computer

अमीर खुसरो : 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने ओळख करून घेऊया प्रेमाला नवीन उंची देणाऱ्या एका अवलियाची !!

व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय.  प्रेमात पडलेल्या लोकांना आपला यावेळचा व्हॅलेंटाईन हटके साजरा करावा हा विचार येत असेल.  त्यासाठी पब्लिकची मस्त  तयारीही सुरू असेल. कुणी सरप्राईज द्यायची तयारी केली असेल,  तर काही लोकांनी प्रेम कविता, गजली, शेरोशायरी, कव्वाली लिहायचा  प्रयत्न केला असेल. पण सगळ्यांना काही असं स्वत:चं लिहायचं जमतंच असं काही नाही ना राव! अशा लोकांच्या हमखास मदतीला येतात ते मिर्झा गालिबसारखे शायर ते सिनेमांची गाणी लिहिणारे गीतकार. त्यात पण काही शायर लोकांचे  जाम   फेव्हरीट असतात.  काय म्हणता, तुम्हांला शेरोशायऱ्या माहित आहेत पण कुणी काय लिहिलंय हेच माहित नाही? फिकीर नॉट!! आम्ही आहोत ना..  चला तर मग,  अनेक शतकांपासून प्रेमी युगुलांच्या  गळ्यातील ताईत मानल्या गेलेल्या अशाच एका हटके  अवलिया माणसाची आज ओळख करून घेऊ. हा अवलिया म्हणजे ज्याच्या अप्रतिम कलाकृती प्रेम करणाऱ्यांना स्फूर्ती आणि एक वेगळी चेतना देतात असा तो-  अमीर खुसरो!!
 

अमीर खुसरो म्हणजे नक्की कोण  हे पटकन सांगायचं असेल, तर आपण काश्मिरबद्दल जे म्हणतो-

अगर फ़िरदौस बर-रू-ए-ज़मीं अस्त, हमीं अस्त ओ हमीं अस्त ओ हमीं अस्त !!

म्हणजे या धरतीवर जर कुठे  स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!! हे ज्यांनी लिहिलं, तेच ते अमीर खुसरो!!

ते जाऊ दे.. दमा दम मस्त कलंदर हे गाणं माहित नसलेला माणूस भारत-पाकिस्ताना सापडायचा नाही.. ही कव्वाली मूळची अमीर खुसरोंचीच. त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यात भर घातली आणि आता तर त्यात इंग्रजी  पहला "नंबर"ही आहे. 

तर हे साहेब बरेच जुने आहेत, म्हणजे एक नाही, दोन नाही, तब्बल ७६६ वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे तो अल्लाउद्दिन खिल्जी आणि पद्मावतीचाही मॅटर होण्याच्याही आधीचा. आणि तरीसुद्धा अमीर खुसरो आजही लोकांमध्ये तितकेच प्रसिद्ध आहेत. कोक स्टुडिओ ऐकत असाल तर तुम्ही अमीर खुसरोंची गाणी नक्कीच ऐकली आहेत बरं का राव.. तसं त्यांचं पूर्ण नाव बरंच लांबलचक आहे- अबुल हसन यमीनुद्दीन खुसरो!! त्यांना अमीर ही पदवी अल्लाउद्दिन खिल्जीने दिली असं म्हणतात. त्यांचे आजोबा हिंदू राजपूत होते. पण त्यांनी इस्लामचा स्वीकार केला.  असे हे उत्तर प्रदेशात जन्माला आलेले खुसरो शुद्ध भारतीय होते! 

ते म्हणायचे की मी हिंदूस्तानी तुर्क आहे, हिंदी भाषेत उत्तर देतो. जर तुम्हांला खरंच काही विचारायचं असेल, तर हिंदी(हिंदवी) भाषेत विचारा!!

