computer

भारत-बांगलादेश : ही जगातली सगळ्यात किचकट आणि विचित्र सीमारेखा का आहे?

जगातल्या अनेक आंतरराष्ट्रीय सीमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असतात, पण आपल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या सीमारेषेची गोष्ट थोडी वेगळी आहे. सद्याच्या नकाशामध्ये ही सीमा दिसायला खूप किचकट वाटते, पण आजपासून ६ वर्षांपूर्वी ती इतकी किचकट आणि विचित्र होती की तिला बघून तुमचं डोकं चक्रावून जाईल हे नक्की.

ही सीमा दोन्ही देशात असणाऱ्या असंख्य Enclaves मुळे प्रचंड गुंतागुंतीची झाली आहे. या Enclavesना आपण 'परिक्षेत्र' म्हणू शकतो. Enclave म्हणजे एखाद्या देशाची अशी भूमी जी चारी बाजुंनी पूर्णपणे परकीय देशाच्या भूमीने वेढलेली असते. इथले रहिवासी हे सभोवतालच्या परिसरापासून सांस्कृतिक किंवा वांशिकदृष्ट्र्या वेगळे असतात. बांग्लादेशमध्ये असे १०२ भारतीय Enclaves होते, तर भारतात बांगलादेशचे ७१ Enclaves होते! 

परकीय देशात आपल्या देशाचा एखाद-दुसरा भूभाग असणं सामान्य वाटतं. पण इथे तर दोन देशांची तब्बल १७३ परिक्षेत्रे एकमेकांच्या भूमीत होती. इतकंच नाही, तर या Enclaves च्या आत अजून Enclave होती. यांना Counterenclave म्हटलं जातं. उदाहरणार्थ बांगलादेशी भूमीत असणाऱ्या भारतीय Enclave प्रदेशात पुन्हा बांगलादेशी Enclave असणे! इथे बांगलादेशामध्ये असणाऱ्या १०२ भारतीय Enclaves मध्ये २१ बांगलादेशी Counterenclaves होते, तर भारतात असणाऱ्या त्या ७१ बांग्लादेशी Enclaves च्या भूभागावर ३ भारतीय Counterenclaves होते! 

ही गुंतागुंत इथेच संपत नाही. या Counterenclaves च्या आतही आणखीन Conterenclaves होते. म्हणजे कल्पना करून बघा, बांगलादेशी भूमीत एक भारतीय भूभाग आहे. या भारतीय Enclave मध्ये बांगलादेशी Counterenclave आहेत. आणि त्या बांगलादेशी गावात परत छोटासा भूभाग हा भारतीय परिक्षेत्र आहे! 

समजून घेण्यासाठी खाली दिलेला फोटो पाहा. एकमेकांजवळ असणारी ही अनेक Enclaves आणि Counterenclaves किती विचित्र स्थिती दर्शवतात. त्या भारतीय भूभागातून तुम्ही सरळरेषेत चालायला सुरुवात केली तर तुम्हाला आधी बांगलादेश, मग भारत, मग परत बांगलादेश, त्यानंतर पुन्हा भारत, पुन्हा बांगलादेश, पुन्हा भारत, आणि परत बांगलादेश असे देश बदलावे लागतील! आणि तेही फक्त काही शे-किलोमीटर अंतरामध्ये!

२०११ मध्ये दोन्ही देशांनी मिळून केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार जवळपास ५१,००० नागरिक या किचकट अंत:क्षेत्रांमध्ये राहात होते. या Enclaves मधल्या नागरिकांना छोट्यामोठ्या, किंवा एखाद्या आपत्कालीन गोष्टीसाठीही आपल्या देशाच्या भूमीवर जाणं शक्य नव्हतं. कारण त्यासाठी त्यांना आधी परदेशी भूमी पार करावी लागे. पण यासाठी व्हिसा गरजेचा असतो, आणि हा व्हिसा मिळवायलाही त्यांना आपल्या मायभूमीवरतीच जावं लागेल, जे त्यांना अधिकृतरीत्या शक्य नव्हतं. त्यामुळं गेली अनेक दशकं हे नागरिक आरोग्य, शिक्षण, सुरक्षा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहून भयंकर अश्या समस्यांना तोंड देत जीवन जगत होते. 

