computer

राजीवजींच्या हत्याकांड तपासातलं एक प्रकरण: सत्यमेव जयते शोध राजीव- हत्येचा पुस्तकातून थेट!!

आज जागतिक दहशतवाद विरोधी दिन आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

२१ मे १९९१ ची रात्र. घड्याळात १० वाजून २० मिनिटं झाली. ती तरुणी आदरानं झुकली. तिचा हात त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला. आणि अचानक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला...धुराचे ढग विरले आणि समोर आला छिन्नविछिन्न मृतदेहांचा रक्तमांसाचा चिखल... ही आहे मन गोठवणारी कहाणी. थरारक पण उदास करणारी.

राजीव गांधींना कोणी व का मारलं?

हे गूढ उकलण्यासाठी डी. आर. कार्तिकेयन यांना भारत सरकारनं पाचारण केलं. या घटनेवर डी. आर. कार्तिकेयन आणि राधाविनोद राजू यांनी लिहिलेल्याThe Rajiv Gandhi Assassination: The Investigation या पुस्तकाचा मराठी अनुवाद सारंग दर्शने या आघाडीच्या पत्रकाराने मराठीत केला आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि तपासाची कथा सांगणारं या पुस्तकातले एक प्रकरण खास 'बोभाटा'च्या वाचकांसाठीच आज प्रकाशित करतो आहोत.

या पुस्तकाचे प्रकाशक राजहंस प्रकाशन यांचे आम्ही आभारी आहोत.

२१ मे १९९१ ची काळरात्र

नुकतेच आठ वाजून गेले होते. सत्तरी उलटलेल्या मार्गाथम चंद्रशेखर चेन्नईच्या जुन्या मीनाम्बक्कम विमानतळावर माजी पंतप्रधान आणि इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची वाट पाहत उभ्या होत्या. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची ती धामधूम. श्रीपेरुम्बुदूर लोकसभा मतदारसंघात मार्गाथम इंदिरा काँग्रेसच्या उमेदवार होत्या. हे गाव चेन्नईहून नैऋत्येकडं पन्नास किलोमीटर अंतरावरचं. आपल्या झंझावाती प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात श्रीपेरुम्बुदूरला यायचं राजीव गांधी यांनी स्वत: ठरवलं होतं. मार्गाथम या इंदिराजींच्या विश्वासू साथीदार होत्या. त्यांच्याबरोबर इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वझापडी राममूर्ती आणि माजी प्रदेशाध्यक्ष जी. के. मूपनार हेही विमानतळावर वाट पाहत होते.

तामिळनाडूतल्या इंदिरा काँग्रेस पक्षात तेव्हा दुफळी माजली होती. राममूर्ती गटाला अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) या जयललितांच्या पक्षाशी युती हवी होती; तर मूपनार गटाचा अशा आघाडीला कडाडून विरोध. मात्र निवडणुका आल्यानं दोन्ही गटांनी तात्पुरती शस्त्रं म्यान केली होती आणि एकीचा आभास निर्माण केला होता, इतकंच. तामिळनाडूत काँग्रेसनं सत्तेचं सुख अनुभवलं, त्याला आता २५ वर्षं उलटली होती. अण्णा द्रमुकचे सर्वेसर्वा आणि जयललितांचे मार्गदर्शक एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर राज्यात स्वतंत्रपणे पाय रोवण्याचे प्रयत्न काँग्रेसनं १९८८-८९ च्या एका निवडणुकीत केले होते; पण तेव्हा पक्षाचा धुव्वा उडाला होता. आता अण्णा द्रमुकशी आघाडी आणि राजीव गांधींचा दौरा यांच्यामुळं स्थिती सुधारेल, अशी आशा वाटू लागली होती; तरी आपली आघाडी जिंकणारच असल्यानं राजीव गांधी राज्यात प्रचाराला नाही आले, तरी चालेल, असंच राममूर्तीना वाटत होतं.