त्यावेळच्या हिंदुस्तानाबद्दल ते म्हणतात-   

हस्त मेरा मौलिद व मावा व वतन” (हिन्द माझी जन्म भूमी आहे) हिन्द कैसा है ?
‘किश्वरे हिन्द अस्त’ बहिश्ते बर जमीन (भारत देश धरतीवर जणू स्वर्गच आहे. )

 

(अमीर खुसरो आणि संत निजामुद्दीन अवलिया)

खुसरोंनी त्यांच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात बरंच काही करुन ठेवलंय. गीतांबद्दल बोलायचं तर कव्वाली, रुबाई म्हणजे चारोळ्यांसारखी कविता, गझल आणि तराणे हे गीतप्रकार त्यांचं मुख्य क्षेत्र म्हणायला हरकत नाही. त्यांनी हे लेखनही खूप लहानपणी चालू केलं. खुसरो लहान असताना त्यांचे वडील त्यांना प्रसिध्द सुफी संत निजामुद्दीन अवलिया यांच्याकडे घेऊन गेले. असं म्हणतात की, खुसरोंना पाहून संत अवलिया यांनी या बालकात दिव्य दृष्टी आहे असे सांगितले आणि मी याचीच वाट पाहत होतो, आता मला योग्य शिष्य भेटला आहे असं ते म्हणाले. तेव्हापासून अवलिया आणि अमीर खुसरो एकमेकांचे गुरु-शिष्य झाले. खुसरो अगदी १२ वर्षांच्या वयात शायरी आणि रुबाई करायला लागले आणि १७ व्या वर्षीच ते  साहित्य जगात प्रसिद्ध झाले होते.

बऱ्याच लोकांना माहित नसेल,  पण आपसूक आपल्या तोंडात येणाऱ्या शायरी, कविता, गजल, दोहे, कव्वाली हे अमीर खुसरोंची देन आहे.एकेकाळी भारतात तेव्हाच्या  सुलतान आणि बादशाहांच्यामुळे अरबी-फारसींचाच सर्वत्र अंमल होता. या दोन भाषा सोडल्या तर मग अवधी नाहीतर ब्रज हिंदी बोलली जायची. त्याकाळात काही लोकांनी हिंदी बोलीचा अधिक वापर करायला सुरवात केली. अमीर खुसरो त्यातलेच एक. या शुद्ध हिंदी बोलीला खडी बोली म्हणतात.  आणि अमीर खुसरोंच्या प्रयत्नाने तिचा वापर सुरु झाल्याने त्यांना खड़ी बोलीचे जनक मानलं जातं.  त्यांनी खड़ी बोलीला साहित्यिक रूप दिलं.
 

(मन कुंतो मौला)

खुसरोंनी त्यांच्या जीवनकाळात ११ सुलतान बदलताना बघितले आणि त्यातल्या ७ सुलतानांच्या दरबाराची शोभा वाढवली. त्यांनी  सुलतान बलबन, मुहम्मद कैकुबाद, सुलतान जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक यांच्या दरबारात काम केलं.  दरबारातली कटकारस्थानं, सतत चालणारी युद्धं, अत्याचार, आपल्याच वडिलाच्या आणि भावांच्या हत्या करणारे सुलतान या सर्व गदारोळात खुसरो  प्रेमाचा संदेश देत होते.  खुद्द सुलतान अलाउद्दीन खिलजी खुसरोंचा प्रशंसक होता. त्याने सुलतान झाल्यावर खुसरोंना खुसरू-ए-शोरा आणि अमीर ही पदवी दिली. खिलजी जिथे युद्धासाठी जायचा तिथे खुसरोंना सोबत घेऊन जायचा. त्याकाळाचे वर्णन त्यांनी आपली गद्य रचना खजाईन-उल-फतुह मध्ये केले आहे. खुसरोंच्या सत्याग्रही आणि निर्भयतेचे उदाहरण म्हणजे त्यांनी खिलजीला चित्तोड़वर हल्ला करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. इतिहासाचा हा काळा अध्याय लिहिण्यासाठी मी माझी लेखणी झिजवणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. खुसरोंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे त्यांनी युद्धाचेसुद्धा नेतृत्व केले होते. प्रेमवीरांच्या प्रेमकथा गुंफणारा हा कवी युद्धकथासुद्धा लिहायचा.
 

खुसरो संगीतकारच्या रूपातसुद्धा ओळखले जातात. त्यांनी इराणी राग भारतीय रागात मिसळून अनेक राग आणि घुनांची रचना केली, ज्यात जिंगोला,हिजाज आणि नौरोज अधिक प्रसिद्ध आहे. सनम, धोरा, तोड़ी, मिया मल्हार, छोटा ख्याल आणि अजून बरेच राग आहेत.

