computer

डायथलोव्ह पासच्या ९ मृत्यूंचं गूढ: ६० वर्षांपूर्वी घडलेल्या या मृत्यूंचं रहस्य काय आहे?

गोष्ट रशियामधली आहे. २८ जानेवारी १९५९ साली उरल स्टेट टेक्नीकल युनिव्हर्सिटीत शिकणारे १० विद्यार्थी उरल पर्वतावर हायकिंगसाठी गेले होते. हे सगळेच प्रशिक्षित गिर्यारोहक होते. ठरवल्याप्रमाणे त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचं होतं. प्रवासाच्या सुरुवातीलाच टीममधला युरी युदिन नावाचा तरुण आजारी पडला. त्यामुळे त्याला मागे ठेवून टीम पुढे गेली. युरी हा या मोहिमेतला जीव वाचलेला एकमेव विद्यार्थी आहे.  उरलेल्या ९ जणांचं पुढे काय झालं त्याचीच ही कथा.

उरल पर्वतावर गेलेले हे ९ गिर्यारोहक परतलेच नाहीत म्हणून त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम आखण्यात आली. या शोध मोहिमेतील अधिकाऱ्यांना अत्यंत विचित्र गोष्टी आढळल्या. ज्या तंबूमध्ये हे ९ जण राहिले होते तो आतून फाडण्यात आला होता. तंबूबाहेर अन्न म्हणजे शिधा, कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू पडलेल्या होत्या. तंबू सापडला पण विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता. शोध घेतल्यावर ९ पैकी ५ जण तंबूपासून १.६ किलोमीटर लांब मृतावस्थेत आढळले. त्यातले दोघे  शेकोटीजवळ होते आणि त्यांचे हात भाजलेले होते. उरलेले तिघे ३० मीटर अंतरावर आढळले. असं वाटत होतं की हे तिघे मरण्यापूर्वी त्यांच्या तंबूकडे परतत होते.

या पाचही जणांची अवस्था वाईट होती. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. काहींकडे बूट नव्हते, तर काहींच्या पायात फक्त मोजे होते. त्यातल्या रुस्तम स्लोबोदिन या  तरुणाच्या डोक्याला मार लागल्याचं आढळून आलं, पण त्याचा मृत्यू थंडीने झाला असल्याचं पुढे सिद्ध झालं.उरलेले ४ जण सापडायला ३ महिने गेले. आधी सापडलेल्या ५ जणांनी आधीच बुचकळ्यात पाडलं होतं. त्यात भर म्हणजे या चौघांच्या मृतदेहांनी त्यांच्या मृत्युचं गूढ आणखी वाढवलं.  हे चौघे ओढ्यात साचलेल्या १३ फूट बर्फात गाडले गेले होते. विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगावर शेकोटीजवळच्या आपल्या मित्रांचे कपडे होते. यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की या चौघांनी थंडीपासून वाचण्यासाठी आपल्या मृत मित्रांच्या कपड्यांची उब घेतली होती. पण शेवटी ते तिथून हलले आणि ओढ्यात पडून त्यांना मृत्यू आला. आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे एका विद्यार्थ्याच्या छातीला दुखापत झाली होती. कार अपघातात व्हावी तशी ही दुखापत होती. दुसऱ्या एकाच्या तोंडात जीभच नव्हती.

पुढच्या तपासात हे रहस्य आणखी अनाकलनीय होऊ लागलं. या सगळ्यांच्या कपड्यांमध्ये किरणोत्सर्जन झाल्याचं (radioactive)आढळून आलं. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या भागात त्यांचा मृत्यू झाला तिथे कोणता वन्यप्राणी असल्याचं आणि त्याने हल्ला केल्याचा कोणताच पुरावा सापडला नव्हता. हे रहस्य उकलण्याची एक आशा होती- ती म्हणजे कॅमेरा. ९ पैकी एकाने तंबू सोडण्यापूर्वी आपला कॅमेरा सोबत नेला होता. दुसऱ्या एकाने घेतलेल्या फोटोत एक विचित्र गोष्ट दिसून आली. फोटोत काहीतरी चमकत होतं.  त्यांच्या मृत्युपूर्वीचा हा क्षण होता. फोटोत नेमकं काय चमकत होतं ? कोणालाच कधी समजू शकलं नाही. एवढंच काय, आजवर त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचं ठोस उत्तर मिळालेलं नाही. नेहमीप्रमाणे अशा गूढ गोष्टींची उकल करताना जे निष्कर्ष काढले जातात तसेच या घटनेतही काढण्यात आले. यापैकी तुम्हाला कोणता निष्कर्ष पटतोय ते तुम्हीच ठरवा..

