छुपाकॅब्रा: रक्त पिणाऱ्या गूढ प्राण्यामागची अचंबित करणारी खरी गोष्ट!!
अफवा पसरायला कितीसा वेळ लागतो? या प्रश्नाचे उत्तर देणे तसे खूपच कठीण. अगदी प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा कुणाचा वेग असेल तर तो अफवेचा आणि मग या अफवेतून कितीतरी भन्नाट कल्पना जन्म घेतात. १९९५च्या दरम्यान अमेरिकेमध्ये अशाच एका अफवेने जन्म घेतला. अमेरिकेतल्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या या अफवेने पाहत पाहता सारा देश आणि त्यांनतर पूर्ण दक्षिण अमेरिका व्यापून टाकला. या अफवेने इतकी दहशत माजवली होती की, या अफवेमागील तथ्य शोधण्यासाठी अमेरिकन सरकारला एक कमिटी स्थापन करावी लागली होती.
कॅरेबियन बेटसमूहात प्युर्टो रिको नावाचा देश आहे, अमेरिकेने त्याला आपला कॉमनवेल्थ म्हणून जाहिर केला आहे. पण ना तो स्वतंत्र देश आहे आणि अमेरिकेचं राज्यही नाही अशी त्याची थोडी विचित्र अवस्था आहे. ही घटना आहे याच प्युर्टो रिको बेटावर घडलेली.
अस्वलाइतक्या आकाराचा, शेपूट असणारा, मानेपासून कमरेपर्यंत सरळ रेषेत अंगावर काटे असणारा, दिसायला एलियनसारखा असणारा एक नवा प्राणी पृथ्वीवर आला असून या प्राणी पाळीव प्राण्यांचे रक्त शोषून घेतो अशा अफवेने प्युर्टो रिकनच्या परिसरात चांगलाच जम बसवला होता. याला कारणही तसेच होते. अचानकपणे शेतावरील कोंबड्या, कुत्री, डुकरे, मांजरे, शेळी, ससे अशी पाळीव जनावरे मृत्यू पावलेली आढळत. कुठलीही रोगराई नसताना या प्राण्यांचा असा अचानक मृत्यू होण्यामागे हा एलियनसारखा दिसणारा प्राणीच जबाबदार आहे. हा प्राणी इतर प्राण्यांना आपले भक्ष्य बनवतो आणि त्यांचे रक्त शोषून घेतो, असे यांचे मत होते.
प्यूर्टो रिकनमधल्या मेडलीन टोलेंटिनो हिने तर रात्री हा प्राणी स्वतः डोळ्यांनी पहिल्याचा दावाही केला होता. जनावरांचे रक्त शोषून त्यांचे शिरकाण करणाऱ्या या नव्या प्राण्याचे नाव होते छुपाकॅब्रा. स्पॅनिश भाषेत छुपाकॅब्राचा अर्थ होतो- रक्तपिपासू!!
प्यूर्टो रिकनमधल्या पाळीव प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लगली होती. हळूहळू मेक्सिको, चिले, अर्जेंटिना, कोलंबिया, अमेरिका या आणि इतर देशांतील लोकही याच प्रकारे त्यांचे पाळीव प्राणीही संपत असल्याची तक्रार करू लागले. पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याची कुणालाच कसलीही कल्पना नव्हती. म्हणूनच प्रत्येकाला या एलियनसारख्या दिसणाऱ्या छुपाकॅब्रावरच दाट संशय होता. हा छुपाकॅब्रा कसा दिसतो, तो कुठून आला, याबद्दल प्रत्येकांनी स्वतःची एक वेगळी थेरी मांडली होती. या प्राण्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य गोष्टी गुंफण्यात आल्या होत्या. काही लोकांनी तर हा प्राणी आपण प्रत्यक्षात पाहिला असल्याचाही दावा केला होता.
इतक्या देशांत याचा प्रसार झाल्यानंतर बेंजामिन रॅडफोर्ड यांच्या नेतृत्वाखाली छुपाकॅब्रामागचे गौडबंगाल नेमके काय आहे, खरंच असा कुठला प्राणी अस्तित्वात आहे का, वगैरे प्रश्नांची उत्तरे शोधून एकदाचा त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. या सगळ्या प्रयासात बेंजामिन यांना दक्षिण अमेरिकेतील एकूणएक जंगले पालथी घालावी लागली. इतकी भटकंती केल्यानंतर त्यांची प्रत्यक्षात छुपाकॅब्रा पाहिलेल्या एका माणसाची भेट झाली. तिचे नाव होते मेडलीन टोलेंटीनो. तिचे म्हणणे होते की तिच्या घराच्या खिडकीतून तिने हा प्राणी पहिला होता. दोन पायांवर चालणाऱ्या या प्राण्याचे डोळे काळे होते, त्याची त्वचा काटेरी होते. पाठीवर सरळ रेषेत मोठमोठे काटे होते. हाच प्राणी पाळीव प्राण्यांचे रक्त शोषून घेतो आणि त्यांना मारून टाकतो याबद्दलही तिला खात्री होती. हा प्राणी कांगारू प्रमाणे उड्या मारत पळतो अशीही माहिती तिने दिली.
त्यानंतर बेंजामिननी हा प्राणी पाहणाऱ्या इतरही काही लोकांची भेट घेतली. काही लोकांनी छुपाकॅब्राचे केलेले वर्णन हे मेडलीनच्या वर्णनाशी जुळणारे होते, तर काहींचे अगदी वेगळे होते. काहींच्या मते हा प्राणी दोन पायांवर चालत नसून तो चार पायांचा आहे.