खुसरो सूफी संप्रदायापासून प्रेरीत झाले होते. त्यांच्या प्रेम कवितेतसुद्धा सुफीवाद उमटत होता. देवाला प्रेमीच्या रुपात पाहणं हे सुफी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. प्रेमात एकरुप झालेल्या व्यक्तीला  बाह्यकर्मकांडाची गरज राहत नाही असे ते मानतात.

काफिरे – इश्कम मुसलमानी मरा दर कार नीस्त
हर रगे मन तार गश्ता हाजते जुन्नार नीस्त

(मी प्रेमाचा काफिर(उपासक) आहे, मला मुसलमानीची गरज नाही,माझी प्रत्येक नस तार बनली आहे, मला जानव्याची पण गरज नाही.)

खुसरो यांच्या या प्रसिद्ध ओळी पाहा :

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाई के
प्रेम भटी का मदवा पिलाई के
मतवारी कर दीन्ही रे मोसे नैना मिलाई के
ख़ुसरो निजाम के बलबल जैहै
मोहे सुहागन कर दीन्ही रे मोसे नैना मिलाई के

वरवर पाहता या ओळी एका प्रेमिकेने आपल्या प्रेमिसाठी लिहिलेल्या वाटू शकतात, पण खरं तर खुसरो यांनी या ओळी त्यांचे गुरु निजामुद्दीन अवलिया यांच्यासाठी लिहिल्या आहेत. गुरु निजामुद्दीन अवलिया यांच्याबद्दल ते म्हणतात की, "त्यांनी माझे सगळे ग्रह, सगळ्या पूर्वखुणा मिटवल्या आणि माझा उद्धार केला."

खुसरोंनी अनेक वाद्यांची निर्मिती केली. पखवाजचे दोन भाग करुन तबला बनवला! आजही तबल्याशिवाय गायकांच्या गाण्यात रंगत येत नाही. सितार, भारतीय वाद्ययंत्र पखवाजचे छोटे रूप ढोलक आणि सारंगीसारखी वाद्यं ही खुसरोंची  देण आहे.  श्रृंगार रसाचे दोन्ही पक्ष, संयोग-वियोग तसेच प्रत्येक रसाबद्दल त्यांची लेखणी चालली. त्यांच्या संगीताबद्दल असे बोलले जाते की, हरिणसुद्धा मंत्रमुग्ध होऊन चेतनाहीन होऊन जायचे. कव्वाली आणि तरानासुद्धा त्यांचीच निर्मिती आहे. आजही भारतीय चित्रपटात त्यांच्या गजल आणि क़व्वाल्या थोड़ा बदल करुन प्रयोग केल्या जातात. "सखी पिया को जो मैं न देखूं तो कैसे काटूं अंधेरी रतियाँ.” अशा अनेक गजली चित्रपटात वापर केल्या जातात. अमीर खुसरो फक्त हिंदी, फारसी किंवा उर्दू नाहीत, तर संस्कृतचे सुद्धा जाणकार होते. 'आज रंग है री' 'छाप तिलक सब छिन', 'दमादम मस्त कलंदर', या त्यांच्या काही रचना आहेत ज्या अजूनही लोकांच्या ओठांवर असतात.
 

खुसरो यांच्या याच ओळी घेऊन अनिता राज आणि मिथुन यांच्या गुलाम (१९८५) चित्रपटातलं गाणं तयार झालं आहे.

स्लामी संस्कृतीला भारतीय संस्कृतीशी जोड़ण्यात खुसरोंचे खूप मोठे योगदान आहे. मध्य आशिया आणि हिंदुस्थानी संस्कृतीचा संगम करुन आपल्या साहित्यात तो उतरवला! त्यांनी लिहिले आहे की बाहेरच्या देशांतले विद्वान बनारसला येऊन शिक्षण घेतात. 

थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या  प्रेमगीतांनी भारतीय आध्यात्मिक वातावरणात प्रेमाचा रंग मिसळला  आणि त्या रंगात लोकांना डुबकी मारायला लावली. त्यांच्या अनेक रचना मागील अनेक शतकांपासून प्रेमवीरांना प्रेरित करत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required