुझी माणसं घरफोडी करायला जायचे त्या वेळेस कोणाला संशय आला नाही?’
‘कसा येणार साहेब? मी वॉचमनशी गप्पा मारत असायचे. तेवढ्या वेळात ते काम उरकून घ्यायचे.’
‘पण कोणत्या फ्लॅटमध्ये घरफोडी करायची हे तू कशी ठरवायचीस.’
‘मी आधी कोणत्या सोसायटीत जायचं ते ठरवायचे. ज्या सोसायटीत एसी लावले असतील त्या सोसायटीत श्रीमंत लोक असणार याचा अंदाज यायचा. जे दार बंद असेल त्याची मी बेल वाजवायचे. दार उघडलं गेलं तर कोणाचा तरी पत्ता विचारायचे. एक दोनदा बेल वाजवून दार उघडलं गेलं नाही, तर घरात कोणी नाही हे लक्षात यायचं, मी तो ब्लॉक नंबर आणि ब्लॉकच्या मालकाचं नाव लिहून घ्यायचे. माझ्या माणसांना द्यायचे.’
‘तू एवढ्या घरफोड्या केल्यास, पण पकडली कशी गेली नाहीस?’
'घरफोड्या करणारे पकडले कसे जातात? एक तर त्यांचा कोणतीतरी माणूस टोळीच्या प्रमुखाचा पत्ता सांगतो म्हणून. मी माझ्या माणसांना मी कुठे राहते, घरफोडी कुठे करायची ते सांगत नव्हते. दुसरं म्हणजे, घरफोड्या करणारे घरफोडीत मिळालेलं सामान कुठेतरी विकायला जातात आणि पकडले जातात. मी त्यांना कधीच महाग वस्तू किंवा सोनं दिलं नाही. तिसरं कारण म्हणजे टोळीतला माणूस कधी ना कधी फुटतो. त्याला जास्त पैशाची हाव निर्माण होते. म्हणून मी चार पाच महिन्यांनी माणसं बदलायचे. ही माणसं पाठवून द्यायची. दुसरी आणायची. त्यांच्या अपेक्षा वाढल्या की त्यांना पाठवून द्यायचं. परत युपी -बिहारमधून दुसरी माणसं मागवायची. पण तरी माझं बॅडलक. त्या दिवशी तुम्ही ती कार पकडली आणि आम्ही पकडलो गेलो.’
‘तुझ्या नातेवाईकांपैकी यात कोण आहे.?’
‘आमची सगळी फॅमिलीच आहे साहेब. मी, माझा नवरा, मुलगा, सून सर्व याच धंद्यात आहोत.’
‘घरफोड्या कुठे कुठे केल्या?’
‘मुंबईत केल्या, दिल्लीत केल्या.’
अशी ही रजिया शेख आणि तिचा नवरा सुलतान.
सर्व पुरावे गोळा करून कदम यांनी कोर्टात केस दाखल केली. तिथेही हिचा रुबाब होता. पोलिसांवर तर तिने अनेक आरोप केले. "मला मारलं. माझ्यावर खोट्या केसेस केल्या. माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.." तिच्याशी बोलायला पोलीसही घाबरायचे. एकदा हवालदाराच्या अंगावर गरम चहा फेकला. न्यायाधीशांनी तिला शिक्षा सुनावल्यावर तिनं त्यांच्या अंगावर चप्पल मारली. तिला तीन वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा भोगून ती बाहेर आली. परत पकडली गेली. परत जेलमध्ये गेली.
आपल्याकडचे कायदे विचित्र आहेत. १५० घरफोड्या करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा. म्हणजेच एका घरफोडीची शिक्षा सात दिवस. अशा शिक्षा मिळतात म्हणून आरोपी बिनधास्त गुन्हे करत असतात. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत नाही. परत जामीन मिळवून पळून जाणारे आरोपी वेगळेच.
या पोलीस कथा लेखक अरुण हरकारे यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या परवानगीने घेण्यात आल्या आहेत. त्या जशाच्या तशा इथे वाचकांपुढे दिल्या आहेत. या कथा बोभाटाला शेअर करण्याची परवानगी दिली त्याबद्दल अरुण हरकारे यांचे आभार.