computer

विमान प्रवासादरम्यान एखाद्याचा मृत्यू झाला तर काय करतात ? काय आहेत नियम ??

एखाद्या प्रवाशाला विमान प्रवासात अचानक मृत्यू येणे ही घटना अत्यंत अभावानेच घडते, पण घडते हे निश्चितच! अशा प्रसंगी विमानाचे कर्मचारी परिस्थिती कशी हाताळतात हे कुतुहूल सगळ्यांनाच असते. मृत्यू काही वेळा सूचना देऊन येतो, तर काही वेळा अत्यंत अचानक! अशा सर्व घटनांना वैद्यकीय आणीबाणी-मेडिकल इमर्जन्सी-असे संबोधले जाते .

' थ्री इडीयट' या चित्रपटाचा पहिला प्रसंग तुम्हाला आठवत असेलच, नाही का? त्यामध्ये थोडा अतिरेक आहे. पण केबीन क्रूचे कौशल्य हे अशावेळेस फार महत्वाचे असते.

बर्‍याच वेळा एखादा उतारु अचानक अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार करतो.  लांब प्रवासाच्या ताणामुळे किंवा विमानप्रवासाच्या मानसिक भीतीमुळे अशी तक्रार उतारु करतात. विमानातील केबिन क्रूला अशा तक्रारी हाताळण्याची सवय असते. थोडा मानसिक धीर देला की परिस्थिती पूर्ववत होते. पण लाखात एखाद्या वेळेस ही तक्रार वैद्यकीय आणीबाणीची पण असू शकते. अशा वेळी काय करावे यासाठी प्रत्येक विमान कंपनीचे वेगवेगळे नियम असतात. पण विमानातच कोणी डॉक्टर किंवा पॅरामेडिक म्हणजे नर्स वगैरे आहे काय अशी घोषणा केली जाते. अशी मदत बर्‍याचवेळा उतारुचा जीव वाचवू शकते.

पण नेमका फ्लाइटमध्ये डॉक्टर नसेल तर? अनेक परदेशी कंपन्या मेड एअर नावाच्या कंपनीची मदत घेतात. ही कंपनी दिवसरात्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस देते. वैमानिक त्यांना संपर्क करून मदत घेऊ शकतो. अचानक आजारी पडण्याचे प्रमाण साधारण एक लाख उतारूंमध्ये सोळा प्रवासी असे आढळून आले आहे. दुसरे निरिक्षण ६०० उड्डाणामागे एखादा उतारु असे आहे.

पण काही वेळा अशी काहीही आगाऊ सूचना न मिळता  असे लक्षात येते की उतारुचा मृत्यू झाला आहे. अशी शक्यता फारच कमी असते.  दोन वर्षांच्या काळात फक्त ०.३%  असे घडल्याचा उपलब्ध डेटा सांगतो. अशा वेळी वैमानिकाने काय करावे याचे नियम (प्रोटोकॉल) कंपनीप्रमाणे बदलतात. पण कोणतेही लिखित स्वरुपाचे मॉडेल (मॅन्युअल) बऱ्याच एअरलाइन्सकडे नसते. केबीन क्रू अशा वेळी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळतात. कोणतीही घोषणा केली जात नाही. अकस्मात झालेल्या मृत्यूच्या घटनेचा इतर प्रवाशांवर मानसिक आघात होऊ नये अशी काळजी घेतली जाते.

लिखित नियम नसले तरी सर्वसाधारणपणे अशाप्रकारे परिस्थिती हाताळली जाते-

१.  विमानात जागा रिकाम्या असतील तर मागच्या बाजूस असलेल्या सीट्स मोकळ्या करून त्यावर शव ब्लँकेटखाली झाकून ठेवण्यात येते.

२. जागा उपलब्ध नसेल तर सीटवरच बेल्ट बांधून, ब्लँकेटचे आच्छादन करून शव तसेच ठेवण्यात येते.

३. काही विमान कंपन्या विमानाच्या पाठच्या भागात असलेल्या मोकळ्या जागेत खाली ब्लँकेट अंथरून त्यावर शव ठेवतात.

