स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत..
स्त्रियांना प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागलं आहे. इतिहासात याची उदाहरणं अनेक आहेत. भारतात तर हे सगळं उशिरा आलंच, पण इतक्या पुढारलेल्या देशांत पण स्त्रियांना इतकी वर्षं झगडावं लागलं, ही खरंच वाईट गोष्ट आहे. मतदानासारखा हक्कही स्त्रियांना पहिल्यांदा १९२०मध्ये मिळाला. पण ही फक्त सुरूवात होती. अजून त्यांना बरेच हक्क मिळायला हवे होते. चला तर मग पाहूयात, गेल्या काही वर्षांत स्त्रियांना कोणकोणते हक्क मिळाले ते..
१. बँकेत खातं उघडणं
खूप साधी सोपी गोष्ट वाटतेय ना ही? पण अमेरिकेत १९७४पर्यंत नवरा किंवा एखाद्या पुरूष नातेवाईकाच्या परवानगीशिवाय स्त्रियांना बँकेत साधं खातंही उघडता येत नसे. मात्र फ्रान्समध्ये १८८१पासून स्त्रिया स्वत:च्या नावे बँकेत खातं उघडू शकत.
२. ज्यूरी ड्यूटी करणं
पूर्वी भारतातही नागरिकांना ज्यूरी ड्यूटी करण्यासाठी बोलावलं जात असे. पण रूस्तम नानावटी खटल्यात या ज्यूरींना वर्तमानपत्रांनी इतकं प्रभावित केलं, की ब्रिटिश सरकारने भारतात ती पद्धतच बंद करून टाकली. हो, अक्षय कुमारचा ’रूस्तम’ सिनेमा याच खटल्यावर आधारित होता. तर, अजूनही काही देशांत ही ज्यूरी पद्धत आहे आणि त्यांच्या नागरिकांना ही ड्यूटी करावी लागते. पण १९६८ मध्ये मिसिसिपी राज्यानं या मान्यता देईपर्यंत कोणत्याही स्त्रिला ज्यूरी म्हणून बोलावण्यात आलं नव्हतं.
३. गर्भनिरोधक गोळ्या घेणं
मुलं ही देवाघरची फुलं मानली जातात. आपल्याकडं भारतात पुरूषांनी गर्भनिरोधकं वापरायला इतका उशीर झाला, की बायकांबद्दल तर बोलायलाच नको. र. धों कर्व्यांनी याबाबतीत पुष्कळ कार्य करून ठेवलं आहे. पण आपली सध्याची लोकसंख्या पाहाता ते कमीच पडलं असं वाटतं.
असो, अमेरिकेत स्त्रियांना गर्भनिरोधक वापरण्यास १९६० मध्ये परवानगी मिळाली. पण तरीही तिथल्याच काही राज्यांत त्यावर बंदीदेखील होती.
४. बाळंतपणाच्या रजेवर जाणं
गरोदर राहिल्यामुळं हातातली नोकरी गेल्याची उदाहरणं फक्त भारतातच नाही, तर परदेशातसुद्धा आहेत. १९७८मध्ये याच्याविरोधात अमेरिकेत पहिल्यांदा कायदा आला. युकेमध्ये २०१०मध्ये आलेल्या समानतेच्या हक्काद्वारे एखाद्या स्त्रिला तिच्या गरोदरपणामुळं काही हक्कांपासून वंचित केलं जाणं हा गुन्हा ठरवण्यात आला.
भारतात मात्र १९६१च्या मॅटर्निटी बेनिफिट ऍक्टद्वारे बाळंतपण किंवा गर्भपातानंतर लगेच सहा आठवड्यांपर्यंत काम न करण्याची सूट देण्यात आली होती. काही वर्षांपासून भारतात ही सुटी सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. यासोबत बाळाच्या बाबांनाही १५ दिवसांची पॅटर्निटी लीव्हसुद्धा मिळतेच.
५. मिलिटरी अकॅडमीमध्ये शिक्षण घेणं
स्त्रियांनी युद्धात कामं केली नाहीत असं नाही. कॅ. लक्ष्मी आझाद हिंद सेनेत होत्या. AIMA मधून पदवी घेतलेल्या अनेक स्त्री डॉक्टरांनी सैनिकांची आणि अधिकार्यांची काळजी घेतली आहे. परंतु, स्त्रियांसाठी मिलिटरी अकॅडमीमध्ये शिक्षण घेणं हे खूप उशिरापर्यंत शक्य नव्हतं. आंतरजालावरच्या माहितीनुसार, भारतात चेन्नईला एकच सरकारी मिलिटरी अकॅडमी आहे, जिथं स्त्रियांनाही हे शिक्षण दिलं जातं. २५ स्त्रियांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण १९९२ मध्ये चालू झालं.
भारताबाहेर पाहायचं तर, अमेरिकेत १९७६ ला स्त्रियांना अकॅडमीमध्ये प्रवेश मिळायला सुरूवात झाली. तर युकेमध्ये मात्र याआधीपासून स्त्रियांसाठी रॉयल आर्मी कॉलेजेस होती असं दिसतं.
६. युद्धावर जाणं
डेन्मार्क, नॉर्वे आणि इस्त्रायलमध्ये १९८८मध्ये स्त्रियांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जायची संधी मिळाली. त्यापूर्वी नॉर्वेने १९८५मध्ये स्त्रियांना पाणबुड्यांमध्ये जाण्यासाठीही परवानगी दिली होती. भारतात वैद्यकीय कामगिरी सोडून इतर ठिकाणी जाण्यासाठी १९९२पासून स्त्रियांची निवड व्हायला सुरूवात झाली, पण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांतल्या सर्व पदांवर स्त्रिया काम करू शकतात, हा निर्णय आत्ता २०१६मध्ये घेण्यात आलाय.
अमेरिकेत १९७९ मध्ये युद्धभूमीवर जाण्यासाठी स्त्री-पुरूषांची पात्रता जाहिर करण्यात आली, पण प्रत्यक्षात कुणा स्त्रीला त्यासाठी निवडण्यातच आलं नाही. १९९४मध्ये तर स्त्रियांना युद्धभूमीवरच्या नोकर्या देण्यांवर बंदी आणण्यात आली. पण आता २०१३ पासून अमेरिकन मिलिटरीमध्ये स्त्रियांना स्थान मिळू लागलं आहे. युकेही काही कमी नाही. २०१६च्या जुलैमध्ये युकेच्या ग्राऊंड क्लोज कॉम्बॅटमध्ये सामील होण्यासंबंधीचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत.
७. अंतराळवीर ट्रेनिंग प्रोग्राम
जगातली पहिली माहिला अंतराळवीर आहे रशियाची व्हॅलेंटिना तेरेश्कोवा. तिनं १९६३मध्ये पहिली अंतराळवारी केली. परंतू नासाने स्त्रियांना त्यांच्या अंतराळ प्रशिक्षण कार्यकमात सहभागी करून घेण्यास खूप वर्षं घेतली. नासामध्ये स्त्रियांच्या पहिल्या तुकडीने जानेवारी १९७८ मध्ये प्रवेश घेतला.
ही यादी परिपूर्ण आहे असं आम्हांला म्हणायचं नाहीच. अगदी अलिकडच्या काळापर्यंत स्त्रियांवर आणखी कशासाठी निर्बंध घातले गेले होते असं काही तुम्हांला माहित असल्यास आम्हांला नक्की कळवा.