या नेत्यांच्या जरा पुढं राज्य पोलीस दलाच्या विशेष शाखेचे पोलीस अधिकारी उभे होते. राजीव आता पंतप्रधान नसले, तरी ते अनेक दहशतवादी संघटनांचं लक्ष्य असणार, असं गृहीत धरून त्यांना ही खास सुरक्षा देण्यात आली होती. राजीव गांधींचे खासगी सुरक्षा-अधिकारी पी. के. गुप्ता दिल्लीहून येऊन या सुरक्षा पथकात सामील झाले. विशाखापट्टणमहून येणाऱ्या राजीव गांधींच्या आगमनाची वाट पाहत हे पथक थांबलं होतं. चेन्नईच्या पुढच्या प्रवासात ते राजीव गांधींसोबत असणार होतं. ओ. पी. सागर हे दुसरे सुरक्षा अधिकारी दिल्लीपासून ओरिसा आणि आंध्रप्रदेशातील निवडणूक दौऱ्यात राजीव गांधींबरोबर होते. चेन्नईत आपलं काम ते गुप्तांकडे सोपवणार होते.

राजीव गांधींनी २० मे रोजी दुपारीच दिल्ली सोडली होती. प्रचाराचा अखेरचा टप्पा पुरा करण्यासाठी काँग्रेसनं त्यांच्यासाठी दिल्ली फ्लाइंग क्लबचं किंग एअर विमान भाड्यानं घेतलं होतं. त्याशिवाय हा महाकाय देश पिंजून काढणं शक्यही नव्हतं. दोन दिवसांत ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये सभा घेऊन राजीव २२ तारखेला दिल्लीत पोहोचणार होते. दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रसिद्धी सल्लागार सुमन दुबे, सुरक्षा अधिकारी ओ. पी. सागर, दोन बल्गेरियन वार्ताहर आणि विमानातले कर्मचारी होते. ते तर राजीव गांधींचे जुने मित्रच होते. ओरिसाची राजधानी भुवनेश्वर आणि आंध्रच्या काही भागांमधल्या सभा उरकून राजीव २१ मे रोजी संध्याकाळी विशाखापट्टणमहून चेन्नईला येणार होते. विमान-उड्डाणाची वेळ झाली आणि दूरसंपर्क यंत्रणा कामच करत नसल्याचं कॅप्टन चंडोक यांच्या लक्षात आलं. राजीव स्वत: पूर्वी 'इंडियन एअरलाइन्स'मध्ये वैमानिक असल्यानं त्यांनीही प्रयत्न करून पाहिला; पण व्यर्थ. अखेर ती रात्र विशाखापट्टणममध्येच घालवावी, असं राजीवनी ठरवलं, पण नियतीच्या मनात काही निराळंच होतं.

(राजीव गांधींच्या अंत्यसंस्काराच्या वेळचे छायाचित्र)

मुक्कामाच्या तयारीनं राजीवनी विमानतळ सोडला आणि सदोष स्विचमुळं संपर्क होत नसल्याचं उड्डाण-अभियंत्याच्या लक्षात आलं. सुदैवानं जादा स्विच मिळाला. तो बसवून लगेच पोलिसांकरवी राजीवना निरोप पाठवण्यात आला. राजीवही तातडीनं विमानतळावर आले. या गडबडीत राजीव गांधींचे सुरक्षा अधिकारी ओ.पी. सागर मात्र तिथंच राहिले. ते वेगळ्या गाडीत होते. सागरच चेन्नईत आपल्याजवळचं शस्त्र आणि पुढं दिल्लीपर्यंत राजीवना संरक्षण देण्याची जबाबदारी गुप्तांकडं सोपवणार होते! ते शस्त्रही त्यांच्याजवळच राहिलं. बरोबर सायंकाळी ६.३० वाजता विमान उडालं. राजीव स्वत: विमान चालवत होते. ही विमानभरारी अखेरची ठरेल, याची त्यांना कुठून कल्पना असणार?

