२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?
आपला देश प्राचीन काळापासून सोन्याचा देश म्हणून ओळखला जातो. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा रावणाची लंका सोन्याची बनली होती असे संदर्भ वारंवार आपल्याला वाचायला मिळतात. तुम्हांला माहीत आहे का, भारतातलं सगळं सोनं एकत्र करून विकलं- अर्थातच ते अशक्य आहे- तर आपण सगळेचजण २-३ वर्ष बसून खाऊ शकू !! म्हणजे आपल्या सर्वांकडे मिळून इतकं सारं सोनं आहे. म्हणूनच येत्या काही लेखांमध्ये आपण जरा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल म्हणजेच सोन्याबद्दल चर्चा करूया !
पहिला प्रश्न मनात येतो ते भारतात इतकं सोनं का आहे ? तर भारतात इतकं सोनं जमा करण्याला काही सामाजिक आणि ऐतिहासिक कारणं पण आहेत. परकीय आक्रमण, त्यामुळं सतत बदलणाऱ्या राजसत्ता, वारंवार येणारे दुष्काळ, आणि अगदी मध्यरात्रीसुद्धा सहज विक्री होऊ शकणारी ही एकमेव संपत्ती आपल्याकडे होती. भारतात सोनं हे सहसा दागिन्यांच्या स्वरूपातच आढळतं. गुंतवणूक म्हणून नाणी किंवा चिपा (बिस्कीट) सोनं जमा करणारे लोकं तशी फारच कमी आहेत.
आता या दागिन्यांची गंमत अशी आहे की हे दागिने घडवण्यासाठी २४ कॅरेटचं सोनं किंवा आपण ज्याला बावन्नकशी सोनं म्हणतो, ते वापरता येत नाही. शुद्ध सोनं अतिशय लवचिक असतं. म्हणून त्यात तांबं मिसळून नंतर दागिने घडवले जातात. दागिन्यांची शुद्धता ही त्यात मिसळलेल्या तांब्यासारख्या धातूंवरती अवलंबून असते.
आता समजून घेऊया २४ कॅरेट सोनं म्हणजे काय ?
२४ कॅरेटचं सोनं म्हणजे ९९.५% आणि त्याहून अधिक शुद्ध असलेलं सोनं. २२ कॅरेट म्हणजे ९१.७%. १८ कॅरेट म्हणजे ७५%.
मग शुद्धता टक्केवारी मध्ये कशी मोजली जाते?
जर २४ कॅरेट सोनं शुद्ध, तर १८ किंवा २२ कॅरेट शुद्धता आपल्या गणितातल्या त्रैराशिकातूनच अधिक चांगल्या प्रकारे सांगता येईल...
१८ कॅरेट सोनं म्हणजे १८/२४x १०० = ७५
२२ कॅरेट सोनं म्हणजे २२/२४x १०० = ९१.६
दक्षिण भारतात प्रामुख्यानं १८ आणि २० कॅरेटच्या सोन्याचा वापर केला जातो, तर उत्तर भारतात २२ कॅरेटचं सोनं प्रामुख्याने वापरलं जातं. पण हे झालं सोन्याच्या शुद्धतेविषयी. दागिने बनवताना अनेक छोटे छोटे भाग आधी घडवले जातात आणि नंतर डाग म्हणजेच नेहमीच्या भाषेत सोल्डर देऊन दागिना तयार करतात. म्हणून तयार दागिना काही वर्षांनी मोडून त्याचा नवीन दागिना बनवायचा झाला, किंवा विकायचा झाला तर सोनार वजनात घट मांडतो किंवा वजावट करतो. याला ‘कसर’ असं म्हणतात.
पण काही वर्षांपूर्वी डाग देण्यासाठी हिणकस धातूंचा वापर करण्यापेक्षा कॅडमियम या धातूचा वापर करायला सुरुवात झाली. कॅडमियम हे उच्चार करायला कठीण असल्यामुळे कारागिरांनी आणि सोनारांनी त्याचा उल्लेख KDM असा करायला सुरुवात केली. बरीच वर्ष सोनाराच्या दुकानाच्या बाहेर 'KDM चे दागिने मिळतील' अशी पाटी तुम्ही बघितलीच असेल. कॅडमियम सोन्यापेक्षा कमी तापमानाला वितळतं. त्यामुळे दागिना मोडताना कॅडमियम सहज वेगळं करता येतं. याचा फायदा अर्थातच ग्राहकाला मिळत असे. बरीच वर्ष ही पद्धत चालल्यानंतर BIS ने (Bureau of Indian Standards) कॅडमियमच्या वापरावर बंदी घातली. त्यामुळे KDM लिहिलेल्या पाट्या आता दिसेनाश्या झाल्या. पण कॅडमियमचा वापर मात्र अजूनही सर्रास चालू आहे.
कॅडमियमवर बंदी आणण्याचे मुख्य कारण असं होतं की कॅडमियम हा अत्यंत विषारी धातू आहे. जे कारागीर कॅडमियमने दागिने घडवतात, त्यांच्या शरीरात कॅडमियमचा धूर जातो. त्यामुळे कॅन्सरसारखा दुर्धर रोग होऊ शकतो. केवळ घट कमी व्हावी किंवा कसर कमी व्हावी म्हणून KDM दागिने वापरणे अयोग्य आहे. BIS नं शुद्ध सोन्याच्या काही मानांकनासाठी हॉलमार्क पद्धती अंमलात आणली आहे. त्याबद्दल आपण दुसऱ्या भागात वाचूया !!