या देशांमध्ये सायकल चालवल्यास नागरिकांच्या खात्यात जमा होतात पैसे !!
प्रत्येकाचं गाडी घेण्याचं स्वप्न असतं. निदान दुचाकी तरी घ्यायची इच्छा असतेच. याच इच्छेपायी जगभरात गाड्यांची संख्या वाढत आहे. जगाचं सोडा ठेवा बाजूला, आपल्या पुण्यातच माणसांपेक्षा गाड्यांची संख्या जास्त आहे. हा अंदाज नाही, अहवाल आहे.
तर, जग गाड्यांच्या मागे धावत असताना नेदरलँड्स मात्र आजही सायकलवर अडून बसलंय. नेदरलँड्स हा सायकल वापरणारा जगातील एक प्रमुख देश आहे. नेदरलँड्स मध्ये माणसांपेक्षा जास्त संख्या ही सायकलींची आहे. तिथल्या लोकांचा कामापासून घरापर्यंतचा प्रवास हा सायकलीवर होतो.
नेदरलँड्सने निवडलेला हा इकोफ्रेंडली मार्ग जगासमोर आज आदर्श बनला आहे. सायकलसाठी नेदरलँड्स मध्ये वेगळे रस्ते बांधण्यात आलेत. याखेरीज सायकलचा वापर करणाऱ्या नागरिकांना करांमध्ये सूट दिली जाते. हे तर काहीच नाही, सायकल चालवल्यावर पैसे दिल्याचं कधी ऐकलय का ? नेदरलँड्स मध्ये हे प्रत्यक्ष घडत आहे.
नेदरलँड्स मध्ये रोज सायकल वापरणाऱ्यांच्या खात्यात प्रत्येक किलोमीटरच्या हुशोबाने ०.२२ डॉलर्स जमा केले जातात. म्हणजे भारतीय चलनाच्या हुशोबाने एका किलोमीटरसाठी १५.५४ रुपये दिले जातात. विशेष म्हणजे या पैशांवर कर लावला जात नाही.
नेदरलँड्सच्या पावलावर पाऊल टाकत ब्रिटन, बेल्जियम, लक्झेम्बर्ग हे देश पुढे सरसावले आहेत. ब्रिटन मध्ये सायकल वापरल्यास ०.२६ डॉलर्स (१८.३६ रुपये) भत्ता दिला जातो, तर बेल्जियम नेदरलँड्स प्रमाणे प्रत्येक किलोमीटरसाठी ०.२६ डॉलर्स (१८.३६) रुपये देऊ करतं. लक्झेम्बर्ग देशात सायकल विकत घेता यावी यासाठी करांमध्ये ३४० डॉलर्स (२४,०१५ रुपये) सवलत दिली जाते.
मंडळी, आपल्या देशात दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत आहे आणि त्यासोबत पेट्रोल डीझेलच्या किमती पण वाढतायत. अशा परिस्थितीत या देशांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं ??