computer

इंटरनेटच्या जगात क्रांती घडवू शकणारी इलॉन मस्कची स्टारलिंक आयडिया काय आहे ?

इंटरनेट! इंटरनेट गेल्या काही वर्षात  परवलीचा शब्द झाला आहे. इंटरनेटशिवाय आयुष्य खूप अवघड वाटू लागले आहे. इंटरनेट हे वायरलेस आहे असा आपला समज आहे. पण प्रत्यक्षात नेट वापरता यावे म्हणून समुद्राच्या तळाशी अनेक किलोमीटरच्या केबल वायर कार्यरत असतात. दोन खंडांच्या मध्ये इंटरनेटद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी खरंतर आपण अजूनही केबलवरच अवलंबून आहोत. तरीही आपण त्याला वायरलेस कनेक्शन म्हणतो. या वायर्सची मालकी आणि त्यांना जतन करण्याची जबाबदारी काही खासगी कंपन्यांची आहे. आता हे सगळे या आधीच्या लेखात आम्ही सांगीतले आहेच मग आज आता नवीन काय सांगणार हा पुढचा प्रश्न आहे.

त्याचं उत्तर आहे इलॉन मस्कच्या नव्या 'स्टारलिंक' या नव्या प्रकल्पामध्ये! आता हा प्रकल्प इलॉन मस्कचा आहे म्हटल्यावर तो जगावेगळ असणारच. अखंडीत इंटरनेट मिळण्यासाठी केबलच्या ऐवजी उपग्रहच वापरले तर अवकाशाच्या पोकळीतून ते स्वस्त होईल आणि अती दुर्गम भागातही इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.

सियाटलमध्ये जेव्हा मस्क या उपक्रमाबद्दल सांगत होते, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना एक दीर्घकाळ चालणारा आणि चांगला उपक्रम तयार करायचा  त्यांच्या म्हणण्यानुसार ४२००० कृत्रिम उपग्रह जवळच्या कक्षेत सोडण्यात येतील. 

फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनतर्फे इलॉन मस्क यांना १२००० कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची परवानगी मिळालेली आहे.

स्पेसएक्स कंपनीने २०१८ मध्ये स्टारलिंकचे दोन चाचणी उपग्रह टिनटिन ए आणि टिनटिन बी हे अवकाशात सोडले होते आणि त्यांनी आपले काम चांगल्या रीतीने पार पाडले. जुने अहवाल चाळल्यानंतर कंपनीने फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या सहमतीने ते सुरुवातीला ठरवल्यापेक्षा थोड्या कमी उंचीवर फिरवत ठेवले.

पहिले ६० स्टारलिंक उपग्रह २३ मे २०१९ साली कक्षात सोडण्यात आले. यामधला प्रत्येक उपग्रह हा २२७ किलोग्रामचा आहे आणि त्याचे आकारमान एका टेबल एवढे आहे. ते खराब झाले तर अंतराळात कचरा होऊ नये यासाठी त्यांना पृथ्वीपासून खूप जवळ म्हणजे ५५० किलोमीटर उंचावर फिरवत ठेवण्यात आले. त्यामध्ये बिघाड झाला तर ते काढून घेता येतील अशा पद्धतीने ते पृथ्वीभोवती एका कक्षेत फिरत होते.

स्टारलिंकचे उपग्रह पृथ्वीच्या खूप जवळून भ्रमण करण्यामागचे कारण असे आहे, की बाकीचे कृत्रिम उपग्रह हे अवकाशातून माहिती गोळा करतात ते पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आहेत आणि त्यामुळे माहितीची देवाणघेवाण होण्यास उशीर लागतो.

स्टार लिंकचे उपग्रह एकमेकांजवळ आणि पृथ्वीजवळ असल्यामुळे पृथ्वीच्या एका टोकावरुन दुसर्‍या टोकावर ते माहिती जलद गतीने पोहोचू शकतात तसेच एखाद्या दुर्गम भागातही इंटरनेट चालू शकते. जेव्हा हे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले गेले तेव्हा ते खूपच चमकत होते, त्यांचा प्रकाश खूप जास्त होता. या घटनेने उद्विग्न होऊन  लॉवल लॅबोरेटरी अरिझोना येथील संशोधकांनी उपग्रहांचे फोटो काढले आणि डिजिटल समाजमाध्यमांमध्ये पसरवले.

तसेच व्हेरा रुबिन या टेलिस्कोपनेही त्यांच्या २०२२ पर्यंत येणाऱ्या अवकाशातील फोटोंबद्दल काळजी व्यक्त केली. काही खगोलशास्त्रज्ञ आणि आकाश निरीक्षकांना असे वाटते की रात्री चमकणाऱ्या या कृत्रिम उपग्रहांमुळे अवकाशाच्या निरीक्षणात अडथळा येईल.

इलॉन मस्क यांनी भारत सरकारला त्यांच्या कृत्रिम उपग्रहाविषयी धोरणात बदल करण्याची विनंती केली आहे, तसेच भारताच्या खाजगी माहितीबाबत कुठलीही ढवळाढवळ केली जाणार नाही असे सांगितले आहे.

हे इंटरनेट नेटवर्क मिळवण्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. २०२२ पर्यंत हे नेटवर्क बाजारात येईल आणि त्यात एक डिश आणि एक राउटर मिळेल, असे समजले आहे. पण आत्ता तरी यांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

काय माहिती, काही काळाने आपले आकाशही ह्या कृत्रिम उपग्रहांच्या प्रकाशात झगमगत असेल आणि चक्क रोज दिवाळी वाटेल आणि कुठेही गेलो तरी नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही!!

 

लेखिका: क्षमा कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required