४. मृत्यू झाला असल्याचे निश्चित असल्याने शक्यतो इमर्जन्सी लँडींग केले जात नाही.

५. पंधरा वर्षांपूर्वी मोठ्या हवाई प्रवासात अशी घटना घडू शकते हे गृहित धरून सिंगापूर एअर लाइन्सने एका उभ्या कपाटासारख्या जागेची व्यवस्था शव ठेवण्यासाठी केली होती. त्याला 'डेड बॉडी लॉकर' असे नाव मिळाले होते.

(पण ही केवळ सांगोवांगी कथा आहे असे बर्‍याच तज्ञांचे मत आहे.)

६. लांब प्रवासाच्या म्हणजे पंधरा सोळा तासांच्या उड्डाणात जर ही घटना प्रवासाच्या अगदी सुरुवातीस घडली तर मृत व्यक्तीचे शव कुजण्याची शक्यता लक्षात घेऊन जवळच्या किंवा मूळच्या विमानतळावर विमान उतरू शकते.

७. बऱ्याच विमानात बॉडी बॅग उपलब्ध असते, काहीवेळा त्याचा वापर केला जातो.

८. याखेरीज शव विमानतळाच्या ताब्यात दिल्यावर केबिन क्रूला चौकशीला सामोरे जावे लागते. त्या परिस्थितीत त्यांनी शक्य असलेले सगळे प्रयत्न केले अथवा नाही याची चौकशी केली जाते९. बऱ्याच वेळा विमान आणि केबिन क्रू यांना क्वारंटाइनमध्ये म्हणजेच वेगळे  ठेवले जाते. साथीचे रोग पसरले असतील तेव्हा असे करण्यात येते.

अर्थात हे सगळे प्रोटोकॉल्स कंपनीप्रमाणे बदलतात.

आता  एका अत्यंत दुर्मिळ प्रसंगाचा विचार करू या - जर वैमानिकच प्रवासादरम्यान अचानक मरण पावला तर??

नियमाप्रमाणे को पायलट - बर्‍याच वेळा दोन को पायलट असतात- विमानाचा ताबा घेऊन जवळच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करतात. अशा वेळी विमानात घबराट पसरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून काँटीनेंटल कंपनीच्या क्रू मेंबरने जे केले ते वाचनीय आहे.

२००९ साली बेल्जीयम ते न्यूजर्सी असा प्रवास असलेल्या  पायलटला अचानक  हार्टअटॅक आला. आधी विमानात डॉक्टर आहे का अशी विचारणा करण्यात आली. एक डॉक्टर विमानात उपलब्ध होते. त्यांनी जाऊन तपासेपर्यंत वैमानिकाचा मृत्यू झाला होता. डॉक्टर शांतपणे आपल्या जागेवर बसले. क्रू मेंबर्सनी काहीच घडले नाही असे भासवत प्रवाशांना स्नॅक्स वाटप केले. या दरम्यान को पायलटने संपर्क साधून जवळच्या ब्रुसेल्स विमानतळावर विमान सुरक्षीत उतरवले. त्यानंतर प्रवाशांना ती घटना कळली. कर्मचार्‍यांचे मनोधैर्य अशा वेळी कामाला येते.

याखेरीज विमानातून मृतदेह पण पाठवले जातात. अशा वेळी त्याचा उल्लेख जीम विल्सन असा केला जातो. बर्‍याच वेळा अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा उल्लेख पण असा केला जातो. मृत व्यक्तीला जीम विल्सन म्हणण्याचे कारण असे आहे की शव वाहतुकीसाठी वापरली जाणारी पेटी बनवणार्‍या कंपनीचे नाव जीम विल्सन आहे.

शेवटी माणसाच्या आयुष्यात मरण कुठे लिहिले आहे हे कोणलाच सांगता येणार नाही. पण अशावेळी प्रसंगावधान राखणे हेच आपल्या हातात असते.

सबस्क्राईब करा

* indicates required