computer

महिन्याला ८००० रुपये पगार असणाऱ्या मुलाने अब्जाधीश बनून दाखवले...झिरोधाच्या संस्थापकांची प्रेरणादायी कथा !!

शाळेत मन लागत नाही म्हणून इतर उपद्व्याप करणारी मुले तुम्ही बघितली असतीलच. आजची गोष्ट अशाच एका मुलाची आहे. त्याचं शाळेत लक्षच लागत नसे, मग मित्राच्या मदतीने मोबाईल रिपेयर करत बसायचा. आई वडिलांना ही गोष्ट समजली तेव्हा साहजिकच अभ्यासाच्या वयात मुलगा दुसरेच उद्योग करतोय बघून त्यांनी त्याचं सगळं सामान फेकलं. पण आईवडिलांची कितीही इच्छा असली तरी मुलाची अभ्यासात गतीच नव्हती तर तो तरी काय करणार. त्याने कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. तिथे त्याला ८००० रुपये पगार मिळू लागला. पुढे जाऊन हा मुलगा आणि त्याच्या सारखाच असलेला त्याचा भाऊ अब्जाधीश झाले. हा एवढा मोठा बदल कसा घडला? अविश्वसनीय वाटत असली तरी ही गोष्ट खरी आहे.

आता वळूया या गोष्टीतील त्या दोन नायकांकडे

निखिल आणि नितीन कामत हे दोन्ही भाऊ झिरोधा या कंपनीचे मालक आहेत. कामत बंधूंचा प्रवास हा कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीय तरुणांसारखाच आहे. लहानपणी वडील एका बँकेत कामाला होते. रोज शाळेत जायचे. सतत अभ्यास करण्याचं दडपण असायचं.

निखिल तिसरीत असताना एके दिवशी त्याला त्याच्या सरांनी मारले. तेव्हापासून त्याचे शाळेतून चित्त उडाले ते उडालेच. पुढे शाळेत येत नाही म्हणून १०वीच्या बोर्डाची परीक्षा पण देता आली नाही. शेवटी काहीतरी करायचे म्हणून निखिल कॉल सेंटरमध्ये नोकरी करू लागला. तर दुसरीकडे त्याचा भाऊ नितीन इंजिनिअरिंग करत होता. निखिलला चेस खेळणे खूप आवडत असे. चेस प्रमाणेच तो अजून एका गोष्टीत सोंगट्या फिरवण्यात हुशार होता. ते म्हणजे शेयर्सचा खेळ!!!

(निखिल कामत)

दोन्ही भावांमध्ये अभ्यासाचा फरक असला तरी एक गोष्ट समान होती. त्यांना शेयर मार्केटचं प्रचंड वेड होतं. निखिल कॉल सेंटरवर रात्रभर काम करत असे तर दिवसभर शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असे. सुरुवातीला त्याच्या वडीलांनी त्याला थोडे पैसे दिले. ते म्हणतात ना माणूस जुगाडू असला तर वाळवंटात पण पाणी शोधू शकतो. त्याने तो ज्या कॉल सेंटरमध्ये तो काम करत होता, त्याच्या मॅनेजरलाच शेयर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी तयार केले.

पुढे तो चक्क वर्षभर कामाला गेला नाही, तरी देखील त्याला पूर्ण पगार मिळत होती. कारण, तो आपल्या साहेबांना शेयरमध्ये योग्य गुंतवणूक करवून चांगला परतावा मिळवून देत होता. नितीन देखील इंजिनिअरिंग सोबत त्याला मदत करत होताच. पुढे दोन्ही भावांनी मिळून कामत असोसिएटसची स्थापना केली होती.

२०१० येता येता दोन्ही भावांना आपण शेयर मार्केटमध्ये चांगले काहीतरी करू शकतो याचा अंदाज आला होता. त्यांनी झिरोधा नावाची कंपनी सुरू केली. झिरोधाच्या रुपात देशात पहिल्यांदाच कमी ब्रोकरेज आणि प्रत्येक खरेदी विक्रीवर फ्लॅट दरापेक्षा कमी फिजची सुविधा देणारी ट्रेडिंग कंपनी अस्तित्वात आली. दोन्ही भाऊ सांगतात की, ज्यावेळी त्यांनी कंपनी सुरू केली होती तेव्हा सामान्य माणसाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. आम्ही सुरूवातीपासून त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. झिरोधाचा अर्थ देखील रंजक आहे. झि म्हणजे ‘शून्य’ (Zero) तर रोधा म्हणजे संस्कृत शब्द ‘रोध’ ज्याचा अर्थ अडचण होतो. म्हणजेच शून्य अडचण हा या कंपनीच्या नावाचा अर्थ आहे. पुढे त्यांची कंपनी वाढत गेली. आज त्यांच्या कंपनीत ९०० लोक काम करतात, तर देशातल्या पहिल्या १०० श्रीमंत लोकांमध्ये या भावांची गणना केली जाते.

आजही आपल्या कंपनीत ही भावंडे आपला ८५ टक्के वेळ खर्च करत असतात. सातत्याने पुढे जाण्याची त्यांची इच्छाशक्ती त्यांना वयाची चाळीशी गाठण्यापुर्वीच अब्जाधीश बनवून गेली आहे. काय केले त्यांनी? तर आपल्या पॅशनचा सातत्यपूर्ण पाठलाग केला आणि आकाशाला गवसणी घातली.

तुम्हाला या दोन भावांची कथा कशी वाटली? आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required