या ठिकाणी सापडलंय जगातलं सर्वात जुनं 'चीज'...काय आहे या चीजचं रहस्य!!

मंडळी, पुरातन अवशेषांमध्ये कोणती आश्चर्यचकित गोष्ट लपलेली असेल सांगता येत नाही. आता बघा ना, मध कधीही खराब होत हे सिद्ध झालं ते इजिप्तच्या एका पिरॅमिडमध्ये हजारो वर्ष जुना मध सापडल्यानंतर. आजच्या काळातील स्मायलीसुद्धा ४००० वर्ष जुनी आहे हेही सिद्ध झालंय.
नुकताच असाच आणखी एक नवीन शोध लागला आहे. हा शोध आहे जगातल्या सर्वात जुन्या ‘चीज’चा. हे चीज इसवीसनपूर्व १३ व्या शतकातलं आहे. म्हणजे आजपासून जवळजवळ ३२०० वर्ष जुनं राव.
पण हे चीज सापडलं कुठे? चला इतिहासात थोडं मागे जाऊ...
१३ व्या शतकात इजिप्तच्या मेम्फिस शहरात Ptahmes (तमिस/ तहमस) नावाचा एक अधिकारी होता. त्याने लष्करी अधिकारी आणि खजिन्याचा रखवालदार म्हणून काम केलं. राज्यातलं त्याचं महत्व बघता, तो मेला तेव्हा त्याच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात आलं. जुन्या इजिप्शियन परंपरेनुसार त्याच्यासोबत काही वस्तूसुद्धा गाडण्यात आल्या. या वस्तूंमध्ये चीज भरलेला एक घडाही सामील होता.
Ptahmes च्या कबरीला १८८५ साली शोधण्यात आलं होतं. पण वाळूच्या ढिगाखाली ती संपूर्ण जागाच हरवली होती. २०१० साली पुन्हा कबरीचा शोध लागल्यानंतर संशोधकांच्या हाती एक घडा लागला. या घड्याला कापडाने बांधलेलं होतं. घडा उघडल्यानंतर त्यात घट्ट असा पदार्थ आढळला.
या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेतून समजलं की हा पदार्थ ‘दुग्धजन्य पदार्थ’ आहे. सुरुवातीला त्याला दही असं ठरवण्यात आलं. पण नंतर तो चीज असल्याचं समजलं. आजवरच्या इतिहासातलं हे सर्वात जुनं चीज असल्याचं यातून सिद्ध झालं आहे.
मंडळी, या चीजची चव चाखण्याची हिम्मतही कोणी करणार नाही. कारण या चीजमध्ये काही संसर्गजन्य रोग लपलेले आहेत. हा रोग मुळात निर्जंतुकीकरण न केलेल्या दुधापासून पसरतो. अर्थात त्याकाळी निर्जंतुकीकरणा सारखी व्यवस्था नव्हती. त्यामुळे या चीज मध्ये घातक बॅक्टेरिया अजूनही शिल्लक आहेत.
एकंदरीत ३२०० वर्ष जुनं चीज चवीला कसं लागतं हे कधीही समजणार नाही. पण ही बातमी जगभर पसरल्यानंतर अनेकांनी या चीजला टेस्ट करण्याची तयारी दाखवली आहे.
राव, काय म्हणता? तुम्ही ट्राय करणार का ?