या सगळ्या माहितीवरून रॅडफोर्डला या प्राण्याबद्दल नेमकी काहीच माहिती मिळत नव्हती. त्याचे संशोधन अगदी जैसे थे परिस्थितीत होते. छुपाकॅब्रा नावाचा कुठला नवा प्राणी अस्तित्वात आला आहे, याचा कुठलाच पुरावा बेंजामिन यांना सापडला नव्हता. अर्थात, असा कुठला प्राणीच नाही, असेही म्हणणे चुकीचे ठरले असते. कदाचित आपल्या नजरेत आतापर्यंत न आलेला हा कुठला तरी नवा प्राणी असू शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नव्हती. लोकांनी छुपाकॅब्राबद्दल दिलेल्या माहितीवरून गोंधळात अजून भरच पडत होती.
काही दिवसांनी छुपाकॅब्राचा एक नवा भाऊ उदयास आला. या नव्या प्राण्याच्या अंगावर काटे नव्हते. त्याची त्वचा एकदम तुकतुकीत आणि सैलसर होती. याला चार पाय होते आणि शेपूटही होती. हा नवा प्राणी कुत्र्यासारखा दिसत होता. अचानकच ठिकठिकाणी या नव्या प्राण्याचे मृतदेह आढळून येऊ लागले.
आजपर्यंत इतर प्राण्यांच्या मृत्यूमागे छुपाकॅब्राचा हात होता. आता या छुपाकॅब्राच्या मृत्यूचे कारण काय हे मात्र कुणालाही माहिती नव्हते. या प्राण्याचा मृतदेह मिळताच लोक अधिकाऱ्यांना कळवत. अधिकारी जेव्हा या प्राण्यांचे मृतदेहाचे निरीक्षण करत तेव्हा हा कुठला नवा प्राणी नसून कुत्रा किंवा कायोटी नावाचा कोल्हा-लांडगा वर्गातला प्राणी असल्याचे स्पष्ट होत असे.
कुत्रा, कायोटी यांसारख्या प्राण्यांमध्ये त्यावेळी एक नवा रोग आढळला होता. ज्याला आपण लूत भरणे म्हणतो. ज्यामुळे या प्राण्यांच्या त्वचेवरील सगळे केस निघून जात आणि त्यांची त्वचा सैल पडत असे. केसांचे आवरण गळाल्यामुळे यांचा आतील सांगाडाही स्पष्ट दिसत असे. या आजारामुळे कुत्र्याचे रूपच पालटून जाई. या मेलेल्या कुत्र्यांनाच लोक छुपाकॅब्रा समजू लागले होते.
लोक ज्याला छुपाकॅब्रा म्हणत होते त्या प्राण्यांच्या मृतदेहाची, त्यांच्या डीएनएची तपासणी केल्यानंतर त्यात काहीच वेगळेपण आढळून आले नाही. उलट लूत भरलेल्या कुत्र्यांना आणि कायोटीलाच हे लोक छुपाकॅब्रा म्हणत असल्याचे स्पष्ट झाले. कुत्र्याच्या चावण्याने कुठलाही प्राणी मरू शकत नाही, त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमागे यांचा कसलाच हात नाही, हे तर सिद्ध झाले. पण मुळात प्यूर्टो रिकन्समध्ये या अफवेला कशी काय हवा मिळाली यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर असे आढळून आले की इथल्या लोकांची मानसिकता अमेरिकाविरोधी आहे. अमेरिकेने त्यांच्यावर आजपर्यंत जुलूम केल्याची भावना या लोकांच्या मनात घर करून आहे. त्यातूनच अमेरिका आपल्या प्रयोगशाळेतून असे काही प्राणी निर्माण करत आहे ज्यामुळे आपल्या देशात हाहाकार माजेल अशीही या लोकांची कल्पना होती. त्यांच्या या कल्पनेतूनच छुपाकॅब्राचा जन्म झाला होता.
राहिला प्रश्न मेडलीनचा. तिने पाहिलेला प्राणी तर या लूत भरलेल्या कुत्र्यांप्रमाणे दिसणारा नव्हता. तिचे वर्णन तर या सर्वांपेक्षा वेगळेच होते. बेंजामिन यांनी यावरही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते मेडलीनने ज्यावर्षी छुपाकॅब्रा पाहिल्याचा दावा केलाच त्याचवेळी हॉलीवूडमध्ये एक साय-फाय चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्पेसीज नावाचा. यात एक माणूस आणि एलियन यांच्याशी साधर्म्य असणारा एक प्राणी दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण प्यूर्टो रिकनच्या परिसरातच झाले होते. मेडलीनहे हे चित्रीकरणच पाहिले होते. तेव्हा तिला समजले नव्हते की हे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. उलट एलियन सारखा दिसणारा हा प्राणीच छुपाकॅब्रा असल्याचा तिने समज करुन घेतला होता.
इंटरनेटच्या जमान्यात अफवा पसरण्याचा वेग किती वाढला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. इंटरनेटने छुपाकॅब्राच्या या अफवेला चांगलीच हवा दिली. त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात असा प्रवास करत या अफवेने संपूर्ण दक्षिण अमेरिका व्यापून टाकले.
छुपाकॅब्रा नावच्या कुठल्याही एलियनने पृथ्वीवर प्रवेश केला नसल्याचे तर कालांतराने स्पष्ट झाले पण ज्या घटनेमुळे ही अफवा पसरण्यास बळ मिळाले, तिचे कारण म्हणजे मोठ्या संख्येने पाळीव प्राण्यांचा मृत्यू होण्यामागचे कारण अजूनही अज्ञातच आहे. म्हणूनच अजूनही इथे एखादी शेळी, कुत्रा किंवा मांजर गायब झालेच तर त्यामागे छुपाकॅब्राचाच हात असतो.