computer

तुमची टाच दुखते का? ही आहेत कारणं आणि त्यावरचे उपाय

आपल्या दैनंदिन जीवनात बहुतांश वेळा जाणवणारे पण अनेकदा दुर्लक्षित होणारे काही आजार आढळून येतात. सकाळी उठल्यापासून त्याचे पडसाद आपल्या नित्य-कर्मांवर आणि आरोग्यावर पडत असतात. यातील एक मुख्य आजार म्हणजे 'प्लांटर फॅसिटायटिस'. टाचदुखी प्रकारात मोडणाऱ्या या आजाराविषयी आज आपण थोडं जाणून घेऊ.

"प्लांटर फॅसिटायटिस" (PLAN-tur fas-e-I-tis) हा सामान्यपणे टाचदुखींच्या आजारांपैकी एक आहे. 'प्लांटर फॅसिआ' हे आपल्या टाचेत आढळणारे एक प्रकारचे जाड 'लिगामेंट' असतात. 'प्लांटर फॅसिआ' हा आपल्या टाचेला तळपायाच्या समोरील बाजूस म्हणजेच पंजास जोडलेला असतो ज्यामुळे पायाला कमानाकृती प्राप्त होते आणि चालण्यास मदत होते.

"प्लांटर फॅसिटायटिस " या आजारात टाचेतील भागात दाहक वेदना निर्माण होतात. दीर्घकाळ आपल्या पायांना कुठल्याच प्रकारची हालचाल नसताना अचानक आपण चालायला लागतो, तेंव्हा हा त्रास जाणवतो. "प्लांटर फॅसिटायटिस" या आजाराची अनेक कारणे आहेत. काहींना हा त्रास अगदी सौम्यपणे जाणवतो तर काही व्यक्तींमध्ये याची तीव्रता अधिक असते. एका सर्व्हे नुसार प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीत "प्लांटर फॅसिटायटिस" हा आजार आढळतो. जरी हा आजार फार घातक नसला तरी वेळेवर उपचार न केल्याने याचा त्रास वाढू शकतो.

या आजाराची अनेक कारणे आहेत आणि त्यावर विविध उपाय देखील आहेत.

"प्लांटर फॅसिटायटिस" ची प्रमुख कारणे -

मुख्यत: दीर्घकाळ पायांची हालचाल न करता अचानक त्यावर भार आल्याने टाचेत वेदना निर्माण होतात. त्याचे मुख्य कारण आहे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे हा आजार विकसित होण्याची जास्त शक्यता आहे. शरीराच्या अचानक वाढलेल्या वजनामुळे टाचेवर अति भार येऊन टाच दुखू लागते तेंव्हा हा आजार विकसित होतो. गर्भवती स्त्रियांचे गर्भधारणे दरम्यान अत्यंत अल्प वेळात वजन वाढते. त्यामुळे गर्भधारणे दरम्यान सुद्धा अनेक स्त्रियांना हा त्रास जाणवतो. 

या आजाराची सर्व कारणे अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीत. जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने, लांब अंतर पळण्यामुळे/चालण्यामुळे आणि विशेषतः मेरेथोन रनर्स मध्ये, नेहमी चालण्याने किंवा पायांना आराम न देता दीर्घकाळ उभे राहिल्यावर टाचांमध्ये या वेदना निर्माण होतात. अति व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा "प्लांटर फॅसिटायटिस" ची लक्षणे आढळतात. 

जरी या आजाराचे स्पष्ट कारण नसले तरी मुख्यत्वे कुठल्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो हे जाणून घेऊया -

वय - ४० ते ७० वयोगटातील व्यक्तींना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

व्यायामाचे काही प्रकार - आपल्या टाचांवर खूप ताण निर्माण करणारी क्रिया - जसे की, लांब अंतर पळणे, ट्रेकिंग करणे, आपल्या कामाच्या ठिकाणी फार वेळ उभे राहणे या गोष्टी या आजारास कारणीभूत ठरतात.

पायांचा आकार आणि रचना - पायांचा आकार सपाट असणे या कारणामुळे सुद्धा "प्लांटर फॅसिटायटिस" हा आजार विकसित होतो.

लठ्ठपणा - लठ्ठपणा मुळे सुद्धा पायांवर आणि विशेषतः टाचांवर ताण पडतो.

व्यवसाय - हो! तुमच्या व्यवसायामुळे पण हा आजार उद्भवू शकतो. नेहमी उभे राहून काम करणाऱ्या व्यक्तींच्या 'प्लांटर फॅसिआ' मध्ये सूज येऊन दाहक वेदना निर्माण होतात आणि या आजाराचे कारण ठरतात.

अयोग्य वहाणांचा वापर - अयोग्य वहाणांचा वापर करणे हे एक महत्वपूर्ण कारण असू शकते.
या कारणांव्यतिरिक्त इतर पण अनेक कारणे आहेत ज्यामुळे "प्लांटर फॅसिटायटिस" चा त्रास जाणवतो. या आजारातील प्रत्येक रुग्णांच्या आजाराचे कारण हे वेगवेगळे असू शकते.