(हाच तो शेवटचा फोटो)

या ग्रुपवर कोणीतरी हल्ला केला असावा असा एक निष्कर्ष काढण्यात आला, पण ज्या ठिकाणी त्यांची प्रेतं सापडली तिथे फक्त ९ माणसांच्या पायांचे ठसे आढळले होते. हे ठसे मृत व्यक्तींचे होते असं गृहित धरण्यात आलं. प्राणी किंवा इतर कोणी तिथे फिरकल्याचं आढळलं नव्हतं.

दुसरा निष्कर्ष असा काढण्यात आला, की या ९ जणांमध्येच काहीतरी बिनसलं असणार आणि त्यांच्यात भांडणं झाली असणार. हा  निष्कर्ष देखील टिकला नाही.  त्यांना ओळखणाऱ्या लोकांनी सांगितलं की अशा जीवनमरणाच्या परिस्थितीतही त्यांच्यात आपापसात भांडण होणं जवळजवळ अशक्य आहे.

काही गावकऱ्यांच्या मते त्यावेळी आकाशात नारंगी रंग दिसला होता. यावरून लोकांनी असा समज करून घेतला की तिथे एलियन्सची उडती तबकडी आली होती. हा निष्कर्ष अपोआपच बाजूला पडला.

झालेल्या घटनेचा  नीट विचार करणाऱ्या एका गटाने म्हटलं की ते ९ जण सोवियत रशियाच्या शस्त्र चाचणीला बळी पडले असावेत. मृतांच्या कपड्यांवर किरणोत्सर्जन का होतं याचं उत्तर या थियरीतून मिळतं. या निष्कर्षाला आणखी एका गोष्टीने दुजोरा दिला. ती म्हणजे सोवियत सरकारकडून फारच घाईत ही केस बंद करण्यात आली. त्यांचा मृत्यू अद्भुत नैसर्गिक शक्तीमुळे झाला असल्याचं सांगण्यात आलं.

आणखी एका महत्त्वाच्या थियरीप्रमाणे या घटनेला infrasound जबाबदार होतं. Infrasound म्हणजे कमी-वारंवारतेचा ध्वनी. हा ध्वनी माणसाला ऐकू  येत नाही पण कंप जाणवतो. Infrasound मुळे माणसाच्या मनात घबराट उडू शकते. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी वाऱ्यामुळे infrasound निर्माण झालं असावं. त्यामुळे हिमस्खलन होत असल्याचा भास निर्माण झाला असावा आणि म्हणून  त्या सगळ्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली असावी. 

मग त्यांना जखमा कशा झाल्या असाव्यात ? या जखमा वरवरच्या होत्या. बर्फाच्या थरामुळे जखमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पण हा तर्क सुरुवातीला मिळालेल्या प्रेतांच्या बाबतीत लागू होत नाही हे मान्य करावंच लागेल. 

एका गिर्यारोहकांच्या तोंडात जीभ नव्हती त्याचं काय ? कोल्हा किंवा कावळ्याने जीभ खाल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटचा प्रश्न, किरणोत्सर्जन कुठून आलं ? त्यांनी नेलेल्या मेणबत्तीत थोरियम नावाचं किरणोत्सर्गी रसायन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

थियरीज कितीही तयार झाल्या तरी ठोस उत्तर मिळालेलं नाही. वरती दिलेल्या कारणांपैकी कोणतं कारण तुम्हाला पटतं ते आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required