गणपती दीड दिवसांचा का असतो ? उत्तर दडलंय या पुराणकथेत...तुम्हांला माहित आहे का ही कथा?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/ganesh7---storysize_647_091715095237.jpg?itok=2OcB2W8l)
बऱ्याच घरी दीड दिवसांचा गणपती असतो. कुणाला असंही वाटतं की लोकांकडे काय देवाला द्यायला पण वेळ नाही म्हणून ते ११ दिवस गणपती न बसवता लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करतात. पण हे खरं नाही मंडळी.. म्हणूनच आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी खास या दीड दिवसांच्या गणपतीमागची कारणमीमांसा घेऊन आलो आहोत..
भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीच्या गणपती पूजेला पार्थिव गणेश पूजन असं नाव आहे. चतुर्थीला गणपतीचं आवाहन आणि पंचमीला विसर्जन अशी मूळ संकल्पना आहे. कालांतराने मात्र आपल्या आवडत्या गणरायाला चार दिवस आग्रहाने घरी ठेवून घ्यायचं म्हणून अनंतचतुर्दशीपर्यंतच्या उत्सवाला सुरवात झाली असावी.
मूळ संकल्पनेप्रमाणे खरंतर आपण आपल्या हाताने मातीचा चिखल करून त्यामध्ये मूर्ती बनवायला हवी, पूजा करताना त्या मूर्तीत प्राण ओतायला हवेत आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमनायच म्हणून विसर्जन करायला हवे. पण असं का करायचं? हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही बोभाटाकरांसाठी सांगणार आहोत मातीच्या मूर्तीमागे लपलेली एक कथा आणि त्यात दडलेलं एक अदृश्य शास्त्र !
स्रोत
आपल्याला माहित आहेच की श्री व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्रीगणेश त्यांचा लेखनिक होता. हे महाभारत लिहिताना लिहिण्याच्या श्रमाने गणेशाच्या अंगातले पाणी कमी झाले, त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाचा असह्य दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब गणेशाच्या शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला आणि त्यावर थंड पाण्याचा शिडकावा केला. गणेशाचा ज्वर कमी झाला आणि शरीरातील पाण्याचा अभाव कमी झाला. हे सर्व घडलं ते भाद्रपदातल्या चतुर्थीला. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर असा लेप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचमीला गणपतीचा ताप व्यवस्थित उतरला. तेव्हा व्यासांनी तो चिखलाचा लेप काढून विसर्जित केला. यामुळेच चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रुढ झाली. अशी जन्मकथा आहे या उत्सवाची आणि पार्थिव गणेश पूजनाची !!
पाहा बरं, इतके दिवस तुम्ही दीड दिवसांचा गणपती बसवत होतात, पण त्यामागचं खरं कारणच तुम्हांला माहित नव्हतं..