computer

चित्ता भारतात परत येतोय? तो भारतातून नामशेष केव्हा झाला? तो भारतात परतणार कसा?

चित्ता हा सर्वात जास्त वेगवान समजला जाणारा प्राणी. हा प्राणी आज भारतात अस्तित्वात आहे का असा प्रश्न जर विचारण्यात आला तर कुणीही हो असेच उत्तर देणार, कारण भारतातल्या अनेक राज्यांत बिबट्याला चित्ता याच नावाने ओळखले जाते. पण सत्य मात्र वेगळेच आहे. देशातला शेवटचा चित्ता हा १९४७ सालीच मरण पावला. म्हणजेच देश स्वतंत्र झाला तेव्हापासून देशात चित्ता अस्तित्वात नाही. 

१९४७ साली छत्तीसगड येथील कोरीया संस्थानचे राजे रामानुज प्रताप सिंग देव यांनी शेवटच्या चित्त्याची शिकार केली. पुढे पाच वर्षांनी म्हणजे 1952 साली भारताने चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. पण आता एक चांगली बातमी आली आहे. देशात पुन्हा एकदा वेगवान चित्त्यांचा प्रवेश होणार आहे. 

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून तज्ञांची टीम भारतात येऊन चित्त्यांची वाढ, त्यांचे पालनपोषण अशा गोष्टींवर भारताला मार्गदर्शन करणार आहे. हे दोन्ही देश हे जगात सर्वात जास्त चित्त्यांची संख्या असलेले देश समजले जातात. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जगात असे पहिल्यांदा होत आहे की एका खंडातून दुसऱ्या खंडात एका प्राण्याच्या प्रजातीचे विस्थापन केले जात आहे. 

देशातल्या पर्यावरण मंत्रालयाने या प्रजातीला नेमके कुठे वाढवता येईल याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन केली होती. यासाठी देशातील अनेक संस्थांनी आपले योगदान दिले. त्यानंतर २०१० साली आधीच निश्चित करण्यात आलेली ६ स्थळेच पुन्हा एकदा निश्चित करण्यात आली आहेत. या स्थळांमध्ये मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व्ह, शेरगढ वन्यजीव अभयारण्य, ही राजस्थानमधील स्थळे तर गांधी सागर वन्यजीव अभयारण्य, कुनो राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान आणि नौरादेवी वन्यजीव अभयारण्य, ही ४ मध्यप्रदेशातील ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. याला प्रोजेक्ट चिता (Cheetah) असे नाव देण्यात आलेले असून सुरुवातीला 10 चित्तांची निर्मिती करण्यात येणार आहे त्यात 5 मादी चित्त्यांचा समावेश असणार आहे. 

आता प्रश्न उरतो तो हा की भारतातून चित्ता नामशेष झाला त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या. मागे यूएनसीसीडीच्या एका कॉन्फरन्समध्ये भारतातील शिष्टमंडळाने चित्त्यांच्या नामशेष होण्यामागे जंगलतोड हे कारण होते असे म्हटले होते. पण हे कारण १०० टक्के खरे आहे असे देखील नाही. यामागील इतर कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर दिसून येते की, स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेली शिकार हे मोठे कारण होते. 

काहीही असले तरी भारतात आता बिबट्यांना बघून चित्ता म्हणण्याचे दिवस संपतील असे म्हणण्यास वाव आहे. ज्याप्रमाणे देशात जागरूकतेने वाघांची संख्या वाढवली जात आहे. त्याचप्रमाणे देशातील संरक्षित जंगलांमध्ये चित्ते दिसू लागणार आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required