रात्री ८.२०ला विमान चेन्नईत उतरलं आणि राजीव राममूर्ती, मार्गाथम चंद्रशेखर आणि खाजगी सुरक्षा अधिकारी यांच्यासहित बुलेटप्रूफ गाडीनं निघाले. वाटेत त्यांनी पोरूर आणि पूनामल्ली इथल्या प्रचार सभांमध्ये भाषणं केली. सुमन दुबे यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स' आणि 'गल्फ न्यूज'च्या वार्ताहरांना मुलाखतीसाठी वेळ दिला होता. हे दोन्ही वार्ताहर पोरूरला राजीव गांधींच्या गाडीत शिरले आणि श्रीपेरुम्बुदूर येईपर्यंत त्यांची प्रश्नोत्तरं चालली होती. तिथल्या सभेची जबाबदारी मार्गाथम् यांचे सहकारी ए.जे.दास यांच्यावर होती. या सभेला खूप गर्दी होणार, अशी चिन्हं होती.

ग्रँड वेस्टर्न ट्रंक महामार्गावर श्रीपेरुम्बुदूरचा फाटा जिथं फुटतो, तिथनं अगदी जवळच एका मंदिराच्या विशाल मैदानावर ही सभा होणार होती. संध्याकाळी सहापासूनच माणसं जथ्या-जथ्यानं तिथं येत होती. आता तर मैदान माणसांनी फुलून गेलं होतं. राजीवच्या येण्याची वेळ जवळ येत चालली, तशी दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांची धावपळ वाढली. राजीव गांधींच्या सन्मानार्थ एक विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एका तात्पुरत्या उभारलेल्या व्यासपीठावर इंदिराजी आणि राजीव यांचे भव्य कट-आउट्स रंगबिरंगी दिव्यांच्या रोषणाईनं झळाळत होते. त्या व्यासपीठावर हा संगीत कार्यक्रम सुरू होता. अवघ्या काही दिवसांपूर्वी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभेसाठी निवडलेल्या त्या उजाड माळाचं आज झगमगते दिवे, कर्कश संगीत आणि माणसांची तुडुंब गर्दी यामुळं रूप पालटलं होतं. 

ही सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिकस्त चालवली होती. राजीव काँग्रेसचे अध्यक्ष तर होतेच; पण काँग्रेससाठी मतं खेचण्याची ताकद त्यांच्याकडेच प्रामुख्यानं होती. ही निवडणूक जिंकून राजीव पुन्हा पंतप्रधान होणार, अशी हवा होती. मैदानात आल्यावर राजीव आधी काही मीटरच जवळ असलेल्या इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हार घालणार होते. त्यानंतर तात्पुरत्या उभारलेल्या मंचापर्यंत घातलेल्या लाल गालिच्यावरनं चालत, भोवतालच्या जनतेच्या शुभेच्छा स्वीकारत येणार होते. गालिच्याच्या दोहो बाजूंनी बांबूचे तात्पुरते कठडे उभारले होते. या अडथळ्यांच्या पुढे येण्याची जनतेला परवानगी नव्हती. ती फक्त तेथूनच राजीवना अभिवादन करू शकणार होती. मंचाच्या पायथ्याशी काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते राजीव गांधींचं स्वागत करणार होते. त्यानंतर मंचावर काही निवडक नेतेच त्यांना हार घालणार होते. मगच सभेला सुरुवात होणार होती. सभा चांगलीच लांबणार, अशी लक्षणं दिसत होती आणि अद्याप सुरुवातच व्हायची होती.

(या कटातली एक आरोपी नलिनी)

मंचापासून थोड्या अंतरावर उभे असलेले दास एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देत होते. मार्गाथम यांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रत्येक गोष्ट सुरळीत पार पाडणं ही त्यांची जबाबदारीच होती. लाल गालिच्यावर जाऊन राजीव गांधींचं स्वागत करण्याची संधी कोणाला द्यायची, याचाही निर्णय दासच करत होते. जिवाला धोका असणाऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांचे कार्यक्रम असतात, तेव्हा त्यांच्याजवळ कोणाला जाऊ द्यायचं, याबाबत सुरक्षा अधिकारी नेहमीच संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्या-नेत्यांना विश्वासात घेतात. कारण त्यांना तिथली माणसं माहीत असतात. दास यांनी मान्यता दिलेल्या अशा स्वागतेच्छू कार्यकर्त्यांची यादी करण्यासाठी एक स्वतंत्र पोलीस उपनिरीक्षकच नेमला गेला होता. या कार्यकर्त्यांची तपासणी करून राजीवजींच्या जवळ त्यांना जाण्यास परवानगी देण्याची जबाबदारीही त्याचीच होती.

