'झुमका गिरा रे'....तब्बल ५३ वर्षांनी बरेली शहराला मिळणार 'झुमका' !!
मंडळी, आपण बरेली हा शब्द पहिल्यांदा कुठे ऐकला असेल तर तो “झुमका गिरा रे” या सुपरहिट गाण्यात. हे गाणं आल्यापासून बरेली म्हणजे झुमका हे समीकरण झालं आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की बरेलीचा झुमक्याशी काहीही संबंध नाही. ही सगळी जादू आहे मदन मोहन यांनी तयार केलेल्या गाण्याची.
मंडळी, “झुमका गिरा रे” हे गाणं 'मेरा साया' या सिनेमातलं होतं. त्या सिनेमाला यावर्षी ५३ वर्ष पूर्ण होतील. ५३ वर्षांनी अखेर बरेली शहराला त्यांचा ‘झुमका’ मिळणार आहे. बरेली विकास प्राधिकरण (बीडीए) ने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे (NHAI) दिल्ली बरेली मार्गावर झुमक्याची प्रतिकृती बसवण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी जर मिळाली तर बरेली आणि झुमक्याचं समीकरण आणखी घट्ट होईल.
मंडळी, ही आयडिया काही यावर्षी आलेली नाही. ९० च्या दशकापासून बरेलीत झुमक्याची प्रतिकृती बसवणार म्हटलं जात होतं. आर्थिक कारणाने हे काम पुढे जात २०१९ साल उजाडलं आहे. आणखी एक मोठा प्रश्न असा होता की झुमका बसवायचा कुठे ? बऱ्याच विचारांती पारसखेड़ा या दिल्ली-बरेली महामार्गाची निवड करण्यात आली आहे. पारसखेड़ा हे बरेली शहराचं प्रवेशद्वार आहे.
तर मंडळी, बरेलीत जर झुमक्याची प्रतिकृती बसवली जात असेल, तर या न्यायाने तुमच्या शहरात कोणती प्रतिकृती बसवली जावी असं तुम्हाला वाटतं ??