कारगिल युद्ध लढलेली एकमेव स्त्री- गुंजन सक्सेना. त्यांना कोणत्या धोकादायक कामगिरीसाठी शौर्यपदक मिळाले?
नेटफ्लिक्सवर करण जोहरचा नविन सिनेमा येतोय. गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल. जान्हवी कपूर गुंजन सक्सेनाचा रोल करतेय. नुकताच या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलाय. पण सिनेमा कधी येणार हे मात्र गुप्त ठेवण्यात आलंय. पण बोभाटाला जान्हवी कपूर किंवा करण जोहरचा नवा सिनेमा यापेक्षा अधिक कुतूहल आहे गुंजन सक्सेना कोण आणि तिच्यावर सिनेमा केला जाण्यासारखं तिने काय केलंय? आता सिनेमाच्या नावातच द कारगिल गर्ल आहे म्हणजे तिने या युद्धात काहीतरी पराक्रम केला असेल हे नक्की. पण नक्की काय केलं हे जरा विस्ताराने पाहूयात का?
थोडक्यात सांगायचं तर, गुंजन सक्सेना ह्या कारगिल युद्धावेळी वॉर झोनमध्ये जाणारी पहिल्या महिला ठरल्या होत्या. इतकंच नाही तर त्या पहिल्या महिला बॅचची एअरफोर्स पायलट होत्या. त्यांनी कारगिलच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवला. चित्ता हेलिकॉप्टरमधून अनेक सैनिकांची ने-आण केली आणि कित्येकांचे जीव अवघ्या २५व्या वर्षी वाचवले होते. साहजिकच त्यांच्या पराक्रमाची गाथा पुस्तक आणि सिनेमारुपात आपल्यासमोर येतेय.
गुंजन यांचे वडील आर्मीमध्ये होते. पाच वर्षांच्या असताना त्यांनी पहिल्यांदा कॉकपिट पाहिले, आणि झालं!!! त्यादिवशी ठरवले की आपण भारतीय सैन्याची विमाने उडवायची आणि पुढील जाऊन त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरताना आख्या भारताने पाहिले. ज्या वयात पोरांना काय करावे हे कळत नाही त्या वयात ही मुलगी फायटर विमाने उडवणार होती. त्यांना एअरफोर्समधील पहिल्या महिला बॅचमध्ये ट्रेनी म्हणून प्रवेश मिळाला. त्याकाळी महिलांना फायटर विमाने चालवायला दिली जात नसत. यासाठी कमालीचा शारीरिक आणि मानसिक कस लागतो असे मानले जात होते. गुंजन यांना ती संधी मिळाली १९९९ साली!!
मे १९९९ मध्ये त्यांची पोस्टिंग उधमपूर येथे करण्यात आलेली होती. त्यांना श्रीनगरला जाण्याचा आदेश आला. धाडसी कामाच्या शोधात असलेल्या गुंजन यांना उलट याने आनंदच झाला. श्रीनगरला जाण्याआधी त्यांनी आई वडिलांना कॉल केला. कारण प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेल्यावर बोलणे शक्य झाले नसते. आपली मुलगी थेट युद्धावर जात आहे हे कळल्यावर कुणालाही धस्स होईल, पण त्यांच्या आई वडिलांनी मुलीला पाठिंबा दिला. वडील आर्मीत असल्याने त्यांना उलट आपल्या मुलीचा अभिमानच वाटत होता.
कारगिलमधील घुसखोरी नुकतीच उघडकीस येऊ लागल्याचा तो काळ होता. ही मोहिम किती मोठी आणि खतरनाक होऊ शकेल याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. मे १९९९ मध्ये श्रीनगर एअर फील्डमध्ये चार हेलिकॉप्टर्स तैनात होती. चित्ता हेलिकॉप्टर गुंजनने आजवर काही काळ उडवले होते आणि आता तेच चित्ता उडवणाऱ्या तिथल्या दहा पायलटांपैकी एक गुंजन होत्या. दहा पायलटसमध्ये त्या एकमेव स्त्रीपायलट होत्या. साहजिकच युद्धपरिस्थिती अधिक धोकादायक होऊ लागली तेव्हा त्यांना फिल्डवर जाण्यात काही अडचणी आहेत का असं विचारण्यात आलं. गुंजन सक्सेनांनी मात्र त्याला नकार देत प्रसंगी धोकादायक प्रदेशातूनही चित्ता उडवले आणि त्या आपलं काम करत राहिल्या.
चित्ता हेलिकॉप्टर्सच का?
