राग कंट्रोल कसा कराल ? या १० टिप्स वाचा !!
मंडळी संताप कुणाला येत नाही? संताप ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे राव!! नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे लग्ने तुटल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याचवेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो. आणि मग तुमचा कबीर सिंग होतो. काहीवेळा तर् दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो.
असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण त्यांना यश काही मिळत नाही राव!! पण मंडळी, आम्ही कशासाठी आहोत? आज आम्ही तुम्हांला संताप कंट्रोल करण्यासाठी १० टिप्स सांगणार आहोत...
1) राग योग्य पद्धतीने व्यक्त करा...
मंडळी, जर तुम्हाला अन्याय झाल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक संतापाच्या रूपात होतो. अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही.
2) स्वत:ला त्रास करून घेऊ नका
मंडळी, बरेच लोक संताप आल्यावर ते भिंतीवर डोके आपटून घेतात किंवा एखाद्या कडक जागेवर जोरदार पंच मारतात. याने राग निवळत तर नाहीच, उलट शरीराला जखम होण्याचा धोका असतो. शरीराला त्रास झाल्यावर परत तर चिडचिड होते. म्हणून संताप आल्यावर कुणी तुम्हाला असा काही सल्ला देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे राव!!
3) दीर्घ श्वास घ्या...
मंडळी, दीर्घ श्वास घेण्याची नेहमी प्रॅक्टिस केली तर तुमचा मनावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते. योगामध्येही दीर्घ श्वास घेण्याकडे कल असतो. एकूणातच, दीर्घ श्वास घेणे खूप बाबतीत फायदेशीर आहे राव!! संताप आल्यावर जागच्या जागी जर तुम्ही३ वेळा दीर्घ श्वास घेतला तर तुमचा स्वतःवर कंट्रोल येतो आणि तुम्हाला शांतपणे विचार करता येतो. याचा सरळ परिणाम तुमच्या संतापावर होतो. तुमचा राग दूर झालेला असतो आणि तुम्ही शांतपणे परिस्थितीला सामोरे जाता.
4) रागाचा पॅटर्न ओळखा...
राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरिक्षण करायला हवे. इतका राग का येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा. रागराग करणे खरेच गरजेचे आहे का? अशा प्रकारचा विचार केल्यावर राग दूर होतो. आणि परिस्थितीला माणूस प्रॅक्टिकल होऊन सामोरा जातो.
5) राग आल्यावर स्वत:वरील कंट्रोल सोडू नये...
मंडळी, अनेकदा लोक राग आला की आजूबाजूला असलेले सामान फेकतात किंवा समोरच्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करतात. तितका वेळ जर शांत राहण्याचा प्रयन्त केला तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो राव!! मागच्या वेळी तुम्हांला असाच राग आला होता, एत्व्हाच्या आततायेपणामुळे काय आणि कसे नुकसान झाले याचा विचार केला तर कंट्रोल करणे सोपे जाते. एकतर तुमची खराब होणारी इमेज वाचू शकते. दुसरे म्हणजे होणारे नुकसान थांबवता येते. मंडळी, हे सोपे नाही पण हळूहळू प्रत्येकवेळी राग आल्यावर ही ट्रिक वापरल्यास काही दिवसांनी याचा फायदा दिसायला लागेल.
6) बाहेर फिरायला जाणे.
मंडळी, जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशावेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हांला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते. भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो. अशावेळी तुमचा राग दूर होऊन तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला लागतात.
7) सेल्फ कंट्रोलची ट्रिक
जर तुम्हाला लहानसहान गोष्टींवरून राग येत असेल आणि गोष्टी घडून गेल्यावर केलेल्या संतापाचा पश्चाताप होत असेल, तर आम्ही एक भन्नाट ट्रिक घेऊन आलो आहोत. जेव्हा तुमचा संताप होईल तेव्हा काही सेकंदासाठी श्वास रोखून धरा. त्यामुळे तुमचे लक्ष रागावरुन हटून श्वासावर केंद्रित होईल. त्यानंतर तुम्ही अतिशय शांत झालेला असाल आणि मग तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीला उत्तर देऊ शकता. काहीजण हातावर रबर बँड बांधतात आणि राग आल्यावर त्याच्याकडे बघतात. एका गोष्टींवरच्या विचारांचा ओघ थांबून विचार दुसरीकडे वळतात.
8) रागाचे कारण शोधणे.
जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला आता राग येणार आहे, अशावेळी लगेच आपल्या रागाचे कारण शोधायचा प्रयत्न करावा. शरीरात काय बदल होत आहेत त्यांचे निरीक्षण करावे. घाम येणे, थरथर होणे, हृदयाची धडधड वाढणे यासारख्या गोष्टींकडे बघितल्यावर त्या कंट्रोलमध्ये येत असल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमची धडधड कमी झालेली असेल, थरथर व्हायचे थांबेल, याने होते असे की त्यानंतर तुम्ही पूर्णपणे शांत झालेले असाल.
9) पाणी पिणे
राग आल्यावर पाणी पिणे हा खूप चांगला उपाय समजला जातो. पाणी प्याल्यावर माणूस शांत होतो. शांत झाल्यावर परिस्थिती आटोक्यात येते. खुप साऱ्या फायद्यांपैकी हा पण एक फायदा समजला जातो.
10) राग आल्यावर हसणे...
मंडळी, राग आल्यावर कुणी हसते का? असेच तुम्ही म्हणाल पण ही ट्रिक एकदा वापरून बघा राव!! या ट्रिकमुळे वातावरणातील तणाव आपोआप कमी होतो.
मंडळी, या होत्या राग कसा आटोक्यात ठेवाव्यात याबद्दलच्या काही आयडियाज. तुम्हांला कितपत राग येतो? काय म्हणता? खूप राग येतो?? मग रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या ट्रिक्स वापरता?? आम्हांला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.