computer

महाराष्ट्रातली राष्ट्रीय उद्याने: मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची खासियत काय आहे आणि तिथे कोणत्या सोयी उपलब्ध आहेत?

महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. राज्यात जंगले आणि अभयारण्येही आहेत. राज्यात काही ठिकाणी संरक्षित राष्ट्रीय उद्यानेही आहेत. थोडीथोडकी नाही, राज्यातल्या विविध भागात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत. या लेखमालेत आपण या राष्ट्रीय उद्यानांची विविधता उलगडून सांगणार आहोत. आजच्या पहिल्या लेखात आपण बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कबद्दल चर्चा करणार आहोत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लंग्स ऑफ सिटी म्हणून ओळखले जाते. यामागे कारण असे आहे की, मुंबईसारख्या प्रचंड प्रदूषण असलेल्या शहराला हे उद्यान मोठया प्रमाणावर ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. सुरुवातीला या उद्यानाचे क्षेत्रफळ खूपच कमी होते. या उद्यानाचा इतिहास खूप जुना आहे. आधी याचे नाव होते, कृष्णगिरी राष्ट्रवादी उद्यान. नंतर १९६० च्या दशकात याच्या आजूबाजूचे दुग्ध विकास मंडळाचे जंगल यात समाविष्ट करून एक नवे मोठे क्षेत्र निर्माण करण्यात आले. आज हे उद्यान १०४ वर्ग किमीच्या भल्यामोठ्या परिसरात पसरलेले दिसते. हे क्षेत्रफळ मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या तब्बल २० टक्के भाग व्यापून आहे. मुंबईअंतर्गत येणारे हे एकमेव संरक्षित वन आहे.

या उद्यानात असलेल्या कान्हेरी लेणी प्राचीन लेण्यांसाठी ओळख टिकवून आहेत. याठिकाणी बौद्ध वास्तूकलेचे काही उत्तम नमुने आहेत. या कान्हेरी लेण्यांमध्ये रॉक क्लाईंबिंगसाठी अनेक हौशी लोक सातत्याने येत असतात. येथील निसर्ग यात्रा आणि ट्रेक्स प्रसिद्ध आहेत. या उद्यानात अल्पोपहारासाठी कँटीन आहे, तसेच स्वतःचे घरचे जेवण घेऊन जाणे हा देखील पर्याय आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे विविध वनस्पती आणि वन्य जीवांनी भरलेले आहे. या उद्यानात एक विशिष्ट प्रकारचे फुल सापडते. करवी नावाचे हे फुल ८ वर्षात एकच वेळा फुलते. निसर्गात आपल्यासाठी किती आश्चर्य भरलेली आहेत हेच यातून समोर येते.

जंगलात वाघांबरोबर इतर अनेक वन्यप्राण्यांचा संचार आहे. सांबर, सिंह, चित्ता, विविध साप आणि माकड असे अनेक वन्यजीव येथे आढळून येतात. तसेच अनेक कीटक, वृक्ष, पक्षी पण आढळून येत असतात. येथे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील असे अनेक उपक्रम सुरू असतात. जसे बटरफ्लाय गार्डन, नेचर ट्रेल्स, कॅम्पिंग, हेरिटेज वॉक यामुळे वर्षभर येथे लोकांची रेलचेल असते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनस्पतींच्या १३०० जाती, फुलपाखरांच्या १५० प्रजाती, पक्षांच्या २५४ प्रजाती इतक्या विविध प्रमाणावर जैववैविध्य आढळून आले आहे. येथील टायगर सफारी प्रसिद्ध आहे. यासाठी जाळीने चारही बाजूनी बंद असलेल्या बसमध्ये बसून पर्यटक जंगलात मुक्त संचार करणारे प्राणी पाहू शकतात. वाघांची सफारी व्यतिरिक्तही उद्यानातील इतर अनेक आकर्षक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कमळाच्या फुलांनी व्यापलेले सुंदर असे सरोवर आहे. या पार्कमध्ये संपूर्ण कुटुंब पर्यटनाचा आनंद घेऊ शकते. लहान मुलांसाठी ट्रॉय ट्रेन तर एक भन्नाट अनुभव ठरू शकतो.

या उद्यानाला भेट द्यायची असल्यास सर्वात जवळचे रेल्वेस्थानक म्हणजे बोरिवली रेल्वे स्थानक. हे अवघ्या किलोमीटरभर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे मुंबईतून जाणारा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावरून जात असल्याने रस्तेमार्गे जाणे हा देखील चांगला पर्याय आहे. सार्वजनिक अनेक वाहने तिथे घेऊन जात असल्याने तिथे पोचवणे तसे अवघड नाही.

तसे तर वर्षभर येथील सफर आनंददायी असते, पण हिवाळ्यात मात्र इथे विशेष आनंद मिळू शकतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required