"प्लांटर फॅसिटायटिस" आजारावर निदान आणि उपचार -

या आजारामध्ये रुग्णाच्या शारीरिक तपासणीवर आणि वैद्यकीय इतिहासावर अभ्यास करून त्यावर निदान काढले जाते. शारीरिक तपासणी दरम्यान डॉक्टर टाचांमध्ये त्रास होत असलेल्या ठिकाणी तपासणी करून त्यावर आधारित उपचार करतात. 

वैद्यकीय तपासणी -

सहसा या आजारामुळे कुठल्याही प्रकारच्या 'X-ray' किंवा 'MRI(Magnetic Resonance Imaging)' ची आवश्यकता नसते. पण या वेदना इतर कारणांमुळे आहेत (उदा. हाडांचा फ्राक्चर) कि फक्त "प्लांटर फॅसिटायटिस" मुळे आहे यावर निष्कर्ष काढण्यासाठी डॉक्टर 'X-ray' किंवा 'MRI(Magnetic Resonance Imaging)' करण्याचा सल्ला देऊ शकतात. जर डॉक्टरांना उपचारादरम्यान रुग्णाला होत असलेला आजार "प्लांटर फॅसिटायटिसशी" संबंधित नाही हे जाणवलं, तर फ्रॅक्चर किंवा ट्युमर ही देखील टाचदुखीचे कारणे असू शकतात. 

बहुतांश वेळा हा आजार योग्य उपचार, आराम, दुखापत होत असलेल्या ठिकाणी बर्फ लावणे आणि विशिष्ट प्रकारच्या व्यायामाने बरा होऊ शकतो. या गोष्टींचा उपयोग करून सुद्धा काही दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

इबप्रोफेन (अॅडविल, मोट्रिन आयबी, इतर) आणि नेप्रोक्झेन सोडियम (अॅलेव्ह) सारख्या वेदना कमी करणाऱ्या औषधांचा वापर करूनही या आजारावर उपचार केला जातो. याशिवाय डॉक्टर्स रुग्णांच्या स्नायूंची आणि शिरांची तपासणी करून स्नायूंची शक्ती आणि त्यात काही कमतरता आढळते का हे देखील तपासतात.
 

उपचार -

विशिष्ट प्रकारचा पायांचा व्यायाम करणे, स्ट्रेचिंग करणे आणि वैद्यकीय साधनांचा वापर करून  "प्लांटर फॅसिटायटिसशी" वर उपचार केला जातो. या उपचारात खालील गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात - 

फिजिकल थेरपी - फिजिकल थेरपी मध्ये डॉक्टर काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करण्यास सुचवतात. यात तुमच्या पायांचे स्नायू मजबूत करणे यावर भर असतो. पायाचे स्नायू मजबूत झाल्याने तुमच्या टाचेत आणि पंजांमध्ये स्थिरता निर्माण होते. तळपायाला एथलेटिक टॅपिंग चा उपयोग करून पायांना आराम कसा मिळवावा हे देखील डॉक्टर शिकवतात.

(Orthotics)

व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम ची कमतरता - हाडांमध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. त्याकरिता शारीरिक चिकित्सक आणि डॉक्टर जीवनसत्व वाढवण्यासाठी औषधे घेण्यास प्रेरित करतात तसेच कॅल्शिअम युक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

Orthotics - पायांना योग्य प्रकारचा आधार मिळावा आणि टाचांमध्ये आणि पंजांमध्ये समान दाब निर्माण व्हावा यासाठी  "Orthotics" चा वापर केला जातो. आपल्या बुटांमध्ये कस्टम-फिट केलेले आर्ट सपोर्ट(ऑर्थोटीक्स) बसवण्याचा सल्ला चिकित्सक देतात.

जर त्रास अधिक प्रमाणत होऊ लागला तर काय करायचं ?

अनेक महिन्यांच्या उपचारानंतर पण जर टाचदुखीचा त्रास थांबत नसेल तर डॉक्टर खालील उपाय देखील करू शकतात-

इंजेक्शन - जर त्रास अधिकच वाढला आणि वेदना असह्य झाल्या तर उपचारासाठी चिकित्सक इंजेक्शनचा वापर करू शकतात. 
या उपचारामुळे स्टेरॉइडचे इंजेक्शन देऊन वेदना तात्पुरत्या कमी होऊ शकतात पण अधिक प्रमाणत इंजेक्शन घेणे हे घातक
असू शकते.

शस्त्रक्रिया(Surgery) - जर हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आणि इतर सर्व पर्याय अपयशी ठरले तर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय उरतो. 

"प्लांटर फॅसिटायटिस" हा टाचदुखी चा सर्वसामान्य आजार असला तरी वेळेत आणि योग्य उपचार करून या वेदनांपासून मुक्तता मिळू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required