हॉलमार्क म्हणजे नक्की काय ? सोन्याचा कस नक्की कसा पाहतात ?
सोनं किती शुध्द आहे हे नक्की करण्यासाठीची पारंपारीक पध्दत म्हणजे त्याचा कस मोजणे. कस मोजायचा एक दगड सोनाराकडे असतो, त्याला "कसोटी"चा पत्थर असं म्हटलं जातं. या दगडावर सोन्याचा नग घासला जातो आणि त्यावर अॅसिडचे काही थेंब टाकले की सोनाराला नग किती कॅरेट सोन्याचा आहे हे कळतं. ही पध्दत पारंपारीक आहे आणि सोनार जितका कसलेला असेल, तितका त्याचा अंदाज बरोबर असतो. थोडक्यात ही कसोटी व्यक्तिसापेक्ष आहे.
काही घरगुती पध्दतीने पण काहीजण हा प्रयोग करतात. उदाहरणार्थ, एखादा नग व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून बघणे. जर भेसळ तांबे किंवा जस्त या धातूची असेल, तर व्हिनेगरमधल्या अॅसिटिक अॅसिडसोबत प्रक्रिया होऊन निळसर हिरव्या रंगाची झाक येते. पण अशा प्रयोगात तयार नग खराब होण्याची शक्यता जास्त असते. हे "डिस्ट्रक्टीव टेस्टींग" या सदरात मोडते . सोन्याचा कस शोधायला परीक्षणासाठी कमीतकमी नमुना वापरणे ही योग्य पध्दत आहे.इ-बेसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशी टेस्टिंग किटस् मिळू शकतात. या सगळ्या पध्दतीचा अवलंब म्हणजे कुतुहूल पूर्ण करणे या पलीकडे काहीही नाही.
हे सर्व उद्योग करण्यापेक्षा मानांकन असलेले दागिने घेणे जास्त श्रेयस्कर आहे. नाही का ? म्हणूनच हे प्रमाणिकरण करण्यासाठी बीआयएस -(The Bureau of Indian Standards) ने "हॉलमार्क"पध्दती अंमलात आणली. बीआयएसची स्थापना संसदेच्या Bureau of Indian Standards Act, 1986 (सुधारीत 2016 ) च्या अन्वये झालेली आहे. त्यामुळे बीआयएसला उत्पादन प्रमाणित करणे आणि प्रमाणिकरणाचा आग्रह करण्याचा अधिकार आहे.
बीआयएसच्या निकषांप्रमाणे "सोने आणि सोन्यापासून बनवलेली उत्पादने " प्रमाणित करणं आता अनिवार्य आहे. हे जरी खरे असले, तरीही सर्वच सोनार किंवा पेढ्या हॉलमार्कचे दागिने बनवत नाहीत. पण हळूहळू सरकारी आग्रह (सक्ति?) आणि ग्राहकांची इच्छा या दोन्हीमुळे हॉलमार्क असलेले दागीने सर्वत्र मिळतील.
आता प्रश्न असा आहे की हे दागिने हॉलमार्क असलेले आहेत अथवा नाहीत हे कसे ओळखायचे ?
हॉलमार्कच्या नगावर पाच चिन्हे असातात
१. बीआयएसचा लोगो
२. कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ:२२़़K वगैरे )
३. अॅसे (परीक्षण) करणार्या संस्थेचे चिन्ह ४ घडणावळीचे वर्ष
५. सोनार किंवा पेढीचा लोगो.
कालच्या भागात आपण बघीतलेच आहे की केडीएम दागिन्यांवर आता बंदी आहे. पण मानांकन लिहिताना अजूनही केडीएम असे शब्द लिहिण्याची परवानगी आहे. फक्त इथे केडीएमचा अर्थ कॅडीमीयम खेरीज इतर धातूंचा वापर डाग देण्यासाठी वापरला आहे असा अर्थ घ्यावा. बीआयएसच्या नव्या २०१७ च्या नियमावलीप्रमाणे आता एकूण तीन वेगवेगळ्या कॅरेटला मानांकन देता येते. १४K, १८K आणि २२K हे ते तीन प्रकार आहेत.
आता आपण एका कठीण प्रश्नाला सामोरे जाऊ या. आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की भारतात खाणीमधून नाममात्र सोनं मिळतं. पण भारतातल्या जनतेची सोन्याची भूक वाढतच जाते आहे. मग हे सोनं येते कुठून ? नवनवीन दागीने येतात तरी कसे ?
बरेचसे दागिने जुनं सोनं मोडून तयार होतात आणि बाकी सर्व सोनं बाहेरच्या देशातून आपल्याकडे येत असतं. असं असेल तर या बाहेरून आलेल्या सोन्याची प्रत कशी ओळखायची ?
आपल्याकडे हॉलमार्कींग फार उशिरा आले, बाहेरच्या जगात म्हणजे युरोपात, आफ्रीकेत, अमेरिकेत हॉलमार्कींग पध्दती फार जुन्या आहेत. सोन्याच्या बिस्कीटावर जे मार्कींग दिसते ते त्या-त्या देशाच्या हॉलमार्कींग पध्दतीचे असते. युरोपमध्ये हॉलमार्कींग इ.१२०० पासून अंमलात आणली गेली आहे. अमेरिकेत १०K च्या सोन्याचेपण हॉलमार्कींग करावे लागते.
ग्राहकाला शुध्द सोने मिळावे म्हणून हॉलमार्कींगचा उपयोग होतो हे खरं आहे. पण सोन्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुध्दा फसवणूक होत असते. त्या गमतीदार कथा नंतरच्या येणार्या भागात आपण वाचूच.. पण आता इतकेच लक्षात ठेवू या की मध्यरात्री पैसे उभे करायचा सोनं हा एकच मार्ग नाही. गरीबाघरची शेळी पण मध्यरात्री मो देऊन जाते. म्हणून जाता जाता एक वाक्प्रचार सांगतो आहोत .
Gold for rich and Goat for poor !!!
आणखी वाचा :
२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?