सभेच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस महानिरीक्षक आर. के. राघवन यांच्यावर होती. भारतीय पोलीस सेवेतले ते एक ज्येष्ठ अधिकारी होते. १७ मे रोजी राजीव गांधी यांचे श्रीपेरुम्बुदुर तामिळनाडूतले अन्य कार्यक्रम ठरल्याचे कळले, तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या गुप्तचर आणि पोलीस यंत्रणा आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उभारण्यात गुंतल्या होत्या.

(अबोलीचा गजरा माळलेली धनु स्युसाईड बाँबर आहे)

जमावावर एकंदरीत नियंत्रण ठेवणं आणि सभास्थानी घुसखोरी थोपवणं याबाबतच्या तपशीलवार सूचना २० तारखेलाच जारी झाल्या. त्याच वेळी संयोजकांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि राजीवना भेटणाऱ्यांची यादी करण्यासाठी उपनिरीक्षक नेमण्यात आला. या उपनिरीक्षकाला धातुशोधक यंत्रं घेतलेले दोन पोलीस मदतीला देण्यात आले. सभेसाठी तीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उपनिरीक्षक अनसूया या त्यांच्यापैकीच एक. त्या आणि आणखी एका महिला हवालदाराची लाल गालिच्याच्या परिघात दक्षतेसाठी नेमणूक करण्यात आली होती. सामान्यपणे महिलांची शारीरिक तपासणी करण्याचा अधिकार पुरुष पोलिसाला वा अधिकाऱ्याला नसल्यामुळे या दोघी महिला पोलिसांवर ती जबाबदारी होती. पण ना त्यांच्याकडे धातुशोधक यंत्र होतं, ना राजीवच्या स्वागताला निवडलेल्या महिलांची शारीरिक तपासणी करण्याबाबत स्पष्ट सूचना! गर्दी करणाऱ्या स्त्रियांना आवरण्याचं काम मात्र त्यांच्याकडं सोपवण्यात आलं होतं.

राघवन यांनी चौफेर नजर फिरविली आणि ते सरळ सरळ नाराज झाले. त्या ठिकाणी हजर असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तीच भावना होती. एकतर पोलिसांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे बांबूचे कठडे उभारलेले नव्हते. दुसरीकडं, जरा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला की, सभाव्यवस्थेत मदत करणारे काँग्रेस कार्यकर्ते त्याला कसून विरोध करत होते. सभा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पोलिसांच्या शंका आणि सूचना म्हणजे नसत्या कटकटी होत्या. त्यामुळे कार्यकर्ते त्याकडं दुर्लक्षच करत होते.

(आरोपींच्या लपण्याची जागा)

मंचाजवळ संगीताच्या गोंगाटात दिव्यांच्या झगझगाटात दास उभे राहिले आणि राजीवना भेटण्याच्या यादीत आपलंही नाव जावं, यासाठी कार्यकर्ते त्यांना गळ घालू लागले. या गर्दीतच मार्गाथम चंद्रशेखर यांच्या लता प्रियाकुमार या मुलीसाठी पक्षाचं काम करणारी अराकोणम् इथली लता कन्नन ही कार्यकर्ती होती. तिच्यासोबत कोकिळाला ही तिची तरुण मुलगीही होती.

लता कन्नननं काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता अन् तिला पक्षकामाचा नवथर उत्साह होता. तिच्या वडिलांनी तमीळमध्ये केलेल्या कवितेचा अनुवाद कोकिळानं केला होता. मे महिन्याच्या सुरुवातीलाच लतानं ही कविता राजीव गांधींना टपालानं पाठवली होती; अन् आता कोकिळानं राजीव गांधींना ही कविता प्रत्यक्ष ऐकवावी, यासाठी तिची सगळी धडपड चालली होती.

