computer

झोपेतून उठल्यावर आपण आळस आणि जांभई का देतो? या ५ गोष्टी समजून घ्या !!

रात्रभर गाढ झोपल्यानंतर सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो? तर उठून आपण हात पाय ताणून आळस आणि जांभई देतो. गेली कित्येक वर्षे या कृतीची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, हे सहज होतं की न कळत होतं हेच कळत नाही, पण सकाळी सकाळी असे हातपाय ताणून आळस देणे आणि जांभई देणे, फायद्याचे आहे का? सकाळी उठल्यावर हातापायांना ताण द्यावासा का वाटतो? जांभई का येते या सारख्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर हा लेख नक्की वाचा.

१) स्नायूंना पुन्हा कार्यप्रवण करण्यासाठी

झोपेत आपल्या शरीराचे सर्व स्नायू शिथिल झालेले असतात. आपल्या शरीरातील द्रवरूप पदार्थ एकाच ठिकाणी जमा झालेला असतो. त्याचे वहन थांबलेले असते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे हा द्रव पाठीच्या मध्यभागी एकत्र आलेला असतो. झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण हातपायाला ताण देतो तेव्हा हा द्रव पदार्थ पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येतो. स्नायूंना ताण दिल्याने स्नायू देखील आपल्या मूळ कामासाठी तयार होतात. त्यांचे काम पुन्हा सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी सकाळी उठून कामाला लागण्यापूर्वी ताण देणे आवश्यक असते.

२) यामुळे तणाव कमी होतो

जेव्हा आपण जांभई देतो आणि त्याचवेळी हातापायाच्या स्नायुंना ताण देतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो. रक्तप्रवाह सुरळीत झाला की आपल्या मेंदूवरील आणि शरीरावरील ताण कमी होतो. आपली मज्जासंस्था पूर्ववत कार्यरत होते. त्यामुळे आपले हृदय, पचनक्रिया आणि पचनग्रंथींचे काम देखील पुन्हा पूर्वपदावर येते.

३) शरीराचा ताठरपणा कमी होतो

बराच वेळ झोपून राहिल्याने स्नायूंची लवचिकता हरवलेली असते. स्नायू ताठर झालेले असतात. त्यांना पुन्हा गतिमान करण्यासाठी ताण देणे आवश्यक असते. कधीकधी खूप वेळ आपण एकाच जागी किंवा एकाच अवस्थेत बसून राहतो तेव्हाही स्नायू असेच ताठर किंवा कडक होतात. त्यांना लवचिक करण्यासाठी ताण द्यावा लागतो. म्हणूनच सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण आळस देऊन या स्नायूंचा ताठरपणा कमी करत असतो.

४) मेंदूकडून येणाऱ्या संदेशाचे ग्रहण

आपला मेंदू जेव्हा आपल्या स्नायुंना काही आदेश देतो तेव्हा ते त्या त्या पद्धतीचे काम करतात. रात्रभर शरीराचे स्नायू आणि मेंदूही आराम करत असतात. त्यांच्यातील संदेशवहन पूर्ववत होण्यासाठी मेंदूकडून स्नायूंना अशा प्रकारे संदेश दिला जातो. आपण उठल्यानंतरही जो आळस देतो त्यामध्ये मेंदूकडून स्नायुंना हाच संदेश दिलेला असतो की आता आपल्याला पुन्हा आपली कामे करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे.

५) जांभई आपल्याला सतर्क ठेवते.

आपल्याला जांभई केंव्हा येते? जेव्हा आपल्या मेंदूला थकवा आलेला असतो आणि सतत कार्यरत राहिल्याने मेंदूचे तापमान वाढलेले असते. अशावेळी बाहेरची ताजी हवा मेंदूकडे पोहोचवली जाते आणि मेंदूचे तापमान पूर्ववत करून तीच हवा आपण जांभई वाटे बाहेर सोडतो. जांभईमुळे आपल्या मेंदूला पुन्हा काम करण्याची शक्ती मिळते. म्हणूनच जांभई आपल्याला जागी ठेवते. आपल्याला एकाच प्रकारचे काम करून जेव्हा कंटाळा येतो तेव्हाही आपण जांभई देतो. म्हणजेच मेंदूचे तापमान कमी करून त्याला पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी जांभई देणे गरजेची असते.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर ताठर झालेले स्नायू आणि विश्रांती घेत असलेला मेंदू यांना पुन्हा कामासाठी तयार करण्यापूर्वी आपण शरीराला ताण देतो आणि जांभई देतो. जणू या माध्यमातून आपण शरीराला दिवस सुरु झाला आणि आता दिवसभराच्या कामासाठी आपण तयार झाले पाहिजे हेच सांगत असतो.

कधीही कामाचा कंटाळा येतो तेव्हाच आपण अशा प्रकारे हातपाय ताणून आळस आणि जांभई देतो. असे केल्याने शरीर पुढची कामे करायला सज्ज होते. बघा अशाच प्रकारे तुम्हीही दिवसातून कितीतरी वेळा आळस देता आणि पुढच्या कामात स्वतःला गुंतवून घेता. म्हणजेच आळस दिल्याने आपले शरीर पुढच्या कामासाठी तयार होते. आहे की नाही गंमत!

सबस्क्राईब करा

* indicates required