शनिवार स्पेशल : भारताच्या सायबर आर्मीने दिले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर....कोण आहे ही सायबर आर्मी ??
मंडळी पुलवामा हल्ल्याचं प्रत्युत्तर आपण द्यायला सुरुवात केली आहे. कालच सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं. तसंच आर्थिक दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानला दिलेलं ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जाही काढून घेण्यात आला आहे.
हे सगळं सुरु होण्यापूर्वीच भारताच्या एका वेगळ्या सैन्याने पाकिस्तानवर हल्लाही केला होता. हा हल्ला होता हॅकिंगचा. भारताच्या अनधिकृत पण एक पाऊल पुढे असलेल्या हॅकर्स जवानांनी चक्क पाकिस्तानी सैन्याची वेबसाईट हॅक करून त्यावर भारताचा तिरंगा फडकवला आहे.
आज आपण शनिवार स्पेशल मध्ये या हॅकर आर्मी बद्दल जाणून घेणार आहोत.
http://pcsi.gov.pk/web/ ही ती पाकिस्तानी वेबसाईट. थांबा, लगेच वेबसाईटवर जाऊ नका. आज ही वेबसाईट पूर्णपणे बंद पडली आहे. काल या वेबसाईटवर काय दिसत होतं ते या फोटोत पाहा !!
मंडळी, पाकिस्तानी सैन्याची वेबसाईट हॅक करण्यामागे एक नाही दोन नाही तर तब्बल ९ हॅकिंग ग्रुपचा सहभाग होता. हॅक झालेल्या वेबसाईटवर पुढील मजकूर आढळला होता.
Greetz : HELL SHIELD HACKERS| MALLU CYBER SOLDIERS | TURTLE SQUAD | INDIAN ELITE HACKERS | INDIAN BLACK HAT HACKERS | INDISHELL| ICA| ACA | I-HOS AND ALL INDIAN HACKERS...
या सर्वच हॅकिंग ग्रुपची माहिती मिळू शकलेली नाही. हे हॅकर्स स्वतःची ओळख अत्यंत गुप्त ठेवत असल्याने त्यांची नावं माहित पडण्याचा तर प्रश्नच नाही. मिळालेली माहितीवरून एकेका ग्रुप बद्दल जाणून घेऊया.
१. Hell Shield Hackers
या ग्रुपच्या सदस्यांबद्दल जाणून घेतलं तरी या ग्रुपच्या एकूण कामाचा आवाका लक्षात येईल. L@Zaru$ असं सांकेतिक नाव असलेली व्यक्ती ही या ग्रुपची संस्थापक आहे. या संस्थापकाने आजवर हजारो फेसबुक आणि जीमेल आयडी हॅक केले आहेत. हे तर काहीच नाही, या व्यक्तीने तर नासाची वेबसाईट पण हॅक केली होती म्हणे. मग पाकिस्तानी लष्कराची वेबसाईट हॅक करणं किती सोप्प असेल हे तुम्ही समजूच शकता.
Psychotic_Overlo@D या सहसंस्थापकाने यापूर्वी पण पाकिस्तानी वेबसाईट हॅक केली होती. त्याशिवाय बांगलादेशी वेबसाईट पण हॅक केली होती. आपल्या BSNL ची वेबसाईट हॅक करण्याचा पराक्रमही त्यानेच केला होता. अशाच आणखी काही हॅकर्सने मिळून हा ग्रुप तयार झाला आहे.
२. Mallu Cyber Soldiers
हा पाकिस्तानी वेबसाईट हॅक करणारा पहिला मल्याळी ग्रुप आहे. २०१८ च्या मे मध्ये पाकिस्तानी सैन्याने अवघ्या ८ महिन्याच्या मुलाचा खून केला होता. या घटनेच्या निषेधार्थ मल्लू ग्रुपने पाकिस्तानी सरकारी वेबसाईट्स हॅक करून माहिती लिक केली होती.
मल्लू ग्रुपने हॅक केलेल्या वेबसाइट्सची यादी :
http://www.fda.gov.pk/assets/uploads/mcs.html
http://pidajk.gok.pk/mcs.html
http://www.wasag.gop.pk/assets/mcs/
http://www.wasamultan.gop.pk/mcs.html
https://kda.gkp.pk/mcs.html
Hell Shield Hackers ग्रुप मधली P0i50n Op3rat0r नावाची व्यक्ती मल्लू ग्रुपची सदस्य आहे.