लताचा मतदारसंघ वेगळा असल्यानं दास तिला ओळखत नव्हते. त्यामुळं तिला ओळखणारं कुणीतरी आसपास दिसेपर्यंत आणि त्या व्यक्तीनं कोकिळाची शिफारस करेपर्यंत तिला थांबणं भाग पडलं. अखेर मार्गाथम् चंद्रशेखर यांच्या कन्या लता प्रियाकुमार रात्री सव्वानऊला तिथं आल्या. त्यांनी मग दास यांच्याकडे जाऊन कोकिळाला राजीवजींना कविता ऐकवण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तिथनं लता प्रियाकुमार घाईघाईनं इंदिराजींच्या पुतळ्याकडं निघाल्या. तेथे त्या राजीव गांधींचं स्वागत करणार होत्या.

दास यांनी कोकिळेचं नाव पोलिसांकडं दिलं. आता राजीव गांधी यांचं स्वागतकरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या यादीत २३ नावं झाली. त्यांतली कोकिळा ही एकटीच महिला होती. तिघे जण राजीवना प्रत्यक्ष मंचावर हार घालणार होते. इतर मात्र मंचाच्या पायऱ्यांपाशीच त्यांना भेटणार होते.

परवानगी मिळाल्याच्या आनंदात लता कन्नन त्या खास २३ जणांच्या गटापाशी जायला निघाली. तिच्या मागे-मागे नारिंगी-हिरवा सलवार-कमीझ घातलेली एक चष्मीस तरुणी येत होती. हातात चंदनाचा हार घेतलेल्या त्या तरुणीकडं फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. काही मिनिटांपूर्वीच ती लता कन्ननबरोबर होती. तिच्यासोबत एक छायाचित्रकारही होता. स्थानिक पत्रकार आणि छायाचित्रकार त्याला 'हरिबाबू' या नावानं ओळखत होते. या चष्मीस तरुणीबरोबर आणखीही तिघं होते. त्यांतल्या दोघी फॅशनेबल साड्या नेसलेल्या महिला होत्या, तर एक पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला चष्मीस तरुण होता. दास यांच्या परवानगीची लता कनन वाट पाहत असताना हे सगळे तिच्याकडे पोचले. तिथं जमलेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांत, सहज आत्मविश्वासानं लता कन्ननला वावरताना त्यांनी पाहिली होती. लताकडं आल्यावर साडीतल्या एका बाईनं तिला सांगितलं, 'माझ्या या मैत्रिणीलाही राजीव गांधींना हार घालायचाय.'

(हरिबाबू या २२ वर्षांच्या फ्रीलान्स फोटोग्राफरने घेतलेला हा फोटो आहे. तो या स्फोटात मरण पावला. हा फोटो तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरला. फोटोतली भगव्या रंगाच्या कपड्यातली बाई धनु आहे, शेजारी लता कन्नन आणि तिची १५ वर्षांची मुलगी आहे. शिवराजन नावाचे पत्रकार उभे आहेत.)

कोकिळा आणि लता कनन इतरांसमवेत थोड्या अंतरावर उभं राहून गांधींची वाट पाहत असताना ही हार घेतलेली चष्मीस तरुणीही त्यांच्यात मिसळून गेली. तिच्या दोन महिला साथीदार महिलांच्या विभागाकडं सरकल्या. खास या सभेसाठी उसना मागून आणलेला शिनॉन कॅमेरा हरिबाबून रोखला आणि त्या दिवशीचं पहिलं छायाचित्र टिपलं. हातात वही आणि पेन घेतलेला कुर्ता-पायजम्यातील तरुण काहीसा दूर कोणाच्या नजरेत भरणार नाहीसा शांतपणे उभा होता. तिथल्या इतर सगळ्या वार्ताहरांसारखा तोही एक. हरिबाबू मग महिलांच्या विभागाकडं वळला आणि त्यानं आणखी एक छायाचित्र टिपलं. त्याच्या दोन मैत्रिणी दूर कोपऱ्यात उभ्या होत्या, पण त्यांच्या झकपक साड्यांमुळं नजरेतही भरत होत्या.

