सन १८३९ ....आणि पहिल्या सेल्फीचा जन्म झाला!!
आता सेल्फीचं अजीर्ण व्हावं इतक्या सेल्फ्या रोज घेतल्या जातात. पावसाळ्यात तर दर आठवड्याला कुणी धबधब्याखाली, कुणी समुद्राजवळ, कुणी नदीत तर कुणी दरीजवळ सेल्फी घ्यायला जातं आणि आपला लाखमोलाचा जीव गमावतं. आता तर काय, २१ जूनला सेल्फी डे पण साजरा झाला. मग आम्हाला प्रश्न पडला, जगातला पहिला सेल्फी कुणी बरं घेतला असेल आणि हे वेड नक्की कधीपासून चालू झालंय ??
म्हणजे आता बघा, जगातला पहिला कॅमेरा फोटो घेतला गेला १८२६-२७ साली. म्हणजेच साधारण नव्वद वर्षं झालीच की. मग पहिला सेल्फी कधी घेतला गेला? तर १८३९मध्ये. आता त्याला सेल्फी म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे. कारण तेव्हाचा कॅमेरा एवढा फास्ट होता, की रॉबर्ट कॉर्नेलिअस या माणसानं कॅमेऱ्याची फोटो घेण्याची लेन्स काढली, पळत पळत फोटो काढायच्या जागेवर जाऊन उभा राहिला आणि तसाच पुन्हा पळत पळत येऊन त्यानं कॅमेऱ्याची लेन्स बंसद केली. आताच्या सारखा क्लिकक्लिक कुठली आलीय तेव्हा??
हा पाहा जगातला पहिला सेल्फी-
( स्रोत )
मग आले कोडॅकचे कॅमेरे. अर्थात ते यायला पण १९००साल उजाडावं लागलं होतं. तेव्हा आरशात बघून स्वत:चा फोटू काढून घेण्याची फॅशन आली. १९१३मध्ये रशियातल्या ग्रँड डचेस अनस्टासिया निकोलाव्ना ( Grand Duchess Anastasia Nikolaevna of Russia )ने तिच्या मैत्रिणीला पाठवायला असा आरशात पाहून फोटो काढ्ला होता म्हणे.
हा पाहा एका बाईने साधारण १९०० साली घेतलेला कॅमेरा सेल्फी-
(स्रोत)
१९७०च्या आसपास मात्र इन्स्टंट कॅमेऱ्यांचं पीक आलं आणि ते आम जनतेला जरा परवडण्याच्या रेंजमध्येही आले. मग काय, लोकांनी सेल्फ्या काढयाला सुरुवात केली. आणि नंतर डिजिटल कॅमेरे आणि फोन कॅमेऱ्यानं तर सेल्फी प्रेमाला उधाणच आलंय.
सेल्फी शब्दाचा उगम काय??
असं म्हणतात की ऑस्ट्रेलियातल्या एका इंटरनेट फोरमवर नेथन होप या माणसानं १३ सप्टेंबर २००२ या दिवशी सेल्फी या शब्दाचा पहिल्यांदा लिखित स्वरुपात उल्लेख करण्यात आला. पण हा होपबाबा म्हणतो की या शब्दाचं श्रेय त्याचं नाही, तेव्हा बोलीभाषेत वापरला जाणारा शब्द मी लिखित स्वरुपात वापरला, इतकंच. या होपची गोष्ट अशी होती की एकविसाव्या वाढदिवसादिवशी हे महाराज पिऊन टाईट झाले आणि पायऱ्यांवरुन पडले. दात खालच्या ओठांत चांगला एक सेंटिमीटर रुतला आणि त्या जखमी ओठांचा त्यानं फोटो काढला. "फोकसबद्दल सॉरी, तो सेल्फी आहे" असं त्यानं म्हटलं होतं.
हा पाहा नेथन होपचा सेल्फी या शब्दाचा पहिल्यांदा लिखित वापर करणारा फोटो-
( स्रोत )
हे सगळं हो, पण डिजिटल कॅमेऱ्यानं नक्की कसा फोटो येतोय किंवा रिअर व्ह्यू कॅमेऱ्यानं सेल्फी घेणं किती अवघड होतं माहितेय? ही अडचण सोडवली २००३साली आलेल्या सोनी एरिक्सनच्या झेड१०१० या फोननं. या फोनमध्ये पहिल्यांदा व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी किंवा फोटो घेण्यासाठी फ्रंट कॅमेरा दिला होता. नंतर आलेल्या सगळ्या फोनमध्ये ही सुविधा आपसूकच आली.
बरं सेल्फी नुसते पृथ्वीवर घेतले गेले नाहीत, तर अंतराळातसुद्धा सेल्फी घेतले गेले आहेत.
( स्रोत )
आणि माणसांनी घेतलेल्या सेल्फीजचं काय घेऊन बसलात? २०११ मध्ये चक्क एका काळ्या माकडाने (मकॅक)ने जंगलात लावलेल्या कॅमेऱ्याचं बटन दाबलं आणि सेल्फी काढला की हो.
( स्रोत )
तर असा आहे हा सेल्फीचा इतिहास. चला तर मग्, पटकन एक सेल्फी काढून फेसबुक, इन्स्टाग्राम नाहीतर व्हाटसॲपवर शेअर करुया..