computer

संगीत आणि देवामुळे चोरी सोडून दिलेल्या चोराच्या अजब चोरीची गोष्ट!

बर्‍याच वर्षांपूर्वी 'झाला महार पंढरीनाथ' नावाच्या  चित्रपटाचे एक गीत ग.दि. माडगूळकरांनी लिहिले होते. त्या गीताच्या काही ओळी आजही लोकप्रिय आहेत.

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?

बोभाटाच्या आजच्या कथेत याच ओळी पुन:पुन्हा आठवतील. आम्ही अशा एका चोराची कथा सांगणार आहोत, जो देवाची चोरी करू शकला नाही. फक्त ही कथा भारतात घडलेली नसून बर्‍याच वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली आहे.

******************

१९५१ सालच्या एका संध्याकळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जीम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्‍या करतात. चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालीटी असते. हा चोर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोर्‍या करण्यात तरबेज होता.

चालत चालत तो ५७ व्या रस्त्यावर पोहचला तेव्हा त्याला हवे ते नजरेस पडले. एका माणसाने घाईघाईत गाडी पार्क केली. गाडीच्या मागच्या सीटवर दोन बॅगा होत्या. गाडीवाला फारच घाईत असावा. त्याच्या कपड्यांकडे आणि हेअर स्टाईलकडे बघून चोराची खात्री पटली की या इसमाच्या बॅगात नक्कीच भरपूर माल असणार. गाडीचा दरवाजात छिन्नी अडकवून बॅगा चोरायला त्याला जेमतेम दोन तीन मिनिटं लागली. दोन सूटकेस हातात घेऊन तो पसार झाला. त्याचा आजचा कोटा पूर्ण झाला होता.

दहा मिनिटांनी काम आटपून गाडीचा मालक परत आला आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला. त्याने पोलीसांना फोन केला. काही मिनिटांतच चार पोलीस हजर झाले. "माझ्या दोन बॅगा चोरीला गेल्या आहेत. बँगांमध्ये असलेलं बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या ऑर्केस्ट्राच्या येत्या कार्यक्रमाचे म्युझिक चार्ट मी बनवून ठेवलेत. ते काही झालं तरी मला मिळवून द्या." त्याने पोलीसांना हात जोडून विनंती केली. गाडीचा मालक एका नामांकित ऑर्केस्ट्राचा म्युझिक कंडक्टर आल्फान्सो डी'आर्टेगन होता. चार दिवसांनी त्याचा कार्यक्रम न्यूयॉर्क जवळच्या बफेलो शहरातल्या एका चर्चमध्ये होणार होता. हरवलेले चार्ट पुन्हा लिहिणे केवळ अशक्य होते. "त्या चार्टमध्ये माझे अ‍ॅव्हे मारीया आणि एक स्पेशल गाणे आहे, जे मला सापडायलाच हवेत हो." त्याने पुन्हा  कळवळून विनंती केली. पोलीसांनी त्याच्या कारवाईला सुरुवात केली.

(आल्फान्सो डी'आर्टेगन)

आल्फान्सो डी'आर्टेगन आणि पोलीस यांच्यात चर्चा चालू असतानाच चोर आपल्या घरी सुखरुप पोहचला होता. त्या मोठ्या सूटकेसमध्ये काय काय माल मिळेल याची चोराला उत्सुकता होती. त्यानी घाईघाईने सूटकेस उघडल्या. एका सूटकेसमध्ये महागडे सूट होते आणि दुसरी सूटकेस उघडल्यावर चोराने मनातल्या मनात नशिबाला शिव्या घातल्या. त्यात फक्त म्युझिक चार्टचे कागदांचे गठ्ठे होते. रागाच्या भरात त्याने कागदाच्या चळती फेकल्या. महागडे सूट घेऊन तो चोरीचा माल गहाण ठेवणार्‍या सावकाराकडे पोहचला. सात सूटांच्या पावत्या देऊन सावकाराने त्याच्या हातावर १४० डॉलर टेकवल्यावर त्याचा मूड बराचसा सुधारला होता. घरी पोहचल्यावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद त्याने एका थैलीत भरायला सुरुवात केली. अचानक एका कागदावर त्याला त्याच्या ओळखीच्या अ‍ॅव्हे मारीयाच्या ओळी दिसल्या. एका क्षणात त्याचे मन चर्चमध्ये पोहचले. पियानोचे सूर मनात गुंजायला सुरुवात झाली. त्याने तो कागद बाजूला ठेवला आणि त्याला जोडलेला दुसरा कागद वाचला. त्यावर एका प्रार्थनेच्या चार ओळी होत्या.

Everyone  must have a friend
To tell his troubles to ;
And I found mine, O dearest Lord,
My truest friend is you !

या चार ओळी वाचल्यावर त्या चोराच्या मनात काय भावना निर्माण झाल्या कुणास ठाऊक, पण त्याने ती दोन्ही पाने  स्वतःकडे ठेवून दिली. बाकीचे कागद थैलीत भरायला सुरुवात केल्यावर अचानक त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक? त्याने संगीत दिग्दर्शकाचं नाव वाचलं. आल्फान्सो डी'आर्टेगा. एका कागदावर ते  टिपून ठेवले आणि सगळे कागद घेऊन तो बाहेर पडला. अर्ध्या तासाने तो परत आला तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं. गाडी ज्या ठिकाणी पार्क केलेली होती, त्याच ठिकाणी थैली सोडून तो परत आला होता. रात्री बराच वेळ तो त्याच विचारात गुंगलेला होता. त्याला कल्पना नव्हती, पण त्याने रस्त्यावर फेकलेल्या कागदांमुळे आणखी एक आयुष्य बदलण्याची वेळ कहाणी सुरु झाली होती.