उपनिरीक्षक अनसूया आणि एक महिला हवालदार लाल गालिच्यापाशी होत्या. तिथं बरीच गर्दी जमली होती. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेस कार्यकर्ते राजीवना भेटण्याची संधी मिळावी, यासाठी दास यांच्याशी हुज्जत घालत होते. ज्यांना आधीच परवानगी मिळाली होती, ते एका बाजूला गटानं उभे होते. पोलिसांनी एकीकडं हातात यादी घेऊन काहींची धातुशोधक यंत्रानं तपासणी केली होती. परवानगी मिळालेल्या २३ जणांपेक्षा कितीतरी जास्त कार्यकर्ते राजीव गांधींची वाट अडवून उभे होते, हे उघड दिसत होतं. सभास्थानी गोंधळ, गडबड होऊ नये, यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना आवरण्याची जबाबदारी संयोजकांची असल्याचं एकीकडे पोलीस गृहीत धरून चालले होते; तर एकाच वेळी सतराशेसाठ गोष्टींत अडकून पडल्यामुळे दास यांची अशी समजूत होती की, पोलिसांकडं आता परवानगी दिलेल्या लोकांची यादी आहे. तेव्हा घुसलेल्या लोकांना तिथून हुसकावून लावण्याचं काम ते करतील.

(या कारस्थानाचा मास्टरमाईंड -प्रभाकरन)

राजीव गांधी पोहोचले, अशी बातमी थकडली आणि संगीताचा कार्यक्रम थांबला. 'राजीवना भेटण्याची परवानगी मिळालेल्या सगळ्यांनी मंचापाशी लाल गालिच्यावर थांबावं,' असं दास यांनी सांगितलं खरं, पण ज्यांना परवानगी नव्हती, अशांनीही एकच गर्दी केल्यानं कोलाहल माजला. लता कन्नन आणि कोकिळा राजीव गांधींच्या जवळ येण्याच्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होत्या. त्यांना खेटूनच ती चष्मीस तरुणी हातात चंदनाचा हार घेऊन उभी आहे, याचा त्यांना पत्ताही नव्हता. त्या क्षणी 'राजीव गांधी' सोडून इतर कसलंच भान उरलं नव्हतं.

व्यासपीठापासून जवळच असलेल्या इंदिराजींच्या पुतळ्याला राजीव गांधींनी हार घातला. तिथं त्यांच्या स्वागताला काही काँग्रेस नेते थांबले होते. आगत-स्वागत झाल्यावर राजीव गाडीतनं सभास्थानाकडे निघाले. राजीव गाडीतून उतरले, १० वाजून १० मिनिटं झाली होती. त्यांनी गर्दीकडे पाहून हात हलवला. व्ही. राममूर्ती जीपनं आधी आले आणि मंचावर पोचले. ही जीप तामिळनाडू प्रदेश काँग्रेस समितीनंच व्हिडिओग्राफरसाठी भाड्यानं घेतली होती. राजीव गांधींच्या गाडीत दोन परदेशी पत्रकारांना पाठवल्यामुळे राममूर्तीना वेगळं यावं लागलं होतं. तेव्हा राजीव कठड्याच्या जवळ पोहोचल्याचं आणि त्यांनी काही चाहत्यांशी हस्तांदोलन केल्याचं राममूर्तीनी व्यासपीठावरून पाहिलं. गाडीत दोन पत्रकारांच्या मध्ये बसलेल्या मार्गथमना उतरायला वेळ लागला. पण त्यांनी लगबगीनं राजीवना गाठलं आणि आपल्या पाठीराख्यांची ओळख करून द्यायला लागल्या. पण गर्दीपुढे त्या काहीशा मागे पडल्या. राजीव लाल गालिच्याकडे चालता-चालता कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा, हार-फुलं स्वीकारत होते. एका कार्यकर्त्यानं राजीवना शाल घातली आणि त्यानं छायाचित्रकाराला 'पोझ' दिली. फोटो निघेपर्यंत त्यानं राजीव गांधींचे खांदे घट्टे पकडून ठेवले. या कार्यकर्त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न मार्गाथम यांनी केला खरा; पण त्यात त्याच मागे ढकलल्या गेल्या, त्यांचाच तोल गेला. राजीव गांधींच्या सुरक्षा-कड्यातले साध्या पोशाखातले अंगरक्षक आणि गणवेषातले पोलीस यांच्या दृष्टीनं ही गर्दी आवरणं म्हणजे सत्त्वपरीक्षाच होती!

