भारताची प्रतिज्ञा कुणी आणि पहिल्यांदा कुठल्या भाषेत लिहिली गेली हे माहित आहे?

आठवते, शाळेत रोज स‌काळ‌ची ती प्रार्थना, एका हाताचं अंत‌र ठेवून उभं राहाणं आणि रोज म्ह‌ट‌ली जाणारी प्रतिज्ञा?  आपल्यापैकी प्रत्येकानं शाळेत नक्की ओरडा खाल्ला असणार आहे. सकाळी प्रार्थनेच्या वेळेस प्रतिज्ञा म्हणताना वाघ मागे लागल्यासारखी प्रतिज्ञा म्हणायची, त्यातले शब्द खायचे आणि शेवटची दोन वाक्यं तोडांतल्या तोंडात पुटपुटायची हे आपल्यापैकी प्रत्येकानं जवळजवळ केलंच आहे. मग ती प्रतिज्ञा मराठी असो, हिंदी नाहीतर इंग्रजी.. आपण भेदभाव नाही केला, खरं ना?

पण भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.. अशा सुटसुटीत वाक्यांनी आणि सोप्या शब्दांनी सुरू झालेली प्रतिज्ञा... परंपरा, पाईक होण्याची पात्रता, सौजन्य आणि सौख्य अशा थोड्या जड आणि समर्पक शब्दांपर्यंत येऊन ठेपते. कधी विचार केलाय ही प्रतिज्ञा कुणी लिहिली असेल म्हणून?

आपल्याला हा प्रश्न कधी कुणी विचारला नाही आणि कधी कुठल्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात पण सहसा विचारला जात नाही. आता ती कुणी लिहिली हेच माहित नसेल तर कधी आणि कुठल्या भाषेत लिहिली, हे प्रश्न तर दूरच राहिले. तर मंडळी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी म्हणजेच १९६२ मध्ये आपली प्रतिज्ञा लिहिली गेली.

स्रोत

आपल्या भारताची प्रतिज्ञा लिहिलीय पिदिमरी वेंकट सुब्बाराव (Pydimarri Venkata Subba Rao) यांनी. तेव्हाच्या आंध्र प्रदेशातल्या आणि आताच्या तेलंगणात येणार्‍या अन्नपार्थी खेड्यात राहणारे हे गृहस्थ. हे चांगलेच बहुभाषिक होते. सुब्बाराव संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिकमध्ये चांगलेच पारंगत होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिली. त्यात एक पुस्तक निसर्गोपचारावरही होतं. त्यांची तेलुगूमधली पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. ’कलभैरवुडू’ हे त्यातलंच एक तेलुगू पुस्तक.

 पिदिमरी वेंकट सुब्बाराव यांनी १९६२मध्ये ही प्रतिज्ञा तेलुगूमध्ये लिहिली. तेव्हा ते विशाखापट्टणम जिल्ह्याचे ’जिल्हा ट्रेझरी ऑफिसर’ म्हणून कामकाज पाहात होते.  एका वर्षाने म्हणजेच १९६३मध्ये  विशाखापट्टणमच्या एका शाळेत प्रथमत: ही प्रतिज्ञा म्हटली गेली. सुब्बाराव हे तेव्हाच्या आंध्रप्रदेशातले नेते तेन्नेटी विश्वनाथम यांचे निकटवर्ती होते. तेन्नेटी विश्वनाथम यांनी ही प्रतिज्ञा तत्कालिन शिक्षणमंत्री विजियानगरमचे राजासाहेब – पी.व्ही.जी. राजू यांना पाठवली आणि या दोघांच्या संयुक्त प्रयत्नाने ही प्रतिज्ञेला घटनेमध्ये स्थान मिळवून दिले. भारत सरकारने १९६४मध्ये बंगळुरूमध्ये एक सभा घेऊन ही प्रतिज्ञा २६ जानेवारी १९६५पासून देशस्तरावर सर्व शाळांमध्ये म्हटली जावी असा ठराव केला. त्याच वर्षी ही राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणून प्रजासत्ताक दिनाला म्हटली गेली. मग तिचं इतर सात भारतीय भाषांत भाषांतर झालं  आणि ती सर्व शाळांत पाठवली गेली.

स्रोत

असं म्हटलं जातं की खुद्द सुब्बाराव यांना आपण लिहिलेल्या प्रतिज्ञेला इतका मोठा मान मिळाल्याचं माहित नव्हतं. एकदा त्यांची नात एकदा पुस्तकातली प्रतिज्ञा वाचत असताना त्यांना ही आपण लिहिलेली प्रतिज्ञाच आहे हे लक्षात आलं. आहे की नाही गंमत? मात्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक म्हणून त्यांचं नाव सरकारदरबारी नोंदलेलं आहे.

२०१२ साली आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं गेलं.

बघितलंत, आपल्या प्रतिज्ञेच्या मागे केवढा इतिहास आहे ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required