या परिक्षेत्रांचा इतिहास बघण्यासाठी आपल्याला १८व्या शतकात जावं लागेल. असं सांगितलं जातं की कूच बिहार आणि रंगपूर या दोन्ही राज्यांचे राजे आपापसात पत्ते किंवा बुद्धिबळ सदृश्य खेळ खेळताना आपल्या राज्यातील छोटी गावं डावावर लावायचे. त्यामुळे त्यांच्या राज्यांमध्ये अशी अनेक लहान लहान Enclave अस्तित्वात होती. ऐतिहासिक पुराव्यांतुन माहिती मिळते की १७११-१३मध्ये कूच बिहार आणि मुघल साम्राज्यामध्ये युद्धांनंतर एक युद्ध-शांती करार झाला. पण त्यात यांनी दोन्ही राज्यांची सीमा निश्चित केली नाही. त्यामुळं कोणता भूभाग कोणाच्या मालकीचा हा गोंधळ निर्माण झाला. २ शतकांहून अधिक काळ या परिक्षेत्रांच्या अस्तित्वामुळं कोणालाही कसलाही फरक पडला नाही. पण १९४७ ला भारताची फाळणी झाली आणि रंगपूर राज्य पूर्व पाकिस्तानात (आताच बांगलादेश), तर १९४९ मध्ये कूच बिहार भारतात विलीन झालं. ब्रिटिशांनी या परिक्षेत्रांचे मुद्दे न मिटवताच दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा निश्चित केली. ४००० कि.मी.च्या या सीमेमुळं हजारो रहिवाशांना शेजारील राष्ट्राच्या भूमीत पुरतं अडकवून सोडलं. त्यानंतर अनेक वर्षे दोन्ही देश ही परिक्षेत्रं आणि तिथल्या रहिवास्यांकडे दुर्लक्ष करत आले, जे त्यांच्याच देशाचे नागरिक होते, आणि त्यांचं अस्तिव असूनही नसल्यात जमा होतं.

१९७१ मध्ये बांगलादेश निर्मिती झाली. आणि परत एकदा दोन्ही देशातील सीमेचा विषय चर्चेत आला. १९७४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे पंतप्रधान शेख मुजिबूर रहमान यांच्यात 'भूमी-सीमा सामंज्यस करार' झाला. ज्यात दोन्ही देशांनी या परिक्षेत्रांची अदलाबदल करण्याचं आणि आपापसात असणारे सीमाविषयक वाद मिटवण्याचं ठरलं. पण अंतर्गत राजकारण आणि अस्थिर द्विपक्षीय संबंधामुळे हा मुद्दा परत लांबणीवर पडत गेला. जर भारताने आपली १०२ परिक्षेत्रं बांगलादेशाला दिली, तर भारताची ४० वर्ग कि.मी जमीन बांगलादेशाच्या ताब्यात जाणार होती आणि साहजिकच असंख्य भारतीयांना ही बाब मान्य नव्हती.

(घराच्या मधून गेलेली सीमारेषा)

अनेक दशकं हा विषय ताटकळत ठेवल्यानंतर २०११ मध्ये दोन्ही राष्ट्रांनी १९७४ चा करार अंमलात आणण्यासाठी भूमी सीमा मसुद्यावर सही केली. पण परत एकदा अंतर्गत राजकारणामुळे हा विषय लांबणीवर पडला. अखेर ३१ जुलै २०१५ म्हणजे तब्बल ४१ वर्षांनी हा गुंता सुटला आणि दोन्ही राष्ट्रांनी आपापसात या १६२ परिक्षेत्रांची अदलाबदल केली. यानुसार  भारताला ५१ बांगलादेशी Enclaves ची ७,११० एकर, तर बांगलादेशला १११ भारतीय Enclaves ची १७,१६० एकर जमिनीची मालकी मिळून या सगळ्या Enclaves चं अस्तिव मिटवण्यात आलं. या हस्तांतरणानुसार भारताने ४० वर्ग कि.मी जमिनीचा ताबा गमावला. २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार १११ भारतीय परिक्षेत्रात ३८,५२१ रहिवाशी, तर ५१ बांगलादेशी परिक्षेत्रात १४,८६३ रहिवासी राहात होते. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार दोन्हीपैकी कोणत्याही राष्ट्राचं नागरिकत्व निवडण्याची संधी मिळाली. भारतातील बांगलादेशी Enclaves मधल्या लोकांनी भारतातच राहणं पसंत केलं. तर बांगलादेशातील भारतीय Enclaves मधल्या १००० वगळता सर्व रहिवाशांनी बांगलादेशी नागरिकत्व स्वीकारलं. या १००० लोकांचं भारतात पुनर्वसन करण्यात आलं. २०१६ मध्ये दोन्ही देशांमध्ये पूर्णपणे सीमेची आखणी झाली.

Enclaves चा मुद्दा आता सुटलाय, पण आजही काही ठिकाणी ही सिमा अत्यंत किचकट आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न कधी सुटेल माहित नाही, पण भारत-बांग्लादेश सीमाप्रश्न सुटला हे ही काही कमी नाही!!

 

आणखी वाचा:

भारत आणि त्याच्या ८ आंतरराष्ट्रीय सीमा  : अभिमान तर वाटणारच...

सबस्क्राईब करा

* indicates required