३. Turtle Squad
वरील सगळे ग्रुप काही ना काही कारणांनी बदनाम आहेत. कारण या सगळ्यांनी भारतातल्या वेबसाइट्स हॅक करून भारताचंही थोडं बहुत नुकसान केल आहे. Turtle Squad हा काहीसा सायबर गुन्हेगार स्वरूपाचा ग्रुप आहे. या ग्रुपने २०१७ साली क्लियरट्रीप या ट्रॅव्हेल कंपनीची वेबसाईट हॅक करून १.४ कोटी युझर्सची माहिती लिक केली होती.
४. Indian Elite Hackers
या ग्रुपच्या एका वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप मधले सदस्य भारताच्या विविध भागातून काम करतात. याच वेबसाईटवर असंही सांगण्यात आलंय की ‘आम्हाला नाव पैसा काही नको. आम्ही देशाच्या हितासाठी काम करत आहोत.’ या ग्रुपचा एक फंडा असा आहे की ‘भारतीय वेबसाइट्सना काश्मीरच्या नावाखाली हॅक करणाऱ्यांना आम्ही हॅक करतो.’
ग्रुप मधल्या काही प्रमुख लोकांची नावं पाहा. नावं नेहमी प्रमाणे सांकेतिक भाषांमध्ये आहेत.
1.An@n
2.An0n Sp1d3r
3.CYBA TIGER
4.cyb3r_buddy
5.cyb3r defac3r
५. Indian Black Hat Hackers
(प्रातिनिधिक फोटो)
हॅकिंगच्या भाषेत Black Hat म्हणजे परवानगीशिवाय कम्प्युटरच्या सुरक्षा व्यवस्थेशी छेडछाड करणारा. याच्या विरुद्ध असलेली white hat संज्ञा अधिकृत हॅकर्ससाठी वापरली जाते. तर मुद्दा असा आहे की Indian Black Hat Hackers हे सुद्धा अनधिकृत हॅकर्स आहेत. यांच्याबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
६. Indishell
भारत-पाक दरम्यान सायबर युद्ध फार पूर्वीपासून सुरु आहे. २०१२ साली पाकिस्तानी Sizzling Soul या हॅकर ग्रुपने भारतातल्या ३०० वेबसाइट्सना हॅक केलं होतं. याचं उत्तर म्हणून Indishell ग्रुपने पाकिस्तानच्या प्रमुख अशा २५० वेबसाइट्स हॅक केल्या होत्या. यात सरकारी वेबसाईट्स पण होत्या.
याच ग्रुपच्या नावाखाली २ जणांनी २०१२ साली www.freecharge.in ही वेबसाईट हॅक करून मोठी रक्कम लंपास केली होती.
७. ICA
या ग्रुप बद्दल थोडी शंका आहे. ही शंका अशी की ICA चा अर्थ होतो इंडियन सायबर आर्मी आणि ICA ही एथिकल (अधिकृत) हॅकर्सची टीम आहे. एथिकल हॅकर्स परवानगीशिवाय हॅकिंगचं काम करत नाहीत. याच नावाचा एक आणखी एक अनधिकृत ग्रुप असण्याची शक्यता आहे.
उरलेल्या ACA या ग्रुप बद्दल इंटरनेटवर माहिती उपलब्ध नाही. I-HOS या ग्रुप बद्दल त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर “आम्हीच जवळजवळ सर्व भारतीय हॅकिंग ग्रुपचे मूळ आहोत”.
तर, हे झाले भारतातले अनधिकृत म्हणजे जे लपूनछपून हॅकिंगची कामे करतात असे ग्रुप. भारतात असेही काही हॅकर्स आहेत जे अधिकृतरीत्या हॅकिंग करतात. पण त्यांचं उद्दिष्ट हॅकिंग मधून दरोडा टाकण्याचा नसतो तर हॅकिंग पासून संरक्षण हा असतो. अशा एथिकल हॅकर्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका !!
शनिवार स्पेशल : भारतातील १० अग्रगण्य एथिकल हॅकर्स !!
मंडळी, सायबर हल्ला हा रक्तपाता इतकाच गंभीर हल्ला असू शकतो. आपली सायबर आर्मी अनधिकृत असली तरी हा हल्ला परतवून लावण्यास समर्थ आहे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.
तुम्हाला कसा वाटला हा लेख ? लेख आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका !!