IPL ची ती प्रसिद्ध ट्यून कुठून आली माहित आहे का ?

IPL च्या प्रत्येक सिझनचं एक वेगळं थीम असतं. प्रत्येक थीमचं म्युझिक वेगळं असतं, पण IPL च्या जन्मापासून असलेल्या त्या खास तुतारीच्या आवाजाशिवाय IPL ला मजा नाही राव. त्यामुळेच तर म्युझिक बदलली तरी एका ठराविक जागी या तुतारीची ट्यून असतेच.
मंडळी, तुम्हाला कधीनाकधी तरी नक्कीच हा प्रश्न पडला असणार की ही ट्यून आली तरी कुठून ? ती कोणी तयार केली ? ती खरंच IPL ची ट्यून आहे का ? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.
तर, मुळात ही IPL ची ट्यून नाही. ती एक पारंपारिक स्पॅनिश ट्यून आहे. स्पेन मध्ये अनेक प्रकारे ही ट्यून वापरलेली दिसते. जसे की, ‘En Er Mundo - Pepe El Trompeta’ या स्पॅनिश गाण्याची सुरुवात या ट्यूनपासून होते. तसेच paso-doble या पारंपारिक स्पॅनिश नृत्याच्या सुरुवातीला ही ट्यून आहे. महत्वाचं म्हणजे स्पेनच्या प्रसिद्ध बुलफाइटिंगची सुरुवात या संगीताने होते. या ट्यूनला प्रसिद्ध करण्याचं श्रेय कोणाला जातं ते याच बुलफाइटिंगला. अर्थात त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या IPL चा.
आपण ऐकतो तो आवाज एका ट्रम्पेटचा आहे मंडळी. ही ट्यून एवढी प्रसिद्ध आहे की मोठमोठ्या फुटबॉल, रग्बी सामन्यांमध्ये ती अनेकदा ऐकू येते. मूळ पारंपारिक स्पॅनिश ट्यून ऐकण्यासाठी हा व्हिडीओ पाहा !!
मंडळी, याचा अर्थ IPLवाल्यांनी ही स्पॅनिश ट्यून चोरली आहे का ? तर उत्तर आहे ‘नाही’. हे एक पारंपारिक संगीत असल्याने त्याच्या संगीतकाराबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही. जगभरात या ट्यूनचा अनेक संगीतकारांनी आपापल्या पद्धतीने वापर केला आहे. असाच वापर आपल्या IPL सामन्यांसाठी झाला. कमाल म्हणजे हा प्रयोग एवढा यशस्वी झाला की ही ट्यून IPLशी कायमची जोडली गेली आहे.
तर मंडळी, कशी वाटली ही माहिती ? प्रतिक्रिया नक्की द्या !!