पाठीराख्यांच्या या अनावर धक्काबुक्कीतून राजीव व्यासपीठापाशी आले. राजीव गांधींच्या भोवताली इतकी गर्दी होती आणि माणसं चित्रीकरणाच्या इतकी मध्येमध्ये येत होती की, त्या तात्पुरत्या उभारलेल्या व्यासपीठावर उभं राहून शूटिंग करणाऱ्या व्हिडिओग्राफरांनी सरळ आपले कॅमेरे बंद करून टाकले. व्हिडिओग्राफर्ससाठी उभं राहायला ती एकमेव जागा होती, कारण कॅमेऱ्यांसाठीची पॉवर सॉकेटस् फक्त तिथंच लावण्यात आली होती.

पुरुष कार्यकर्ते आणि पाठीराख्यांच्या शुभेच्छा स्वीकारून राजीव गांधी पुढे महिलांच्या रांगेकडे सरकले. काही पक्ष कार्यकर्त्या महिलांनी त्यांचं स्वागत केलं. त्यापाठोपाठ आईसोबत उभ्या असलेल्या कोकिळानं आपली कविता राजीवना ऐकवली. तितक्यात कोकिळाच्या मागं उभी असलेली ती सलवार-कमीझमधली चष्मीस तरुणी एक पाऊल पुढे टाकत राजीव गांधींच्या दिशेनं सरकली. उपनिरीक्षक अनसूयानं पटकन हातानं तिला रोखलं. पण राजीव गांधींनीच तिला 'येऊ दे' अशी हातानं खूण करीत अनसूयाला 'शांत हो' असं सांगितलं. मग अनसूया किंचित मागे सरकली असता ही तरुणी पुढे आली आणि आता राजीव गांधींच्या अगदी पुढ्यात उभी राहिली. तिनं तो चंदनाचा हार राजीव गांधींच्या गळ्यात घातला. त्यांच्या पायाला हात लावण्यासाठी ती खाली वाकली...

(घटनास्थळी पडलेला रक्तमांसाचा चिखल)

राजीव गांधींना आपल्या बुलेटप्रूफ गाडीतून उतरून तेव्हा बरोबर दहा मिनिटं झाली होती. काटा दहा वाजून विसाव्या मिनिटावर स्थिरावला होता. ती तरुणी खाली वाकली अन् अचानक कान बधिर करून टाकणारा आवाज झाला. राजीव गांधी जिथं उभे होते, तेथे आगीचा वीसफुटी लोळ उसळला आणि पसरला. काही क्षणांनी धुराचा पडदा विरला, तेव्हा राजीव उभे होते, तिथं चैतन्याची पुसटशीही खूण उरली नव्हती. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं!

त्यानंतर बघणाऱ्यांच्या समोर जे आलं, ते दृश्य भीषण, साऱ्या संवेदना गोठवून टाकणारं होतं. सगळीकडे रक्तामांसाचा चिखल विखुरला होता. राजीव गांधी यांच्यासहित १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांत ती चंदनाचा हार घालणारी चष्मीस तरुणी, राजीव गांधींना कविता ऐकविणारी कोकिळा आणि तिची आई लता, छायाचित्रकार हरिबाबू आणि राजीव गांधींचे खासगी सुरक्षा अधिकारी पी. के. गुप्ता यांचा समावेश होता. ३ जणांचा नंतर इस्पितळात मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ पोलीस होते. त्यांत जिल्हा पोलीस प्रमुख महमूद इक्बालही होते. तब्बल ४४ जण जखमी झाले. त्यांतल्या २० जणांच्या जखमा गंभीर होत्या. हरिबाबूचा उसना मागून आणलेला कॅमेरा राजीव गांधींचं अखेरचं छायाचित्र आपल्या कुपीत सांभाळत हरिबाबूच्याच निष्प्राण कलेवरावर निश्चल पडला होता.

