रेशनकार्डवर कुत्र्याचं नाव घालून त्याने लाटले तब्बल ६० किलो रेशन...पाहा बरं काय आहे हा प्रकार !!
कालच सुप्रीम कोर्टाने आधार सक्तीवर मोठा निर्णय दिला. अनेक महत्वाच्या ठिकाणी या पुढे आधारसक्ती नसेल. पण आज एक अतरंगी घटना समोर आली आहे. ही घटना उघड झाली ती आधारसक्तीमुळेच. काय घडलंय बघा तरी.
झालं असं की, मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातल्या नरसिंग नावाच्या व्यक्तीने रेशनकार्डवर कुटुंबातील तिसरी व्यक्ती म्हणून चक्क आपल्या कुत्र्याचं नाव घातलं होतं. जेव्हा या व्यक्तीला तिघांचे आधारकार्ड मागण्यात आले तेव्हा त्याने केवळ २ आधारकार्ड दिले. तिसऱ्या व्यक्तीच्या आधारकार्ड बद्दल विचारलं असता त्याने सांगितलं की ‘तो तर माझा कुत्रा आहे’
प्रातिनिधिक फोटो (स्रोत)
राव, नरसिंगने स्वतःचं आणि पत्नीचं नाव रेशनकार्डवर दाखल केलं होतं. आणि मुलाच्या रुपात आपल्या कुत्र्यालाच उभं केलं. त्याने या ‘तिसऱ्या’ व्यक्तीच्या नावावर वर्षभर रेशन मिळवलं भाऊ. ज्या भागात नरसिंग राहतो तिथे दरमहा ४ किलो गहू, १ किलो तांदूळ असे ५ किलो रेशन मिळते. म्हणजे वर्षभर त्याने एकट्या कुत्र्याच्या नावावर ६० किलो रेशन मिळवलं.
हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर कुत्र्याचं नाव रेशनकार्ड वरून हटवण्यात आलंय. शिवाय ग्रामपंचायतला खडे बोल सुनावण्यात आलेत.
राव, रेशनकार्डसाठी आधार सक्ती झाली नसती तर हे प्रकरण समोर आलंच नसतं. म्हणजे आधारसक्ती योग्य की अयोग्य ? तुम्हीच सांगा आता !!