दुसर्‍या दिवशी सकाळी पार्कींग लॉटच्या समोर असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहणार्‍या बाई बाहेर पडल्या. त्यांना वाटेत दुसर्‍या एक बाई भेटल्या आणि म्हणाल्या, "समोरच्या फूटपाथवर एका थैलीत कितीतरी म्युझिक चार्ट पडलेत बघ. तुझा मुलगा पियानो शिकतोय ना? त्याला उपयोगी येतील." 

त्या बाई लगबगीने गेल्या आणि त्यांनी ती थैली घरी आणली. दुपारपर्यंत डी'आर्टेगाच्या गाडीतल्या सामानाच्या चोरीची बातमी  टिव्हीवर झळकत होती. सोबत डी'आर्टेगाचे चोराला उद्देशून एक आवाहन होते.  "मी तुला माफ केलेच आहे, पण प्लीज माझे चार्ट माझ्यापर्यंत पोहचवा. मला कार्यक्रमासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे." त्या बाई म्हणजे मिसेस ब्रेन यांनी ताबडतोब पोलीसांना फोन केला. थोड्याच वेळात डी'आर्टेगा कागद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचला. कागदाची थैली घेता घेता त्याचे लक्ष पियानोकडे गेले आणि साहजिक प्रश्न त्याने विचारला "तुमच्या घरी पियानो कोण वाजवतं?" 

"माझे पती पियानो वादक आणि म्युझिक अ‍ॅरेंजर होते. ते गेल्यावर आता माझा मुलगा पियानो शिकतोय." 

मिसेस ब्रेन यांनी डी'आर्टेगाला त्यांच्या पतीच्या काही रचना दाखवल्या. त्यामध्ये एक रचना होती 'SOS 'Save Our Souls.

एका रात्रीत घडलेल्या प्रसंगांनी भारावून गेलेल्या डी'आर्टेगा मिसेस ब्रेन यांना म्हणाला, "ही रचना मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो. तुम्ही आणि मुलगा त्या कर्यक्रमाला माझ्या सोबतच चला." 

चार दिवसांनंतर त्या कार्यक्रमात त्याने ती रचना सादर केल्यावर मिसेस ब्रेनना अश्रू अनावर झाले. दुसर्‍या दिवशी त्यांचा फोटो आणि कार्यक्रमाची माहिती चोराने वर्तमानपत्रात वाचली आणि चार दिवस ज्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता त्या विचार त्याने पक्का केला.

त्यानंतरच्या काहीच दिवसांत डी'आर्टेगाच्या पत्त्यावर पोस्टाने एक पाकीट आले. त्यात गहाणवटीच्या सात पावत्या होत्या. सोबत चोराने लिहिलेली एक चिठ्ठी होती. 

"महोदय, तुमच्या सुटकेस चोरणारा मी चोर आहे. तुमचे कपडे मी ज्या पॉन ब्रोकरकडे ठेवले आहेत त्याच्या या पावत्या आहेत. ते कपडे मी सोडवून घेईन अशी माझी आता परिस्थिती नाही, कारण ही मी केलेली शेवटची चोरी होती. तुमच्या चार्टमधील जी अ‍ॅव्हे मारिया आणि एक कवितेची पानं होती त्यांनी माझे आयुष्य बदलले आहे. आता मी काम करून पोट भरतो. चोर्‍या करत नाही. ही प्रेरणा मला तुमच्या रचनांतून मिळाली आहे. पण तुमच्या समोर येण्याचे धैर्य माझ्यात नाही किंवा चर्चमध्ये कन्फेशन देण्याचेही धैर्य आता माझ्यात नाही. ज्या दिवशी तो धीर माझ्यात निर्माण होईल तेव्हा मी तुम्हाला भेटेन". (जे.एल.)

या घटनेला तीन वर्षं उलटून गेली. डी'आर्टेगा ज्या चर्चचा सभासद होता त्या सेंट अँथनी चर्चमध्ये एक मुलगा आपल्याकडे रोज बघतो आहे हे त्याच्या लक्षातही कधीच आले नाही. डी'आर्टेगा पण न विसरता त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात न विसरता 'SOS 'Save Our Souls ही रचना सादर करत असे. अशाच एका कार्यक्रमानंतर एक दिवस चर्चमध्ये एका तरुणाने त्याला भेटायचे आहे असे म्हटले. दोघं बोलत बाहेरच्या कॅफेत पोहचले तेव्हा त्या तरुणाने खिशातून १४० डॉलर काढून डी'आर्टेगाच्या हातात ठेवले आणि म्हणाला, "मीच तो चोर ज्याचे आयुष्य तुमच्यामुळे बदलले. आता तुम्ही मला पोलीसांच्या हवाली केले तरी माझी तयारी आहे."

डी'आर्टेगाने त्यावर उत्तर दिले, "पोलीसांच्या नव्हे, तर मी आता तुला देवाच्या आधीन करतो आहे. चल आपण एकत्र प्रार्थना करू या."

ती प्रार्थना होती.

Everyone  must have a friend
To tell his troubles to ;
And I found mine, O dearest Lord,
My truest friend is you !

वाचकहो, देवावर विश्वास असणे-नसणे हा तुमच्या श्रध्देचा भाग आहे. पण ही सत्यकथा वाचल्यावर गदिमांच्या याओळी तुम्हाला नक्कीच आठवतील.

"देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?"

सबस्क्राईब करा

* indicates required