(या कटातली एक आरोपी नलिनी २०१९मध्ये पॅरोलवर सुटली तेव्हाचे छायाचित्र)

धूर पुरता विरला अणि तिथं एकच गदारोळ उडाला. भेदरलेले कितीतरी पोलीस आणि कार्यकर्ते पळत सुटले. काहींनी तर आपल्या किंवा दुसऱ्याच्या वाहनातून त्या ठिकाणापासूनच पळ काढला. मात्र मोजके कार्यकर्ते आणि अधिकारी पाय रोवून उभे राहिले. मूपनार आणि राममूर्ती यांचे डोळे राजीव गांधींचा शोध घेत होते. स्फोट झाला, त्या क्षणी राममूर्ती व्यासपीठावर होते; तर मूपनार इंदिराजींच्या पुतळ्याकडून चालत सभास्थानाकडे येत होते. स्फोटाच्या ठिकाणी दोघे पोहोचले, तेव्हा त्यांना राजीव गांधींचा छिन्नविच्छिन्न देह पाहावा लागला. त्यांची ओळख पटवणारी सर्वांत सोपी खूण त्यांच्या पायातले 'लोटो'चे शूज ठरले!

हबकलेल्या मूपनार यांनी राजीव गांधींचं पालथं शरीर सावरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या हातात निव्वळ मांस आलं. मूपनार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर घाईघाईनं शाल पांघरली आणि राजीवजींचा अचेतन देह कसाबसा उताणा केला. स्ट्रेचर मागवण्यात आलं. राजीवजींचा अचेतन देह जिथे पडला होता, तिथल्या लाल गालिच्यानंही पेट घेतला होता. ती छोटीशी आग राघवन यांनी पायानं विझवून टाकली. या स्फोटातनं शाबूत राहिलेला पुराव्याचा प्रत्येक धागा-दोरा जपणं ही आपलीच जबाबदारी आहे, याचं भान त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला होतं. तपास सुरू झाल्यावर छोटे छोटे तपशीलही महत्त्वाचे ठरणार होते. उत्तरीय तपासणीसाठी राजीव गांधींचा देह पोलीस व्हॅनमधून चेन्नईच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आला. त्याच वेळी राघवन यांचं लक्ष हरिबाबूच्या कॅमेऱ्याकडं गेलं. तो 'शिनॉन'चा कॅमेरा उचलून व्यवस्थित ठेवण्याची सूचना त्यांनी हवालदाराला दिली. सगळे मृतदेह हलवेपर्यंत राघवन जागचे हलले नाहीत. त्यानंतरही बराच काळ केवळ पुरावे नाहीसे होऊ नयेत, यासाठी ते तिथंच थांबले.

शवचिकित्सेनंतर राजीव गांधींचा मृतदेह चेन्नई विमानतळावर नेण्यात आला. त्यांच्या पत्नी सोनिया आणि मुलगी प्रियांका या दोघी दिल्लीहून खास विमानानं नुकत्याच तिथं पोहोचल्या होत्या. जे काही ताब्यात मिळालं, त्यालाच 'राजीव गांधी' मानून त्या २२ मेच्या पहाटे नवी दिल्लीला परतल्या.

तामिळनाडूत तेव्हा राष्ट्रपति-राजवट होती. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा ठपका ठेवत राज्यातलं करुणानिधी यांचं सरकार चंद्रशेखर सरकारनं बडतर्फ केलं होतं. स्फोट झाल्यानंतर लगेचच राज्यपाल भीष्म नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य प्रशासनानं, ‘या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सी.बी.आय.) करावा,' अशी विनंती केली.

 

पुस्तक : सत्यमेव जयते शोध राजीव - हत्येचा

किंमत - ३०० रुपये
सवलत किंमत - २७० रुपये
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क
पंकज क्षेमकल्याणी - ९४२२२५२२०८
(माफक दरात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात तसेच परदेशात पुस्तकं पाठवण्याची व्यवस्था.)

सबस्क्राईब करा

* indicates required