पावसाळ्यात या ६ रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत!! तुम्हांला यातल्या किती भाज्या माहीत आहेत?
पाऊस सुरु झाला की रानभाजांची चंगळ सुरु होते. या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असतो. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही हेच काय कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच.
या प्रकारच्या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे या ठिकाणी आढळतात. या भागातील आदिवासी मुंबई ठाण्यासारख्या भागात येऊन या भाज्या विकततात. पण मंडळी आपल्यातल्या अनेकांना या भाजांची नावे माहित नसतात. त्यामुळे प्रत्येकालाच या भाज्या घेता येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही रानभाजांची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती देणार आहोत.
१. कुलुची भाजी
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं.
२. कंटोली
कंटोली एक फळभाजी असून ती पावसाळ्यात कमीतकमी १५ दिवसात पूर्ण उगवते. ही भाजी कर्ल्यासारखी दिसते आणि कडू सुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते.
३. कुरडू
हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुरडू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
४. टाकळयाची भाजी
टाकळयाची भाजी दिसायला मेथीच्या भाजी सारखीच दिसते. रानोमाळी टाकळयाची भाजी गवताबरोबर पसरलेली आपण पाहू शकतो. ठाणे मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडी सारखी ही भाजी घेता येते.
५. दिंडा
दिंडा भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.
६. भारंग
ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे.
मंडळी, याशिवायही आणखी रानभाज आहेत जसे की फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, इत्यादी.
या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्प्या आणि खायला रुचकर असतात. वर सांगितल्या प्रमाणे नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने त्या आरोग्यासही चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्या बरोबर येणारा हा रानमेवा चुकवू नका. पुढच्यावेळी बाजारात जाल तेव्हा या भाजांची चौकशी नक्की करा.