computer

भारतीय लग्नांत असतात या १० विचित्र परंपरा...तुमच्याकडे आणखी कोणती वेगळी परंपरा आहे?

मंडळी, भारतात प्रत्येक दोन पावलांवर नवीन माणसं भेटतात. त्यांचे कपडे, त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान सगळंच वेगळं. भारतीय लग्नात हा वेगळेपणा जास्त ठळकपणे दिसतो. वरवर पाहता भारतात एक सारखीच लग्न परंपरा असली तरी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आढळून येतात आहेत. आता हेच बघा ना, तमिळ लग्नात नवरा मुलगा चक्क मंडपातून पळून जातो तर मुलीचा बाप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, उत्तर प्रदेश मध्ये नवऱ्या मुलाचं स्वागत त्याच्यावर चक्क टोमॅटो फेकून केलं जातं, हे तर काहीच नाही महाराष्ट्रात मुलीचा भाऊ होणाऱ्या भावजींचं कान उपटून त्याला दम भरतो.

मंडळी, भारतीय लग्नांमध्ये अशा अतरंगी परंपरांची कमी नाही. चला तर आज अशाच १० अतरंगी परंपरांची माहिती घेऊया.

१. पश्चिम बंगाल

बंगाली परंपरेत आई आपल्या मुलाचं लग्नच पाहत नाही. आईने लग्न पाहिलं तर अपशकून होतो असा समज आहे. आपल्याकडे पण काही भागांमध्ये मुलाची आई पहिली मंगलाष्टक ऐकत नाही.

२. राजस्थान

आपल्याकडच्या रुखवतात जशा मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या गोष्टी ठेवल्या जातात तश्याच राजस्थानच्या काही भागांमध्ये ‘दिखावा’ नावाच्या प्रथेत नवरा नवरीच्या घरच्यांनी खरेदी केलेल्या सगळ्या भेटी दिखावा म्हणून ठेवल्या जातात. असं म्हणतात, दिखावा पद्धत लग्नातल्या भेटी सगळ्या नातेवाईकांसमोर मिरवण्यासाठी रूढ झाली.

३. गुजरात

गुजरात मध्ये पोंकवू नावाचा समारंभ असतो. या समारंभात नवऱ्या मुलीची आई तिच्या होणाऱ्या जावयाचं नाक ओढते. या प्रथेचा प्रसंग अनेकदा एकता कपूर छाप डेली सोप मध्ये तुम्ही बघितला असेलच.

४. सिंधी

सिंधी लग्नात नवऱ्या मुलाचे नातेवाईक आणि मित्र त्याचे कपडे चक्क फाडून टाकतात. याचं कारण असं की, कपडे फाडणे म्हणजे जुन्या आयुष्याची समाप्ती आणि नव्या आयुष्याची सुरुवात मानली जाते.

५. बिहार

बिहार मधल्या प्रथेनुसार नवऱ्या मुलीला एकावर एक अशी जमतील तेवढी मातीची भांडी आपल्या डोक्यावर ठेवावी लागतात आणि त्याच अवस्थेत मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. डोक्यावर रचलेली मातीची भांडी नवऱ्या मुलीवर असलेल्या जबाबदाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात.

६. तामिळनाडू

तमिळ लग्नात एक अजब नाट्य घडतं. मुलगा लग्नातून संन्यास घेण्यासाठी पळून जातो तर मुलीचे वडील मुलाला थांबवण्यासाठी त्याच्या मागून धावतात. अशी पद्धत आपल्याकडच्या मुंजीत असते. मुलगा काशीला जायचं म्हणतो पण मामा मुलगी देईन म्हणतो आणि त्याला अडवतो.

७. सरसौल, उत्तरप्रदेश

उत्तर प्रदेश मध्ये सरसौल नावाचं एक गाव आहे. या गावात नवऱ्या मुलाचं व त्याच्या मित्रांचं स्वागत त्यांच्यावर टोमॅटो फेकून केलं जातं.

८. महाराष्ट्र

महाराष्ट्रात एका प्रथेत मुलीचा भाऊ मुलाचे कान ओढून आपल्या बहिणीला नीट सांभाळण्याची ताकीद देतो.

९. पंजाब

पंजाब मधल्या लग्न पद्धतीत नवऱ्या मुलीची आई जवळच्या मंदिरातून पाणी आणते. त्या पाण्याने अंघोळ केल्यानंतरच मुलगी लग्नाची तयारी करते.

१०. मणिपूर

मणिपूर मध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडून ‘गुडलक’साठी जवळच्या तलावात २ मासे सोडले जातात.

 

तर मंडळी, अशा या अजब प्रथा आणि परंपरा. तुमच्या भागातही अशाच अजब प्रथा असतील तर आम्हाला जरूर कळवा !!

 

आणखी वाचा :

या मराठी तारे-तारकांच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?

आता लोक लग्नही तिकीट लावून करणार ! पाहा बरं काय आहे ही भन्नाट आयडिया !!

नवरीच्या नावाने नवऱ्याला केलं बेजार....काय आहे ते नाव, पाहा बरं !!

देशविदेशातल्या लग्नांचे लईभारी पोशाख...बघा एखादा पसंद पडतोय का !!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required