हैद्राबादेतला statue of equality नक्की कुणाच्या स्मरणार्थ उभारला आहे? त्यांचे कार्य काय? हे सर्व जाणून घ्या!

हैदराबादमध्ये नुकताच statue of equality म्हणजेव समतेचा पुतळ्याचे उद्घाटन झाले. बसलेल्या स्थितीत असलेला हा जगातील दुसरा सर्वात मोठा पुतळा आहे. हा पुतळा कोणाचा आहे आणि त्यांचे कार्य काय आहे, असे प्रश्न पडले असतील तर याची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. ११व्या शतकातील समाजसुधारक आणि संत रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे. याची उंची तब्बल २१६ फूट आहे. हैदराबादच्या बाहेरील शमशाबादजवळील मुचिंतल येथे ४५ एकर निसर्गरम्य परिसरात जियर इंटिग्रेटेड वैदिक अकादमी (JIVA) येथे हा बसवण्यात आला आहे.

या पुतळ्याची किंमत १००० कोटी असल्याचे सांगितले जाते. हे बनवण्यासाठी सोने, चांदी, तांबे, पितळ यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ६३,४४४ चौरस फूट तळमजल्यावर पुतळ्याशिवाय एक भव्य फोटो गॅलरीही तयार करण्यात आली आहे. श्री रामानुजाचार्य यांच्या १२० वर्षांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे. त्यांनी आयुष्यभर देश आणि जगाला समानतेचा धडा शिकवला. म्हणून याचे नाव statue of equality म्हणजेव समतेचा पुतळा असे असणार आहे.

संत रामानुजाचार्य यांचा जन्म १०१७ साली तामिळनाडू येथे झाला. त्यांनी कांची येथील अलवर यमुनाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली. नंतर श्रीरंगम येथील यतीराज नावाच्या संन्यासीकडून त्यांनी दीक्षा घेतली. समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करत त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यांनी वेदांत आणि वैष्णव धर्माचा प्रचार केला. गुरूंच्या इच्छेनुसार रामानुजाचार्यांनी ब्रह्मसूत्र, विष्णु सहस्रनाम आणि दिव्य प्रबंधम् यावर लिहिण्याचा संकल्प केला होता. म्हैसूरमधील श्रीरंगम येथून गेल्यानंतर रामानुज शालिग्राम नावाच्या ठिकाणी राहू लागले. रामानुजांनी त्या प्रदेशात बारा वर्षे वैष्णव धर्माचा प्रचार केला. रामानुजाचार्यांच्या शिष्य परंपरेतील वैष्णव गुरुंमध्ये प्रमुख रामानंद होते. रामानुजाचार्य हे अन्नमाचार्य, रामदास, कबीर दास आणि मीराबाई यांसारख्या कवींचे प्रेरणास्थान मानले जातात.त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांची रचनाही केली. यापैकी श्रीभाष्याम आणि वेदांत संग्रह हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. हे पहिले संत होते ज्यांनी भक्ती, ध्यान आणि वेदान्ताला जातीपासून दूर ठेवायला मानवजातीला शिकवले. संत रामानुजाचार्य यांनी लोकांना शिकवले की मोक्षप्राप्तीचे सर्वोत्तम साधन म्हणजे विष्णूची भक्ती करणे. त्यांनी लोकांना शिकवण दिली की कोणीही कोणत्याही जाती-धर्माचा असला देवाच्या कृपेला पात्र असतो. ११३७ मध्ये वयाच्या १२० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संत रामानुजाचार्य यांनी "वसुधैव कुटुंबकम" या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. "वसुधैव कुटुंबकम" म्हणजे सारे विश्व एक कुटुंब आहे. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध संत परंपरा लाभली आहे. याचा आपल्याला अभिमान आहेच.
तेलंगणामध्येही हजारो वर्षांनंतर श्री रामानुजाचार्य यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यांचा संदेश अंमलात आणला तर जाती-धर्मामुळे निर्माण होणारे ताण-तणाव आणि कठीण समस्या सहज सुटतील, नाही का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required