मुंबई महानगरपालिकेने झाडांच्या डॉक्टरांना का बोलावलं आहे? ही कल्पना तुम्हाला कशी वाटते?
मुंबई आणि पाऊस यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतला पाऊस फक्त भिजवत नाही तर धडकीही भरवतो. पावसामुळे तुंबणारी गटारे, पावसाच्या पाण्याने भरणारी घरे, वाहून जाणारी वाहने अश्या त्रासदायक घटना आपण बातम्यांमध्ये नेहमी बघत असतो. मुंबईत या समस्या दर पावसाळ्यात येतात. अजून एक समस्या दर पावसाळ्यात सगळीकडेच घडताना दिसते ती म्हणजे पडणारी झाडे आणि त्यामुळे घडणारे अपघात. या समस्येवर बीएमसीने एक नवीन उपाय शोधून काढला आहे.
दरवर्षी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या संख्येने झाडांचे नुकसान होते. तसेच झाडे किंवा फांद्या पडल्याने अपघातही घडतात. या सर्वाचा विचार करून बीएमसीने झाडांची देखरेख आणि त्यांचे मुल्यांकन करण्यासाठी आर्बोरिस्टची नियुक्ती केली आहे. म्हणजे सर्वसामान्याच्या भाषेत झाडांच्या डॉक्टरची नियुक्ती केली आहे. अशी नियुक्ती भारतात कुठल्याही राज्यात पहिल्यांदाच केली गेली आहे.
आर्बोरिस्ट झाडांचा व्यवस्थित अभ्यास करतात आणि झाडांची आताची स्थिती कशी आहे हे सांगू शकतात त्यासाठी विविध उपकरणांद्वारे झाडांची तपासणी केली जाते आणि त्याचे मुल्यांकन केले जाते. रेस्टोग्राफ मशीनद्वारे ही तपासणी होते. मशीनमध्ये एक सुई टाकली जाते आणि झाडाच्या खोडात ती आत घुसवली जाते. आर्बोरिस्ट त्यांनतर त्या झाडांचे योग्य मुल्यांकन करतात. मुंबईत आर्बोरिस्ट वैभव राजे यांनी हे काम सुरू केले आहे.
वैभव राजे यांनी मुंबईत पायलट प्रोजेक्टची सुरुवातसुद्धा केली आहे. दक्षिण मुंबईत जवळपास १००-१५० झाडांचा अभ्यास केला जाईल. यात मलबार हिल, पेडर रोड आणि जवळपासची झाडेही अभ्यासली जातील. यात झाडांना कसला संसर्ग झाला असेल किंवा अजून काही इजा झाली असेल तर त्यावर उपाय शोधून तसे त्वरित केले जातील. आर्बोरिस्ट वैभव राजे सर्व माहिती एकत्र करतील आणि ती बीएमसीला देतील.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणीही तो राबवला जाईल. यामुळे अनेक झाडांना कोसळण्यापासून रोखता येणार आहे आणि होणारे अपघातही टाळता येणार आहेत. हा उपक्रम लवकरात लवकर यशस्वी होऊन मुंबईतली वनराई वाचू शकेल अशी आशा करूयात.
लेखिक: शीतल दरंदळे