एका सेल्फीने सोडवली मर्डरची केस...पहा या सेल्फीमध्ये असं आहे तरी काय ?
काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला एका केसबद्दल सांगितलं होतं, ज्यात चक्क मटन सूपमुळे खुनी पकडला गेला होता. याच प्रकारची एक केस काही वर्षांपूर्वी कॅनडामध्ये सोडवण्यात आली आहे. पण इथे केस सोडवण्यासाठी मटन सूपच्या जागी एका सेल्फीची मदत झाली. ही केस २ वर्षांपासून रखडली होती, पण खुनी कितीही शातिर असला तरी तो एक तरी चूक करतोच.
चला तर बघूयात या सेल्फीमध्ये असं काय आहे की मर्डरर पोलिसांच्या तावडीत सापडला ?
गोष्ट आहे २५ मार्च, २०१५ ची. या दिवशी ब्रिटनी गॅरगॉल हिचा खून झाला. तिला कोणीतरी मारून रस्त्याच्या कडेला फेकलं होतं. तिच्या मृतदेहावरून तिला गळा आवळून मारल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिचा गळा ज्या गोष्टीने आवळला तो बेल्टदेखील पोलिसांच्या हाती लागला. पण हा बेल्ट कोणाचा आहे याचा पत्ता लागला नाही.
२ वर्ष तपासात गेल्यानंतर पोलिसांची नजर एका सेल्फिवर पडली. हा सेल्फी ब्रिटनीच्या एका मैत्रिणीने फेसबुकवर पोस्ट केला होता. या सेल्फीमध्ये ब्रिटनी आणि तिची मैत्रीण अॅन्टॉइने दिसत आहेत. पोलिसांनी त्या फोटो मधल्या बारीकसारीक गोष्टींवर नजर टाकल्यानंतर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. या सेल्फीत अॅन्टॉइने हिने तोच बेल्ट घातला आहे, ज्या बेल्टने ब्रिटनीचा गळा आवळा गेला होता. हा फोटो ब्रिटनीच्या मर्डरच्या काही तासांपूर्वी घेतला गेल्याचं पोलिसांना समजलं.
(फोटो मध्ये डाव्या बाजूला अॅन्टॉइने आहे आणि उजव्या बाजूला ब्रिटनी. अॅन्टॉइनेच्या कमरेला असलेला बेल्ट तुम्ही पाहू शकता.) (स्रोत)
यानंतर अॅन्टॉइनेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तिने तपासणी दरम्यान सगळं कबूल केलं. याशिवाय आणखी एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला तो म्हणजे या दोघींची एक मैत्रीण. या मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं की अॅन्टॉइने तिला खून केल्यानंतर भेटली होती आणि तिने ब्रिटनीचा खून केल्याचं कबूल केलं होतं.
मंडळी, हा खून घडला तो दारू आणि गांजाच्या नशेमध्ये. आधी दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याचा शेवट ब्रिटनीच्या मृत्यूत झाला. पकडल्या गेल्यानंतर अॅन्टॉइने म्हणाली की ती स्वतःला ब्रिटनीच्या खुना बद्दल कधीही माफ करणार नाही.
शेवटी काय तर गुन्हा करून कोणीही लपू शकत नाही. तुमचा सेल्फीसुद्धा तुमचा घात करू शकतो !!
आणखी वाचा :
वाचा मटण सूपमुळे कशी एका खुनाला वाचा फुटली.. कहानी पूरी फिल्मी है !!