चित्ता हेलिकॉप्टर्स आकारने लहान पण तितकीच बळकट समजली जातात. उंचावर उडत राहून टेहळणी करण्यासाठी त्यांचा बरेचदा वापर करण्यात येतो. तेव्हा ही हेलिकॉप्टर्स कारगिल-टोलोलिंग-बटालिक या भागात टेहळणी करण्यासाठी वापरली जात होती. तिथं काही घडलं तर ते कळवण्याचं काम पायलट्स करत होते. बरेचदा त्या डोंगराळ प्रदेशात भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक एकमेकांवर गोळीबार करत असत आणि साहजिकच, सैनिक जखमी होत असत. आता टेहळणीसोबत या जखमी सैनिकांची ने-आण करण्याचे काम गुंजन आणि त्यांचे सहकारी पायलट्स करु लागले.
धोकादायक कामगिरी
हे काम वाटते तितके सोपे नव्हते. हेलिकॉप्टर्स उतरण्यासाठी कामचलाऊ हेलिपॅड्स लष्कराकडून तयार केली जायची. त्यावर सुमारे १३,०००फूट उंचीवर उतरणं, सैनिकांना घेणं आणि शत्रूचा मारा चुकवत जखमींना आपल्या तळावर आणणं हे काम धोकादायक आणि तितकंच जबाबदारीचं होतं. आधीच वाहनात जखमी सैनिक असल्यानं शत्रूच्या माऱ्याला बळी पडणं देशाला परवडलं नसतं. चित्ता उंचावरुन उडण्यासाठी आणि बळकटपणासाठी प्रसिद्ध असलं तरी त्यात स्वत:चा बचाव करण्यासाठी काहीच सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे पायलट्स त्यांचं हेलिकॉप्टर पडलं आणि त्यांना शत्रूने पकडलं, तर सामना आणि बचाव करण्यासाठी स्वत:जवळ लढाऊ रायफल्स-पिस्तुलं सोबत बाळगत असत. अशा परिस्थितीत या पायलट्सचं काम अधिकच अवघड झलं होतं.
गुंजन सक्सेनांनी या कामगिरीवर असताना कित्येक जखमी सैनिकांना सुखरुप श्रीनगरला पोहोचतं केलं. या कारगिल युद्धाच्या मोहिमेत एकदा गुंजन कारगिल एअरफील्डवरून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना शत्रूचे एक क्षेपणास्त्र तिच्या हेलिकॉप्टरवर आदळणार होते पण ते थोडक्यात चुकले आणि मागे क्रॅश झाले. मात्र या अशा प्रसंगानेही न डगमगता त्यांनी आपलं काम तेव्हाही चालू ठेवलं आणि कर्तव्यामध्ये जराही कसूर केली नाही.
हे चित्ता हेलिकॉप्टर्स चालवत गुंजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूच्या संशयास्पद ठिकाणे, त्यांची अन्न-औषधी, दारुगोळा-शस्त्रात्रे साठवून ठेवण्याची ठिकाणे यांची माहिती मिळवली. आपल्या सैनिकांना अन्नाची पाकिटे पोचवणे, जखमी सैनिकांना आणणे आणि प्रसंगी शहीद झालेल्या सैनिकांना श्रीनगरला आणण्याची महत्त्वाची कामगिरी या टीमने केली. वीस दिवस हे अथक काम केल्यानंतर भारतीय एअरफोर्सने ही लहान हेलिकॉप्टर्स परत बोलावली आणि खऱ्या कारगिल युद्धाला सुरुवात झाली.
मात्र या वीस दिवसांत चित्ता हेलिकॉप्टर्स आणि पायलट्स यांनी केलेल्या टेहळणीची वायुसेनेला बरीच मदत झाली आणि त्यानंतर काय झाले हे आपल्याला माहित आहेच. कारगिल युद्धामध्ये सामील होणारी एकमेव महिला असल्याचा गौरव गुंजान सक्सेनांना मिळाला आणि या कामासाठी त्यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सध्या गुंजन काय करतात?
पूर्वी भारतीय लष्करात स्त्रियांसाठी परमनंट सर्व्हिस कमिशन नव्हते. साहजिकच, गुंजन सक्सेना या शॉर्ट सर्व्हिस कमिशन याप्रकारच्या युद्धसेवेत होत्या. सात वर्षांनंतर भारतीय वायुसेनेतला त्यांचा कार्यकाल संपणार होता. त्यामुळे युद्धानंतर काही वर्षांनी त्यांचे सर्व्हिस कमिशन संपुष्टात आले. त्यांचे पती सध्या भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर चालवतात.
अशा या साहसी आणि पराक्रमी भारतकन्येवर सिनेमा बनतोय. तसेही मालिका-सिनेमांमधून इतिहास समजून घेण्याचे दिवस आहेत. सिनेमा सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेऊन गुंजनची कामगिरी आणखीच महान करुन दाखवेल. असे असले तरी याच प्रेरणेतून आणखी बऱ्याच गुंजन भविष्यात निर्माण होतील या आशेने आपण सिनेमातल्या चुका माफ करु, कसे?
आणखी वाचा :
स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत.